Sunday, March 3, 2013

छत्तीस वर्ष

साधारण १९८५-८६ ची गोष्ट असावी ही. तो काळ, ज्या काळामध्ये सातारा रोड हा एक पदरी होता आणि बालाजीनगर हे महानगरपालिकेच्या आवाक्यातलं होतं. सायकली अजूनही मुबलक दिसायच्या आणि चाळ हे शहरी जीवनाचं प्रतीक होतं. पुरुषांच्या अंगावर बेल-बॉटमच्या पॅन्ट तुरळक होत चाललेल्या, तर लेडीज हळू हळू स्लीव-लेस ब्लाऊजकडे फॅशन स्टेटमेंट म्हणून बघू लागल्या होत्या. स्पोर्ट-स्टार मासिकातले गावसकर आणि कपिलचे कागदी पोस्टर हे भितींच्या पापड्या काढत बसले होते. साधा ब्लॅक-अँड-व्हाईट टेलीव्हिजन हे श्रीमंतीचं लक्षण असे आणि घरी आणलेल्या नव्या मिक्सरचं कौतुक जोशी काकूंपेक्षा डझन भर शेजारणींनाच फार; त्यात पुन्हा त्याचे पेढे सुद्धा वाटले जायचे. ‘मुलाची स्वत:ची चेतक आहे बरका’, हा स्थळ सांगणा-याचा टॉपचा क्रायटेरीया असंत.


अशा तर अनेक गोष्टी तुम्हाला नॉस्टॅल्जिक करायला कमीच पडतील, पण ह्या सगळ्यात एक अशी वस्तू हळूच घरा-घरात जागा पकडू लागली होती. मध्यम-वर्गियांसाठी मात्र तेंव्हा सुद्धा ती एक चैनीचं साधन म्हणूनच प्रसिद्ध होती. त्याचा काळा रंग, वरती दहा बिळं असलेली डिस्क आणि वायरचा सतत न सोडवता येणारा गुंता. ज्याला शोधायला मिस्ड-कॉल द्यायची गरज पडत नसे आणि रिंग टोन ही मालका सोबत घर मालकाला सुद्धा जागं करायला कमी करायची नाही. तिचा आवाज ऐकू आला की, 

‘कुणाचा फोन आहे बघ बरं!’, हे घरातल्यांसोबत शेजारचे सुद्धा म्हणत असंत. 

‘एका मिनीटाचे २ रुपये’, हा कागदाचा तुकडा सेलोटेपने त्याच फोनवर चिकटवलेला असायचा.

हळू हळू ते ‘इंस्टृमेंट’ रीटायर झालं आणि त्याच्या जागी थोड्याफार रंगांचे ऑपशन असलेले डीजिटल फोन आले. चक्क व्हॉल्यूम कंट्रोलला तीन पर्याय होते; फारच बारीक, बारीक आणि कर्ण-कर्कश. कालांतराने त्यातही बदल झाले आणि ‘कॉर्डलेस’, म्हणजे ज्याला आजच्या मोबाईलचा बाप म्हणायला हरकत नाही, ते आले. हा प्रकार तसा बराच आधी सुद्धा दिसायचा, पण मध्यम-वर्गियांसाठी हा फक्त अजीतच्या हातात ‘जंजीर’ मधे, कींवा सिगार चा दूर त्यात सोडणा-या अम्रीश पुरीच्या हातात दिसायचा. खुद्द मोबाईल आता कालबाह्य वाटू लागलाय, तरी आजही ह्या ‘लॅन्डलाईन’ ची रीटायरमेंट अजून झालेली नाही. तशा ब-याच कंपन्या आल्या आहेत बाजारात, पण ते ओल्ड-वाईन म्हणतात ना, तशी बी.एस.एन.एल. ची रिंग-टोन आज सुद्धा गाजतीये आणि आज सुद्धा भारतातील लाखो कर्मचा-यांना आप-आपली कर्तव्य पार पाडण्यास मदत करीत आहे.

माझे वडील नुकतेच ह्याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले. २८ फेबृवारी २०१३ हा त्यांच्या ‘ड्यूटी’ चा शेवटचा दिवस. सेंड-ऑफचा दणका कार्यक्रम झाला म्हणे ऑफीसात. मी सोडून संपूर्ण कुटुंब होतं त्या समारंभात; मी सोडून! खरं तर हे पत्र मी कधीच लिहून अर्धवट ठेवलं होतं. विचार केला होता की त्याच समारंभात शेकडो लोकांसमोर ही कृतज्ञता व्यक्त करेन, वडीलांसाठी आणि त्यांच्या करवी आमच्या घराचा आधारस्तंभ बनणा-या ‘आमच्या’ बी.एस.एन.एल. साठी. पण मला इथे जोहॅनेसबर्ग मध्ये यावं लागलं आणि ही मनशा तशीच राहून गेली. पण मग विचार असा आला की हे सांगायला माईकची गरज नाहीच की रे. तस्मात ही माझी ‘शब्दांजली’.

३६ वर्ष एकाच कंपनीसोबत रहाणं हे आज पचनी पडत नाही, खुद्द माझ्याच सात वर्षात तीन बदलून झाल्या आहेत की.  हेच धाडस दीड-दोन वर्षात करणा-या काही मावळ्यांना आपण ओळखतोच. पण मागच्या पीढीत ‘धैर्य’ आणि ‘सचोटी’ हे दोन शब्द जिवंत होते. इंस्टंट फूड तेंव्हाही होतं की यार, पण ते फक्त ताटात आणि वाटीत; आयुष्याच्या प्रत्येक वाटे-वाटेवर दिसत नसे. माझ्या वडीलांनी हेच दोन शब्द उराशी बाळगले आणि सातत्यानं सगळी कर्तव्य निर्वीकारपणे साध्य केली. सरळमार्ग असा जर खरच कोणता मार्ग असता तर त्याचं परसॉनिफीकेशन म्हणजे आमचे बाबा. आमची उच्च-शिक्षण, यथेच्छ  कार्य, हे सगळे पडाव अत्यंत व्यवस्थीतपणे पार पाडले ह्या माणसाने. आपल्या संस्कृतीत शिव आणि शक्ती हे अत्यंत पूजिले जातात. शिव, जे संकटी धाऊन येणारे आणि स्वभावाने भोळे असे सांगितले गेले आहेत. शक्ती, जी त्या भोळ्या शंकराला पूर्ण करणारी आणि विविध रूपाने प्रकट होऊन त्या संकाटांना तोंड देणारी, असे पुराण आणि धर्म सांगतो. वडील आणि आई हे नक्की अजून वेगळ असं काय करतात! माझ्या आई-वडीलांना देव-स्वरूप वगैरे म्हणायची माझी इच्छा मुळीच नाही, काही गोष्टी साध्या-सोप्या राहीलेल्याच छान असतात. पण पुराणां मधल्या देव आणि दैवत ह्या संकल्पना पेक्षा, त्यांना साजेशी कार्य नक्कीच आमच्या आई-वडीलांनी पूर्ण केली. गणेश जन्माला घातला नसेल कदाचित, पण गणपतीरूपी कर्तव्य, कलागूण आणि संस्कार नक्कीच बिंबवले आमच्या मनात; आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण बरका. आमची प्रत्येक गरज भागवली, आमच्यातल्या कलागुणांना सतंत प्रोत्साहन दिलं. आजही परदेशातून मी फोन केला तरी नेहेमी

‘लिखाणाचं काय चाललंय की नाही, उगी वेळ घालवत बसण्यात काही पॉइंट नाही बघ.’ असं हलक्याश्या सोलापुरी शैलीत मला सांगत असतात. 

मी शाळेत असतांनाची एक गोष्ट आहे. तेंव्हा मी इंग्लिश कविता करायचो. इंडीयन एक्स्प्रेस, टाईम्सच्या बाल-विशेष अंकात अधून-मधून नाव दिसायचं माझं. त्यामुळे शाळेत, परीसरात तशी तुटपुंजी लोकप्रियता होती. पण पोरांच कौतुक हे आई-वडीलांना नेहेमीच सुखाचं असतं हे बाप झाल्यानंतर मला समजू लागलय. शेंबडं, निगरगट्ट पोर सुद्धा ‘माझं लेकरू’ ह्या लेबलच्या खुर्चीत, मेकडं काढत निवांत बसलेलं सापडेल. पण पोकळ कौतुक असून उपयोग नसतो तर त्या निखा-याला गरज असते प्रोत्साहनाच्या हळूवार फुंकरीची. वेबसाईट कितीही दनका बनवा, त्याला योग्य बॅन्डविड्थ नसेल तर पेज फाटलचं म्हणून समजा (आय.टीतल्या लोकांना हा जोक समजेल, बाकीच्यांनी पुढे वाचत रहा मित्रांनो)! तर असंच एके दिवशी एक पत्र आलं बरका. त्यात माझी कविता कुठल्याशा ब्रिटीश पुस्तकासाठी निवडली गेली आहे असं कळालं. पण पुस्तकाची प्रत हवी असेल तर अंदाजे दहा हजार रुपयांचा डि.डि. लागणार होता. साल १९९० ते ९३, तेंव्हा दहा हजार हे ‘मंथली-इनकम’ म्हणून ओळखलं जात असे, मंथली क्रेडीट-कार्ड बिलात त्याचं रुपांतर शक्य नव्हतं. तरी वडीलांनी तडक मला सोबत घेतलं आणि कीमान पाच बँकांमध्ये आम्ही गेलो. आत्ता आठवत नाही, पण काही तांत्रिक अडचणींमुळे कोणतीच बँक तसा डी.डी. देऊ शकत नव्हती. परत येतांना, मला 

‘दुपारचं इतकं कुठे फीरत असतात का ओ तिर्थरूप!’ असली चिड-चिड, तर बाबांना मात्र काम नं झाल्याचंच नैराष्य. मी आजही त्यांना ब-याचदा ‘तिर्थरूपच’ म्हणतो. त्यांना माझ्या करीयरची काळजी, अभ्यासाचं टेंशन असे, पण कधी दाखवलं नाही. ते काम आमच्या मातेचं. त्यामुळे आमच्या आयुष्याचे सगळे पैलू नकळत त्यांनी असे वाटून घेतले आहेत. आज खरंतर आईबद्दल सुद्धा बरच काही लिहीता येईल, पण तिला रीटायर व्हायला अजून वेळ आहे. त्या तारखेला कदाचित मला तासभर का होईना माईक हातात मिळावा. पन्नास-पंचावन्न पानं बघू त्या तासा भरात संपवता येतायत का ते.

‘एस. बी. कुलकर्णी’, ज्यांनी बी.एस.एन.एल. चे A.G.M. पद हे ब-याच काळ अत्यंत ईंमादारीने भूषविलं. ‘एस. बी. कुलकर्णी’, ज्यांना ‘माझे बाबा’ म्हणतांना अभिमानाने डोळ्याच्या कडा ओल्या होतात. ‘एस. बी. कुलकर्णी’, ज्यांना ‘थँक यू साहेब’ म्हणतांना अनेक कनिष्ठ, वरीष्ठ आणि बरोबरीच्या सहका-यांना खरंतर ‘वी विल मिस यू’ असे उद्गार काढायचे असावेत. असे आमचे बाबा, आता रीटायर झाले. आणि अशी ही बी.एस.एन.एल. कंपनी, जिच्यामुळे आम्ही आज इतर अनेक अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आमचं कर्तव्य बजावू शकतो. आमचे बाबा, ज्यांच्या कर्तृत्त्वाशी कीमाना पन्नास टक्के बरोबरी करण्याचं बळ आणि बुद्धी मला मिळावी हीच शिवचरणी  प्रार्थना.

Superheroes do not fall from remote planets, dressed in red capes. They often emerge from within us holding a tiffin box.

तुम्ही आमच्यासाठी काय केलंत ह्याच्यासाठी तुमचे आभार नाही मानणार मी बाबा, पण तुमच्या पोटी जन्माला घालून त्या परमेश्वराने केलेल्या उपकाराबद्दल त्याचे आभार नक्कीच मानतो.

तुमचा अभिमानी मुलगा
-

7 comments:

 1. Very well written blog....I was emotional while reading it :)

  ReplyDelete
 2. Just opened your blog and started reading your posts one by on. You are fantastic man. You didn't write in 2012. Keep writing my friend. You have talent. Dont waste it.

  ReplyDelete
 3. @Sachin: Thanks a lot for the motivation mitra! More things coming soon. :)

  ReplyDelete
 4. छान लिहिल आहेस मित्रा....
  डोळ्यांच्या छटा हलक्याच ओल्या झाल्या अस जानवल....

  आमच्या तिर्थरूपांच्या रिटायरमेंट ची आठवण आली...आणि मि सुद्धा जाऊ शकलो नव्हतो...
  असो...
  असेच लिहित रहा.... :)

  ReplyDelete
 5. nice really great...................

  ReplyDelete
 6. I fully agree mitra, very truly written

  ReplyDelete