आपल्याला कधी कोणती घटना आठवणींचा ‘न्यू फोल्डर’ उघडायला लावेल ह्याचा नेम नाही. मला तर कधी कधी एखादा वास, एखादा आवाज, कोणाची तरी ओढणी, एखादी खळी कींवा पारिजाताची कळी, काहीही नॉस्टॅलजिक करून जातं. बरं येणारी आठवण फार काही महत्त्वाची असायलाच हवी असं काही नाही. एखाद्या काकांच्या शर्टाचा रंग लहानपणी आपल्या एखाद्या शर्टाच्या रंगाशी मेळ खातो आणि मग आठवणीतलं ते कार्ट थोड्या काळ माझीच करंगळी पकडून चालतं. कितीजण ह्या अनुभवाला दुजोरा देतील ठाऊक नाही, पण मला तरी असं होतं कधी कधी. पण काही आठवणी इतक्या भेदक असतात की त्यावर हसावे की रडावे हेच बोंबलायला कळत नाही.
अरे कालचीच गोष्ट घे की. मला कालंच ४.६ वर्ष पूर्ण झाली. हे माझ व्यावसायिक वय सांगतोय मी. सॉफ्टवेयर इंजिनीयर प्रजातीनेच वय सांगायची ही पद्धत अमलात आणली असं माझं ठाम मत आहे. कारण नीट आठवा, त्या आधी कधी कोणाला हाच प्रश्न विचारला तर,
‘रिटायर व्हायला आहेत अजून पंधरा सोळा वर्ष’, असं असहायतेने बोलताना मी ऐकल्याचंच आठवतय. म्हणजे आय.टी. मधे असली असहायता नसते असा गैरसमज नकोय बरं. पण उरलेल्या वर्षांच गणित सरलेल्या वर्षांमधून आम्ही चटकन काढू शकतो; असहायतेचा तोच आविर्भाव ठेऊन.
तर कालच मला साडेचार वर्ष झाली आयटीत येऊन. एरवी पगार जमा झाला की त्याचा मेसेज दर महिना एखेरला येतो, पण काल नाही आला म्हणून ए.टी.एम. च्या रांगेत उभा होतो. माझा नंबर दुसराच. माझ्या आधीचा मोबाईलवरती फेसबुक चाळत होता. त्याचा स्मार्ट-फोन होता आणि बहुदा नोकरी कुठल्यातरी दुकानात कॅश मोजण्याची असावी, नाहीतर प्रत्येकवेळेला स्क्रीन सरकवताना बोट चाटण्याची काहीच गरज नसते. असो, पण वेळ घालवायला हे साधन एक नंबर असतं, म्हणून मग मी पण माझा फोन काढला आणि फेसबुक पाहु लागलो. आपला स्क्रीन अजून कोणीतरी वाचतय हा भास मला अचानक झाला आणि मी माझ्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे पाहीलं. वय साधारण पंचेचाळीस ते पन्नास. हलक्याशा दाढीचे आणि डोक्याचे पिंजारलेले केस, दोन्हीही पिकल्यामुळे त्याचं वय अजूनच जास्त वाटत होतं. अंगात मळकट पांढरा विरलेला शर्ट आणि काळी पँट. शारीरिक काळा रंग आणि पिवळी छटा असलेले काळे डोळे माझा फोन न्याहाळात उभे होते. खरंतर फेसबुक मधे प्रायव्हेट असं काही नसतं पण कोणी प्रायव्हेट मेसेज वाचत असेल तर माझी फार चिड-चिड होते.
‘केवढ्याल घ्येतला?’, अजूनही नजर माझ्या फोनवरतीच.
‘काय?’, मी जरा नाराजी दाखावत विचारलं
‘नाही फोन केवढ्याल घ्येतला म्हनलं?’
‘आठवत नाही, वर्ष झालं घेऊन’, मी फोन लॉक केला आणि खिशात ठेवत म्हणालो. वास्तविक कींमत आठवत होती मला पण प्रायव्हसी मॅटर्स ओ शेवटी.
‘नाही, तरी आपलं अंदाजे कीतीला असंन? म्हंजे आज घ्येतला तर कीतीला पडंन?’
‘असेल, वीस-बावीस पर्यंत असेल’. खरंतर ही कींमत मी फोन घेतला तेंव्हाची पण नव्हती पण स्वत:चा फोन जास्तित जास्त कीमतीला सांगून माझी कींमत चार-चौघात वाढवायचा तो वायफळ प्रयास होता. शिवाय ज्याच्याशी मी बोलत होतो त्याला मी ‘चाळीस-पंचेचाळीस हजार’ अशी कींमत जरी सांगितली असती तरी काय समजणार आहे असा अहंकारी विचार आला. पण म्हणतात ना, अपमान हा सांगून येत नाही.
‘वीस-बावीस! आयला काय पन सांगायला राव. वीस-बावीस मधी तर आजकाल स्मार्ट-फोन येतो अन तो पन क्वॉड-कोर. येवढं नसतय ओ, उगी सांगायला काय पन...’, आणि मग अचानक, ‘... हां बोल की रे.’ असं मला दरडावून विचारलं.
अचानकपणे झालेला अपमान पुरेसा नव्हता बहुतेक म्हणून सारवासारव करायला मी म्हणालो, ‘आता मी तरी काय अजून बोलू...’, पण माझं वाक्य अर्ध कापत त्याने बोटानेच तो ब्लू-टूथ वर बोलतोय असं खुणावलं. ओशाळून मी त्याच्या तोंडाकडे पहात उभा राहीलो.
‘...ए थांब ए जरा. ब्लू-टूथ चं चार्जिंग डाऊन झालय...’ आणि मग माझ्याकडे हलकेच पहात, ‘... आनि प्रायव्हशी पन कमीये जरा इथं, दम धर जरा.’ असं म्हणून त्याने त्याचा पाच इंच लांबीचा लेटेस्ट टॉप-एंड फोन कानाला लावला आणि लाईनीतून बाहेर झाला. माझा क्वर्टी की-पॅड असलेला फोन सुद्धा शरमेने बाहेर यायला तयार नव्हता बराच काळ.
‘किती वेळ लावतायत यार!’, मानसिक विषयांतर करण्यासाठी मी माझ्या पुढच्या मुलाला म्हणालो.
‘हो ना.’ वैताग दाखवत आता तो सुद्धा ए.टी.एम. च्या दिशेने पाहू लागला. आत दोन इसम बटनांशी खेळत होते. दोन-तीन वेळा नुसत्या स्लिपा वाचून फाडताना आम्ही पाहील्या आणि आता बाहेर येतील असं वाटे तेंव्हा पुन्हा कार्ड मशीन मधे टाकायचे. अजून एका प्रयत्नानंतर त्यातल्या एकाने, आपण आंघोळीचा टॉवेल बाथरूमच्या बाहेर विसरल्यावर घरातल्या कोणालातरी हाक मारताना कसे डोकावतो, तसं डोकावलं आणि वॉचमॅनला म्हणाला,
‘दादा ते मशीन चालत नाहीये’
वॉचमॅन डाव्या डोळ्याचा कोपरा पुसत बसल्या ठिकाणावरूनच म्हणाला ‘हां मंग त्याला मी काय करनार!’ तसाही तिथे दरोडा पडला असता तरी त्याला तो तरी काय करणार होता. हत्यार म्हणून एक तुटकी व्हिनिलची खुर्ची, ही काय ती जमेची बाजू. आज तरी बाहेर बसलेला दिसला नाहीतर इतर दिवशी त्या आतल्या कंट्रोल रूम मधेच त्याचा दिवसाचा आसरा. पण आता मात्र इथे त्याचं पण बरोबरच आहे. आपण बँकेत गेल्यावर तिथल्या वॉचमनला फार तर फार विड्रॉअल स्लिपचा रंग विचारू शकतो. बाकी तांत्रिक बाबी त्यांना कशाला ठाऊक असतील. पण लोक त्या ए.टी.एम ला कॅशियर आणि वॉचमनला ब्रांच मॅनेजर समजतात. पैसे आले बाहेर की भले पंधरा हजार काढले असतील आणि नोटा शंभरच्याच मिळाल्या असतील, त्या तिथेच त्या मशीन समोर उभं राहून मोजायला सुरू करणार. आणि एखादी नोट कमी आलीच (होतं असं कधी कधी) तर तिथे त्या वॉचमनलाच जाब विचारणार.
‘अहो पण कॅश येत नाही ना’, पुन्हा त्या काचे आडच्या डोक्याने वॉचमनला विचारला. वॉचमन ने आधी आचमन केलं. त्याच्या बाटलीने मला ‘डबा आईसपाईस’ ची आठवण झाली, आणि जणु प्रॉब्लेम नक्की कुठे झाला आहे ही तांत्रिक बाब लक्षात आली आहे अशा आविर्भावात संथ गतीने आत प्रवेश केला. हे पाहून माझ्या समोरचा आणि माझ्या मागचे सगळेच पांगले आणि तिथे मी एकट्यानेच ती रांग पुन्हा सुरू ठेवली. तितक्यात ते ब्लू-टूथ वाले साहेब परत आले आणि मला एकट्यालाच पाहून म्हणाले,
‘कॅश संपली का काय? आयला कधी बघावं तर इथं काय ना काय प्रॉब्लेम असतोच...’ आणि मग पुन्हा फोनवर ओरडले, ‘... ए गन्या सोड, मी तुला उद्या ऑनलाईन ट्रांस्फर करतो. हे भ*** ए.टी.एम. बंद झालंय’. असं म्हणून माझ्याकडे पाठ फिरवून, रिक्षात बसले आणि तीच चालवत निघून गेला. मी सुद्धा घरी निघून आलो पण संध्याकाळी एक बारीक विचार मनात आला. खुद्द मी सॉफ्टवेयर इंजिनीयरच की, पण साधा बॅलेंस पहायला मला ए.टी.एम. मधे कशाला जाव लागलं! आणि मग याच विचाराच्या धाग्याने मात्र मी अचानक दोन वर्ष मागे गेलो. तेंव्हा मी अडीच वर्षांचा होतो आणि एका बँकेचाच प्रोजेक्ट माझ्या रेझ्यूमवर आणि नशिबावर झळकू लागला. तब्बल एक वर्ष चालला तो प्रोजेक्ट आणि तेच अनुभव पुन्हा नजरे समोर धावू लागले, ते सुद्धा ‘हाय-डेफीनिशन’ मधे.
प्रोजेक्ट होता एका प्रथितयश अमेरीकन बँकेचा आणि त्याचं नाव होतं ‘उनाड’... OONAAD
(... क्रमश: ...)
nice one.. :)
ReplyDeleteलिहा राजे लिहा..... तुमच्या ह्या ऊनाड प्रोजेक्ट बद्दल वाचायच हाय... :)
ReplyDeletebhari ahe rao....mast watla.. :)
ReplyDeleteLai Bhari Sameer. Zakas........ Khup divsani lihiles ki Rao
ReplyDeleteDhanyawaad mitranno. Good to see u all again! :)
ReplyDeleteFantastic sense of humor! Waiting for next part about Oonaad.
ReplyDeleteSamya far chaan. Bare watle tu parat likhan chalu keles.™
ReplyDeletetumchi lekhani khup chhan aahe....
ReplyDeletepan blog regular update karat ja hi vinanti.
ani plz majha blog pan vacha www.eAhmadnagar.com