Sunday, December 18, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ६...)


‘...आब्ल ततय इम्ल कुलकुल बाप शि शि...’, 

असं काहीतरी बापट, तोंडात गच्च भात-आमटीचं मिश्रण धरून पुन्हा सुरू झाले. त्याच बरोबर मी आणि सिद्धार्थनी ते टेबलंच सोडलं. कॅन्टीन मधली सगळीच टेबलं खर्कट्या हातांनी आणि ताटांनी गच्च भरली होती, तरी सुद्धा आम्ही दोघांनी उभं राहून जेवण प्रेफर केलं.

‘काय द्वाड जेवन दिलेत की, काय की!’, खंडागळे तणतणत हात धुवायला गेले. वास्तविक लंच मधे काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण ते ब्रेकफास्ट सारखं फुकट नव्हतं ना; मग तणतण होणारच की ओ!

शेवटी सगळेच एक-एक करून बाहेर आलो आणि सव्वा तासांनी मिळणा-या रीपोर्टची वाट पहात रेंगाळू लागलो. मी सुद्धा एक न्यूजपेपरचं पान एकांकडून उसनं घेतलं आणि एक खुर्ची पकडली. सिद्धार्थ तो पर्यंत त्या पोरीला त्याच्या मोबाईल मधला कोणतातरी ‘कूल’ तांत्रिक घटक समजावण्यात गुंतला होता. बापट आणि खंडागळे एकमेकांसोबत ‘आर्थिक मंदी’ हा विषय चिवडत बसले होते. काही जण मोबाईलवर, काही पेपरमधे, तर काही चक्क वामकुक्षी मधे वेळ घालवत होते. हॉस्पिटलचं इतर कामकाज तसच घाईत, तितकच धावपळीत, आणि तितक्याच गर्दीत चाललं होतं. शेवटी ती घटीका आलीच जेंव्हा सगळ्यांच्या फाईली घेऊन एक नर्स आली आणि एक-एक करून प्रत्येकाला त्याचा रीझल्ट हातात दिला. आता राहीलेलं फक्त एकच काम आणि ते म्हणजे डॉक्टरांकडून रीपोर्ट बाबतीत सल्ला आणि माहीती. फार वेळ न लागता माझा नंबर आला आणि मी खोलीत गेलो. तिथे एका खुर्चीवर एक अगदी तरूण डॉक्टर बसला होता. कोण्त्याही कॉलेजचा तो विद्यार्थी नाही ही खात्री मी आधी करून घेतली.

‘प्लीज शिट’, माझी फाईल हातात घेऊन त्याने मला बसायला सांगितलं. मग अत्यंत सिरीयस मुद्रेने तो एक-एक पान, बोट चाटत, पुढे ढकलू लागला.

‘स्ट्रेंज...’, पहील्याच पेजवर डॉक्टरकडून असला शब्द ऐकून मला एक छोटासा धसका छातीत जाणवला.

‘...व्हेरी स्ट्रेंज...’, पान एक वरचं रीपीट वाक्य

‘...पथेटीक...’, पान दोन

‘...हॉरीबल...’, पान दोन, रीपीट धसका.

‘...आबनोक्शीयस...’, पान तीन वर हा एक अत्यंत वजनदार इंग्रजी शब्द. हे सगळे गलाठलेले शब्द ऐकून मला इथेच छोटासा हृदयविकाराचा झतका येतो की काय, अशी भिती वाटू लागली.

‘...सिंप्ली अनप्रेशिडेंटेड...’, इथे मात्र मी बुचकळ्यात पडलो. ह्या शब्दाचा अर्थ ‘आधी कधीही न पाहीलेले’ असा आहे. त्यामुळे माझ्या शरीरात असं नक्की काय सापडलय जे ह्या आधी कधीच कोणत्याच हाकीमाला उमजलं नाही? आणि तितक्यात माझं लक्ष डॉक्टरच्या टेबलावर असलेल्या पुस्ताकांच्या गठ्ठ्याकडे गेलं.

‘चकचकीत इंग्लिश इन थर्टी डेज’,

‘चोवीस तासातला इंग्रज’,

‘हॉलीवुडचा बाप तुमच्या आत’,

‘मराठी-इंग्रजी-मराठी डिक्शनरी’

अशीच आणि ह्याच क्रमाने काही पोथ्यांची यादी रचली होती. ते पहाताच मला तडक उलगडा झाला की भानगड काय आहे आणि मी एकदम चकचकीत इंग्रजीमधेच सुरू झालो.

`Isn't it strange doctor, that the metabolical activities of a human being are primarily an amendment to the anatomy purely based upon the psyche of once inner self. I mean, shouldn't we be trusting purely on our own judgement of our race so as to cater to a more philanthropic approach, rather than the materialistic agenda that we all put forward. What would you say doctor?'

डॉक्टर पार शांत आणि मक्ख. 

इथे मला एक गोष्ट कटाक्षाने क्लीयर करायची आहे. मला इथे स्वत:चा इंग्रजी बडेजाव दाखवण्याची अजिबात हौस, इच्छा आणि कूवत नव्हती. मी अत्यंत पामर समजतो स्वत:ला आणि कोणालाही हिणवण्याचा माझा हेतू ना कधी होता, ना कधी असेल. पण प्रॉब्लेम असा होता की मला नक्की झालय काय हे सांगायचं सोडून, डॉक्टरसाहेब माझी नोंदणी पेशंटच्या यादीत करतात की काय, अशी भिती मला वाटू लागली. सुटकेसाठी केलेला हा मझा नॉनसेन्स प्रयास होता.

‘यू आर व्हेरी राईट सर. एकदम बराबर बोलले सर तुम्ही’, माझ्या अत्यंत निरर्थक वाक्याचा डॉक्टरने काहीतरी अर्थ जोडला होता आणि नशीबाने तो माणूस मराठीवर आला.

‘पण मला झालय काय?’, मी अजूनही निश्चिंत नव्हतो.

‘काय नाय, कुट काय! रीपोर्ट येकदम नॉर्मलेत सर तुमचे.’

‘नाही मघाशी ते हॉरीबल, पथेटीक वगैरे म्हणत होतात, म्हणून विचरलं.’

थोड मिश्किल हसत डॉक्टर उत्तरेल ‘आ ते होय! ते आमचे इंग्लिश स्पीकींग चे सर म्हनालेत की न लाजता जास्तीत जास्त इंग्रजी बोला, म्हनून मी म्याक्सीमम वापर करतो बोलन्या मधी.’ म्हणजे माझा अंदाज खरा ठरलेला तर. जिद्दीची दाद देत मी त्या खोलीतून बाहेर आलो.

चला झालं एकदाचं! रीपोर्ट बॅगेत टाकत मी काही नव्या ओळखींना माझा नंबर दिला, ईमेल-आयडी दिला आणि घेतला सुद्धा. पण खात्री होती कुठेतरी की ना हा सिद्धार्थ पुन्हा कधी भेटेल, ना ते बापट काका कधी कॉन्टॅक्ट करतील. खंडागळेंना तर ईमेल दूरची गोष्ट, स्वत:चाच मोबाईल नंबर नीट पाठ नव्हता. स्कळी भेटलेल्या त्या सुंदर चेहे-याला कदाचित पुन्हा कधीच पहाणार नव्हतो मी, आणि मावशीचा निरोप सुद्धा तितकाच उपरा होता

‘आलास गावाकड कधी, तर नक्की भेटून जा पोरा!’, कोणतं गाव आणि काय तिचं नाव?

कार्खानिसांनी मात्र माझा ईमेल त्यांच्या मोबाईलमधे नक्की टाकला आणि वर मला त्यांच बिजनेस कार्ड सुद्धा दिल. ह्या सगळ्यात गण्याला भेटण राहून गेलं होतं. पण दूर एका कोप-यातल्या खुर्चीवर तो भिंतीला डोकं टेकून गाढ झोपला होता. आय डिडंट फील लाईक डिस्टर्बिंग सच अ हार्ड-वर्कींग पर्सन. एक दिवस; फक्त एका दिवसाच्या इतक्या सा-या आठवण्यांची फाईल मी बॅगेत टाकून पुन्हा घरी आलो.

(समाप्त)


6 comments:

 1. Arere............... sampala ka? Ata Navin kay?

  ReplyDelete
 2. Nagesh: Thanks a lot!
  Prashant: Thanks a lot for the appreciation. Anto kahitari lavkarach. Manasik shodh chalu aahe.

  ReplyDelete
 3. ek number lihlay...goodone and Wish Kaay Saangu Rao a Very Happy Birthday!! Keep it up!! :)

  ReplyDelete
 4. @Sonali: Thanks a lot for the or the best wishes.

  ReplyDelete
 5. अतिशय सुंदर... या शिवाय शब्दच सापडत नाहीयं...

  ReplyDelete