साधारण १९८५-८६ ची गोष्ट असावी ही. तो काळ, ज्या काळामध्ये सातारा रोड हा एक पदरी होता आणि बालाजीनगर हे महानगरपालिकेच्या आवाक्यातलं होतं. सायकली अजूनही मुबलक दिसायच्या आणि चाळ हे शहरी जीवनाचं प्रतीक होतं. पुरुषांच्या अंगावर बेल-बॉटमच्या पॅन्ट तुरळक होत चाललेल्या, तर लेडीज हळू हळू स्लीव-लेस ब्लाऊजकडे फॅशन स्टेटमेंट म्हणून बघू लागल्या होत्या. स्पोर्ट-स्टार मासिकातले गावसकर आणि कपिलचे कागदी पोस्टर हे भितींच्या पापड्या काढत बसले होते. साधा ब्लॅक-अँड-व्हाईट टेलीव्हिजन हे श्रीमंतीचं लक्षण असे आणि घरी आणलेल्या नव्या मिक्सरचं कौतुक जोशी काकूंपेक्षा डझन भर शेजारणींनाच फार; त्यात पुन्हा त्याचे पेढे सुद्धा वाटले जायचे. ‘मुलाची स्वत:ची चेतक आहे बरका’, हा स्थळ सांगणा-याचा टॉपचा क्रायटेरीया असंत.