Monday, July 15, 2013

एक उनाड प्रोजेक्ट (भाग १)

आपल्याला कधी कोणती घटना आठवणींचा ‘न्यू फोल्डर’ उघडायला लावेल ह्याचा नेम नाही. मला तर कधी कधी एखादा वास, एखादा आवाज, कोणाची तरी ओढणी, एखादी खळी कींवा पारिजाताची कळी, काहीही नॉस्टॅलजिक करून जातं. बरं येणारी आठवण फार काही महत्त्वाची असायलाच हवी असं काही नाही. एखाद्या काकांच्या शर्टाचा रंग लहानपणी आपल्या एखाद्या शर्टाच्या रंगाशी मेळ खातो आणि मग आठवणीतलं ते कार्ट थोड्या काळ माझीच करंगळी पकडून चालतं. कितीजण ह्या अनुभवाला दुजोरा देतील ठाऊक नाही, पण मला तरी असं होतं कधी कधी. पण काही आठवणी इतक्या भेदक असतात की त्यावर हसावे की रडावे हेच बोंबलायला कळत नाही.

अरे कालचीच गोष्ट घे की. मला कालंच ४.६ वर्ष पूर्ण झाली. हे माझ व्यावसायिक वय सांगतोय मी. सॉफ्टवेयर इंजिनीयर प्रजातीनेच वय सांगायची ही पद्धत अमलात आणली असं माझं ठाम मत आहे. कारण नीट आठवा, त्या आधी कधी कोणाला हाच प्रश्न विचारला तर,

‘रिटायर व्हायला आहेत अजून पंधरा सोळा वर्ष’, असं असहायतेने बोलताना मी ऐकल्याचंच आठवतय. म्हणजे आय.टी. मधे असली असहायता नसते असा गैरसमज नकोय बरं. पण उरलेल्या वर्षांच गणित सरलेल्या वर्षांमधून आम्ही चटकन काढू शकतो; असहायतेचा तोच आविर्भाव ठेऊन.

Sunday, March 3, 2013

छत्तीस वर्ष

साधारण १९८५-८६ ची गोष्ट असावी ही. तो काळ, ज्या काळामध्ये सातारा रोड हा एक पदरी होता आणि बालाजीनगर हे महानगरपालिकेच्या आवाक्यातलं होतं. सायकली अजूनही मुबलक दिसायच्या आणि चाळ हे शहरी जीवनाचं प्रतीक होतं. पुरुषांच्या अंगावर बेल-बॉटमच्या पॅन्ट तुरळक होत चाललेल्या, तर लेडीज हळू हळू स्लीव-लेस ब्लाऊजकडे फॅशन स्टेटमेंट म्हणून बघू लागल्या होत्या. स्पोर्ट-स्टार मासिकातले गावसकर आणि कपिलचे कागदी पोस्टर हे भितींच्या पापड्या काढत बसले होते. साधा ब्लॅक-अँड-व्हाईट टेलीव्हिजन हे श्रीमंतीचं लक्षण असे आणि घरी आणलेल्या नव्या मिक्सरचं कौतुक जोशी काकूंपेक्षा डझन भर शेजारणींनाच फार; त्यात पुन्हा त्याचे पेढे सुद्धा वाटले जायचे. ‘मुलाची स्वत:ची चेतक आहे बरका’, हा स्थळ सांगणा-याचा टॉपचा क्रायटेरीया असंत.