Tuesday, March 7, 2017

रिओ

आज २ वर्ष झाली आणि आजही आम्ही ह्याची वाट आतुरतेने बघतो। सकाळी 6 ला घराच्या खिडकीतून उडत त्याचं आत येणं, मग माझ्या छातीवर येऊन बसणं। वर सरकत सरकत येऊन गालावर चोचीने हलकेच टक-टक, टक-टक ठोठावणं; हेतू मला जाग यावी हा, माझी झोपमोड व्हावी हा कधीच नाही। माझा alarm clock होता तो। "झोपू दे रे Rio", अशी माझ्या साखरझोपेची आर्जव ऐकू आली की मग तो कर्णकर्कश्य, "मिठू पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे", चा गजर। Vrushali तोवर उठलेली असायची, त्याची आवडती गूळपोळी बनवायची; आदीच्या डब्यांसोबत हा एक breakfast। खाऊन झालं की नंतर उडत जाऊन basin वर बसायचा, जिथे मी दात घासत उभा असायचो। नळावर पुन्हा टक-टक टक-टक, अर्थात "चालू कर, मला पाणी प्यायचंय"। वाहत्या नळाखाली तहान भागली की मग उडून माझ्या खांद्यावर। आता terrace वर चहा चालू असायचा माझा आणि वृषालीचा। आमच्या गप्पात ह्याची लुडबुड सुरूच। बायको मग तिच्या कामा मध्ये गुंतली की माझं आणि त्याचं खेळणं सुरु व्हायचं। लांब उडत जायचा आणि मी फांदीसारखा बाहेर काढलेल्या माझ्या हातावर येऊन बसायचं. कोणी irritate केलं की "गप रे" सद्रुश्य आवाज काढायचा. बायका आणि लहान मुलांचं काय वावडं होता कोणास ठाऊक. वृषाली, आदी किंवा बिल्डिंग मधल्या इतर साऱ्या बायका-पोरांना त्याच्या चावण्याची धास्ती होती, तसे प्रसंगही ओढावले होते त्यांच्यावर. जरा वेळाने मग खाली सुदामे दादांच्या घरी जाऊन तिथे रमायचा, आणि मग खोळंबलेलं एखादं काम आठवावं अशा थाटात भुर्र्रर्र्र! दिवसभरातून एखाद्या डॉक्टरने पेशंटला visits द्याव्यात अश्या थाटात चकरा झाल्या तर ठीक, नाहीतर मग थेट संध्याकाळी ४ / ४.३० वाजता "मिठू पप्पी दे". पुन्हा खाणंपिणं आणि मग थोडा वेळ खेळून रात्री आसऱ्याला जवळच असलेल्या एका उंच नारळाच्या फांदीवर जाऊन झोपायचा. आदिला भले जवळ येऊ देत नसे, पण आदींचा जिवलग आजही आहे तो. घरात कोणतही कार्य असेल तर फॅमिली मेंबर्सच्या यादीत रिओ ला जोडणं गृहीत धरतो आदी, आज दोन वर्षांनंतर सुद्धा. एकेदिवशी सकाळी मला अचानक रिओ लंगडताना दिसला. जवळून पाहिलं तर पायाला जखम दिसत होती. जखमी पक्षावर इतर पक्षी हमला करतात हे कुठे तरी ऐकलं होतं, तडक त्याला पिंजऱ्यात टाकलं आणि जवळच्या वेटेरिनरी डॉक्टरांकडे घेऊन गेलो मी, वृषाली आणि पाच वर्षांचा आदी. तिथे त्याच्या पायाला मलम लावलं, पक्ष्यांचे इतर आजार समजावून घेतले आणि त्यांचे उपचार सुद्धा. रिओ साधारण ८/९ महिन्यांचा आहे हे सुद्धा कळालं आणि २२-२५ वर्ष आयुष्यमान असतं ही निर्धास्ती मिळाली. "जखम बरी होईल, not a fracture. फक्त पूर्ण बरा होईसतोवर बाहेर नका सोडू, नाहीतर इतर पक्षी जिवंत नाही ठेवणार त्याला. २/३ दिवस लागतील नीट व्हायला.", डॉ. कटरेंनी आश्वासन दिलं. आणि मग पेशंट पुढले ३ दिवस घरी पिंजऱ्यात बंद. खूप चिडायचा, फडफडायचा. पण जेंव्हा त्याचं लंगडणं बंद झालं, तेंव्हाच पिंजरा उघडला एका सकाळी. वाटलेलं परत नाही येणार रागावला आहे तर. पण अर्ध्याच तासात, "मिठू पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे". त्या पिंजऱ्याची गरजच काय होती घरात ते थोडं पुढे कळेल. कुटुंबातला एक झाला होता तो, आजही आहे. विश्वास बसणार नाही, पण आमच्या अलिबागच्या ट्रिप दरम्यान रिओकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आदीची आजी आणि मामा ३ दिवस आमच्याकडे येऊन राहिलेले. आजीने मायेने खाऊ-पिऊ घातलं आणि मामा त्यासोबत खेळायचा, फोनवर रिओचा आवाज ऐकवायचा. अरे इतकच काय, कॉलोनीतली अवाजवी वाढलेली झाडं कापायला माणसं बोलावलेली तेंव्हा चेरमन आणि सेक्रेटरींनी रिओचं नारळाचं झाडं सोडून द्यायला सांगितलेलं; गंमत आहे ना! रिओचा दर पंधरा दिवसांनी अंघोळीचा प्रोग्रॅम असायचा, तो ही एकदम मजेशीर. उन्हाळ्यात पक्षांना प्यायला पाणी लागत म्हणून एक मातीची थाळी आणून ठेवलेली. त्यात कबुतरं सुद्धा बसायची. मी मग स्वच्छ पाणी भरून त्या थाळीजवळ उभा राहायचो. रिओ उडत येणारच आणि त्या थाळीच्या कडावर येऊन बसणार. मग मी हात पाण्यात टाकायचो आणि पंख फडफडविण्याचा त्या उथळ पाण्यात आवाज करायचो. हळूहळू मग तो पाण्यात उतरायचा, मनसोक्त लोळायचा आणि सकाळी ८/९ च्या उन्हात पंख वाळवायला शेजारच्या फांदीवर ऊन खात बसायचा. पंखांचा रंग ओल्या गर्द हिरव्यावरून हळू-हळू वाळत-वाळत पोपटी हिरव्या रंगात झाला की समजायचं पूर्ण वाळून झालेलंय. मग अधून-मधून पिसात पिसवा होऊ नयेत म्हणून एक पाऊडर डॉक्टरांनी दिलेली, ती अंगावर टाकायची. आवडायचं नाही त्याला, पण नाईलाज होता ना राव, नाहीतर तो पिसं उपटायचं. असं साधारण ८/९ महिने चाललं आणि मग मला दक्षीण आफ्रिकेला कामा निमित्त जावं लागणार होतं. त्याच्या ३/४ दिवस आधीपासून त्याच येणं बंद झालेलं. माणसाला जेंव्हा insecure वाटू लागतं ना, तसं आपण अंधश्रद्धेला सहज जन्म देतो. "त्याला बहुतेक तुझ्या निघण्याची चाहूल लागली असेल", ही आमची बावळट समजूत आम्हीच करून घेतली. तसे होते का नव्हते हे मला ठाऊक नाही, पण तेंव्हा जीव गलबलायचा. रिओ सुखरूप असेल की नाही, कुठे असेल, कोणी पकडला तर नसेल ना, खायला-प्यायला मिळत असेल ना, असे विचार मनात कालवायचे. मग उसासे टाकत मी आजूबाजूच्या झाडांवर, फांद्यांवर, त्या तिथे मधल्या कपार्यां मधे नजर भिरभिरवायचो. करोडो पानांची हालचाल फसवायची आणि एखादी मैना सुद्धा त्यांची साथ चपखल द्यायची. राघू-मैने ची जोडी का जमली असेल हे त्यांच्या आवाजावरून लगेच कळेल; लै गंडवतात! मग अचानक मी निघायच्या बरोबर एक दिवस आधी संध्यकाळी तो आला. मी जवळच दुकानात गेलेलो, आणि वृषालीचा फोन आला, "रिओ आलाय, पटकन ये." मी धावत पळत घरी आलो आणि मग तासभर त्याला कुरवाळत, खेळवत बसलो. पुढले सहा महिने मी ती पिसं नव्हतो अनुभवणार, तो एक तास आमच्या दोघांमधला शेवटचा दुवा होता. मी गेल्या नंतर २/३ दिवस तो येऊन घरभर शोधायचा मला आणि मग एके दिवशी त्याचं येणं बंद झालं. "तुमचे काहीतरी ऋणानुबंध आहेत समीर" असं सगळी कॉलनी म्हणायची. अरे दुरून लोक यायची त्याला बघायला, त्याचं बोलणं ऐकायला, आमचं खेळणं पाहायला. कधीकधी तर ऑफिसला निघताना गंमत यायची. मी बूट घातले की तो बुटावर येऊन बसायचा. "अरे लेका जाऊदेत ऑफिसला, उशीर होतोय", हे म्हणून सुद्धा हालायचा नाही पोपट्या. मग उडून खांद्यावर बसायचा आणि पार्किंगपर्यंत सोबत असायचा. बाईक चालू झाली रे झाली की भुर्र्रर्र्रर्र्र! प्रार्थनेत एक अलौकिक शक्ती असते; हा माझा विश्वास. म्हणूनच, तो नाही आला पुन्हा कधी आम्हाला भेटायला तरी चालेल; फक्त तो जिथे कुठे आहे तिथे सुखरूप असावा, स्वच्छंद उडावा यार. जखडायचंच असतं तर मी कधीच त्याला कैद करू शकलो असतो. एक पिंजरा आजही आमच्या terrace वर मोकळाच झुलत असतो. तो पिंजरा आम्ही आणला कारण कधी कधी, खेळायच्या नादात तो उडून जायचाच नाही त्याच्या फांदीकडे, तसं थोडं दूर आहे ते झाड. मग अंधारात कासावीस करायचा आणि घरातल्या घरात घिरट्या मारायचा. पंखे रात्री चालू असतात म्हणून त्यासाठी तो पिंजरा आणला होता. खाली एक कापड अंथरलेलं, काही बिस्किट्स, काही फळाचे तुकडे आणि पाणी असं भरून ठेवायचो. मग त्याला रात्री पिंजऱ्यात ठेवून, चारही बाजूने फडकं गुंडाळून आम्ही अंधाऱ्या हॉल मध्ये तो पिंजरा ठेवायचो. रात्रभर त्यानंतर एखाद्या बाळाची झोप आपण कशी सावधपणे वाचवतो, तितक्या हलक्या पावलांनी आदी सुद्धा घरात वावरायचा. त्याचं कारण अस की पक्ष्यांना अंधार पडला की लगेच शांतता आणि झोपेची गरज असते. ती त्यांच्या तब्येतीसाठी गरजेची. म्हणूनच अंधारानंतर संपूर्ण शांत होतात पाखरं. मग सकाळ झाली की हळूच कापड दूर करायचं, पिंजरा गच्चीवर नेऊन दार उघडायचं. गुडमॉर्निंग म्हटलं की साहेब मग बाहेर यायचे, आणि रोजचं routine सुरु. कधीही कैद करण्याचा हेतू ना आम्ही ठेवला ना आमच्या शेजारच्या सुदामे कुटुंबाने. अरे नं मागता मिळालेलं निर्विकार, स्वच्छ प्रेम कैदेत ठेवण्याचं पातक करण्याची हिम्मत आमच्यात नव्हती, आजही नाही! कैद - भावनिक, मानसिक किंवा शारीरिक; कदाचित हीच चूक बरीच माणसं त्यांच्या जिवलगां बाबतीत सुद्धा करतात, आणि मग आयुष्याची कुतरओढ का होते हा फालतू प्रश्न घोंघावतो! असो! तर काही महिन्यांनी मी द. आफ्रिकेवरून परत आलो आणि मग सुरु झाला रिओचा शोध. खोटं वाटेल पण बऱ्याच घरात पिंजरा पाहून किंवा आवाज ऐकून मी गेलोय. त्यांना विनंती करून पिंजऱ्यातल्या पाखराला नीट बघितलंय. पण माझ्या ह्या वागण्याला नेहेमीच लोकांनी नम्रपणे प्रतिसाद दिलाय, माझी कळकळ समजून घेतलीये. तसे सगळेच पोपट एकसारखे दिसतात पण रिओ कदाचित मला ओळखेल आणि त्याला सोडविण्याची हाक मारेल ही आपली माझी समजूत. अरे यार अनेक घरात मी असे पिंजरे बघतो. त्या पक्ष्यांना प्रेमाने वागवतात ते लोक, नाही असं नाही. पण ही त्यांची समजूत झाली की पक्षी आनंदात आहेत. आपण खाऊ-पिऊ घालून,माया दाखवून त्यांची गरज भागवतोय तो आपला अहंकार झाला. कैदेत कोणीच सुखी नसतो, राहून बघा बाथरूम मध्ये एक दिवस, विना फोन, इतर संभाषण शिवाय, बाहेरून कडी लावून. पक्ष्याचा जन्म हा उडण्यासाठीच झालाय. त्याला इतर पक्षी मारून टाकतील ही समजूत आपण आपलीच घालत असतो. मी म्हणतो समजा जरी मारून टाकलं, तरी ती त्या पक्ष्यांची नैसर्गिक वागणूक असेल. अरे माणसं नाहीत ती विनाकारण हत्या करायला. तिथे धर्म चालतो, साधा नैसर्गिक धर्म. पण कैदेत राहण्यापेक्षा मृत्यू नक्की बेहत्तर, हे भारतीयांना तरी वेगळं सांगायला लागू नये, काय! अजून एक महत्वाची बाब म्हणजे भारतीय पोपटांना पिंजऱ्यात पाळणं, विकणं किंवा विकत घेणं हा कायद्याने गुन्हा आहे; नाही, ठाऊक नसेल तर समजून घ्या हा तपशील. Rio ...आज २ वर्ष झाली आणि आजही आम्ही त्याची वाट आतुरतेने बघतो! (समाप्त)

ह्या ब्लॉगवरील इतर पोस्ट जरूर सुद्धा वाचा. आवडल्यास, please follow my work on

www.facebook.com\kaaysangurao 

आणि तुमचा अभिप्राय ह्या ब्लॉगच्या खाली किंवा फेसबुक पेजवर जरूर टाका.