Monday, December 5, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ५...)कंटाळून सुस्कारे टाकल्यामुळे माझी फुफुसं भलताच रीझल्ट तर नाही ना देणार, ह्या टेन्शनमधे मी वेळ आणि रांगेतल्या खुर्च्या मागे ढकलत बसलो होतो. शेवटी माझा आणि बापटांचा नंबर लागलाच आणि आम्ही दार ढकलून आत गेलो. तिथे एक वॉर्ड-बॉय कान कोरत बसला होता.

‘बसा बसा, डाक्टर येतेत.’

आम्ही शांतपणे खुर्चीवर बसलो आणि माझी नजर खोलीभर भिरभिरू लागली. समोरच्या भिंतीवर फुफुसाचा आंतरीक डायग्रॅम लावला होता; शाळेतल्या बायोलॉजीची आठवण झाली मला. शेजारी सिगारेट पिल्याने काय आणि कशी हानी होऊ शकते ह्याची माहीती दिली होती. त्या शेजारच्या भिंतीवर दमा आणि ईतर श्वसनांच्या विकारांची माहीती दिली होती. नंतर माझी नजर कडेला असलेल्या एका कंप्यूटरकडे गेली. त्याला एक नळी जोडली होती. कुतूहल म्हणून मी विचारलं,

‘काय ओ, काय म्हणतात ह्या मशीनला? ’

‘काय माहीत की काय म्हनतेत! कॅम्पूटरंच म्हनतेत, आनि काय’, वॉर्डबॉयने कान कोरून कमावलेलं ऐवज त्याच्या करंगळीच्या नखातून साफ करत मला सांगितलं.


‘अहो पण तुम्ही इथेच काम करता ना?’

तोंडात गच्च भरलेली जांभई, ईगो दुखावल्यामुळे अर्धवट दाबत वॉर्डबॉय बोलले, ‘अहो करतो की. तस तर अख्या हास्पिटलात असतोय आपन, म्हनून काय सगळ्या यंत्रांची नावं पाठ करत बसू का काय!’

अजून पुढे काही बोलणार तो, तोच डॉक्टर आत आले. अंदाजे चाळीशी उलटलेला तो माणूस अत्यंत सावकाशीने आत आला आणि धक्कादायकरीतीने टेबलावर मोबाईल, एक लायटर आणि सिगारेटचा एक पॅक ठेवला. साधारण चार फूट अंतरावरंच तो बसला होता, पण तो आत येताच संपूर्ण खोली सिगारेटच्या घमघमाटाने भरून गेली होती.

‘ह्याला काय म्हनतेत ओ मुजावर साहेब?’, वॉर्डबॉयने टेबलावर ठेवलेल्या त्या मशीनकडे डोळे वळवत विचारलं. त्याला इतक्या वर्षांच्या सर्व्हिसनंतर त्या यंत्राच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली मी.

‘कशाला?’, डॉक्टर मुजावरांनी मेंदीने रंगवलेल्या लाल दाढीवरून हात फिरवत विचारलं.

‘हेच की, हे कॅम्पूटर ओ! ते पेशंट विचारायलेत.’

एक मोठा श्वास आत घेत डॉक्टरांनी ‘स्पायरो...’ आणि तोच श्वास सोडत ‘...मीटर’, असं उत्तर दिलं. मग अजून एक मोठा श्वास घेत त्यांनी बापटांना विचारलं.

‘सिगारेट पिता?’

‘नो थँक्स! आय डोन्ट स्मोक!’, खुद्द फुफुसांचा डॉक्टरंच सिगारेट पुढे करताना पहील्यांदा पहात होतो मी.

‘मी ऑफर करत नाहीये...’ 

मोठा श्वास 

‘...नुसतं घेता की नाही ते सांगा...’ 

अजून एक मोठा श्वास 

‘...इथे फॉर्मवर...’ 

एक प्रदीर्घ श्वास ‘... 

लिहायचय ओ मला...’

आणि मग एक सुस्कारा.

‘ओ सॉरी! नाही नाही, मी स्मोक नाही करत’, जीभ हलकेच चावत बापटांनी उत्तर दिलं. ह्या लंग डॉक्टरला कोणीतरी पलंग देण्याची आत्यंतिक गरज मला जाणवत होती.

‘उंची कीती?’

‘पाच फूट, दहा इंच.’

‘शिंटीमीटर मधे सांगा ओ’, वॉर्डबॉय दिलेली माहीती त्या स्पायरोमीटरमधे भरत होता.

‘एकशे सत्त्याहत्तर’

‘तुम्हाला दमा... कींवा इतर कोणता ...’ असं म्हणून डॉक्टरनी चांगली तीस सेकंदाची गॅप घेतली, आणि मग बोलले ‘...रेस्पिरेटरी प्रॉब्लेम?’

‘नाही’, असं बापटांनी उत्तर दिलं. मी, हा डॉक्टर नक्की डॉक्टरच आहे ना, हे चेक करायला त्यांच आय-कार्ड वाचू लागलो. तिथे तरी तो डॉक्टर असल्याचीच नोंद होती. त्यानंतर वॉर्डबॉयने एक छोटा पाईप एका नव्या पाकीटातून काढून दिला.

‘ह्यो पाईप तोंडात धरा, नी आधी आत जोरात हवा वढा आनि मंग सोडा जोरात’, वॉर्डबॉयने बापटांना काही इंस्ट्र्कशन्स दिल्या. त्यांनी लगेच मोठ्ठा श्वास आत घेतला आणि हलकेच फुंकर मारल्या सारखं केलं.

‘अहो जोरात घ्या की. इतक्यानं काय होतय! रीडींग येनार न्हाय नीट श्पायडीमीटर मधी’, वॉर्डबॉयने स्पायरोमीटर चा स्पायडीमीटर केला होता. आजंच नाव समजलं होतं ना, त्याला तो तरी काय करणार! बापटांनी पुन्हा तेच केलं.

‘अरे जनार्दन...... तूच दाखव त्यांना नीट.’ डॉक्टर मुजावरनी टेबलाच्या ड्रॉवरमधून एक दुसराच पाईप वॉर्डबॉयच्या हातात देत सांगितलं. त्या पाईपवर काळसर चिकटा चढल्याचं स्पष्ट दिसत होतं. वरचेवर तळहातानेच घासून जनार्दनाने तो पाईप त्याच्या तोंडात टाकला आणि जोरात फुंकर मारली. त्यात त्याला थोडा ठसका सुद्धा लागला.

‘समाजलं का आता?’, बापटांना आणि मला विचारत जनार्दनाने तो पाईप डॉक्टरकडे परत दिला.

बापटांनी आता पाईप तोंडाला लावला आणि जोरात हवा आत घ्यायला सुरू केली. त्याच सोबत जनार्दन आणि डॉक्टर मुजावरने समोरच्या मॉनीटरकडे बघत ‘घेत रहा... घेत रहा... घेत रहा...’ अशी रट लावली होती. ते ‘घेत रहा... घेत रहा... घेत रहा...’ काही थांबेचना आणि इकडे गोरे-गोरे बापट, लाल, निळे आणि हळू हळू काळे-निळे होतात की काय ह्याची भिती मला वाटू लागली. पण नशीबाने तसं झालं नाही. ‘सोडा’ चा इशारा मिळाल्या बरोबर बापटांनी मुठीत धरलेला जीव जोरात बाहेर सोडला. बिचारे लाल-लाल दिसत होते रे! कापळावरचा घाम पुसत ते बाजूला झाले आणि मग माझा नंबर लागला. आधी पाहीलेल्या प्रात्यक्षिकामुळे मला वेळ नाही लागला; पटकन झाली ती टेस्ट.

लालेलाल झालेल्या बापटांसोबत मी बाहेर आलो आणि अचानक गण्या समोर आला.

‘अहो फक्त तुमचंच ई.शी.जी राहीलं दादा, चला पटकन!’

‘म्हणजे?’

‘अहो म्हणजे बाकीच्या माणसांचं मी बाहेर उरकून घेतलय. फक्त तुम्ही आनि बापट राहीलेत. आनि फार वेळ नाही लागते, पटकन ते आत घुसा त्या खंडागळें बरोबर.’ गण्याने चक्क मला ढकलत ई.सीजी. रूम पर्यंत नेलं. खंडागळे म्हणजे सोलापुरी काका हे मला तेंव्हा समजलं. खोलीच्या आत गेलो तेंव्हा खंडागळे काका खोलीतल्या एका टेबलावरती आडवे होत होते. माझ्याकडे पहाताच एक केविलवाणा भाव त्यांच्या चेहे-यावर आपसुकच आला. पण त्याचं कारण शोधायला मला फार वेळ नाही लागला. त्याच रूममधे त्यांच्या प्रोजेक्ट प्रित्यर्थ काही विद्यार्थी उभे असलेले दिसले; कोण ते विचारू नका, नाही बोलवणार मला.

‘काका णिवांत आडवे व्हा’, एका विद्दार्थिनीने खंडागळेंना सांगितलं. त्या दोघी तिथे असताना खंडागळेच काय, पण कडेला बसलेला मी सुद्धा ‘णिवांत’ होऊ शकत नव्हतो. मग त्या मुलीने एक द्रव्य खंडागळेंच्या मनगटांवर आणि छातीवर ठीकठीकाणी लावायला सुरुवात केली. त्यानंतर ई.सी.जी च्या वायर्स त्याच ठीकाणी चिकटवल्या आणि मशीन चालू केलं. काही क्षणातच कागदाची एक बारीक पट्टी प्रिंट होत बाहेर येऊ लागली. पण काय सांगू राव! एखादं भयानक, अनाकलनीय चित्र समजा तुमच्या समोर अचानक दिसू लागलं, तेंव्हा तुमची जी प्रतिक्रीया असेल तीच माझी झाली. ती पट्टी पाहून कपाळावर आठ्या आणि गळ्या खाली आवंढा गिळत मी त्या दोन मुलींकडे पाहीलं. ई.सी.जी. च्या पट्टीवर अत्यंत वेड्यावाकड्या रेषा दिसत होत्या. हार्डली एखादं रीडींग नॉर्मल दिसत होतं. खंडागळे छताकडे बघत पडले होते. तो कागद पाहून त्या दोन्ही पोरी बिथर्ल्या होत्या, दोघींच्याही डोळ्यात हलकेच पाणी तरारलं होतं. सहाजीक आहे; हृदयाचा अत्यंत गंभीर आजार खंडागळेंना झाला होता हे लक्ख दिसत होतं. तरी त्यातल्या एकीने प्रसंगाचं भान ओळखून आधी माझ्याकडे पाहीलं,

‘सर तुम्ही दुस-या बेडवर आडवे व्हा. तुमची सुद्धा टेस्ट उरकून घेऊ.’

‘अहो पण मॅडम, त्या काकांना...’, मी काप-या अवाजात बोलत होतो हे मला समजत होतं. पण तिने हलकेच हात दाखवून मला शांत रहाण्याचा ईशारा दिला. मी मुकाट्याने बेडवर आडवा झालो आणि माझी टेस्ट सुद्धा पार पडली. टेन्शन पोटी मी माझे रीझल्ट नीट पाहीले. तसं वर-वर सगळ नॉर्मल दिसत होतं. पण खंडागळेंची मला कमालीची काळजी वाटत होती. अनोळखी का असेना, पण काही क्षण आमच्या सोबत त्यांनी घालवले होतेच की. तरी मी हळूच त्या मुलीला म्हणालो,

‘एकदा मशीन बदलून बघा. प्रिंटरमधे बिघाड असेल तरी ई.सी.जी. चे रीझल्ट खराब येत असतीलच की.’

‘काय झालं की ओ? इतका का टाईम लावायलात!’, खंडागळेंनी मान वर काढून विचारलं.

‘काही नाही, काही नाही काका. मशीन बिघडलय बहुतेक. प्रिंट नीट येत नाहीये. प्रिंटर बदलून आपण पुन्हा एक टेस्ट घेऊ’, डोळ्यातले पाणी हलकेच पुसत त्या मुलीने खंडागळेंना शांत पडून रहाण्यास सांगितलं. प्रिंटर बदलून पुन्हा एक टेस्ट झाली; पुन्हा तसलेच रीझल्ट. आता मात्र त्यातली एक पोरगी पार ढासळली. तिला रडताना पाहून खंडागळे उठून बसू लागले,

‘अगं अगं, का रडायलीस गं?’

‘काका नको नको, तुम्ही प्लीज पडून रहा. तुम्ही नका त्रास देऊ स्वत:ला’, एका पोरीने त्यांना पुन्हा आडवं केलं आणि हमसून रडणारीनं मला बाहेर जाण्याचा इशारा दिला. मग ही वार्ता गण्याला देण्यात आली व त्याने खंडागळें सोबत आलेल्या त्यांच्या बायकोला दिली. त्या बिचा-या तिथेच खाली बसल्या. तितक्यात आतून खंडागळे काका सुद्धा बाहेर आले. त्यांचे डोळे पाणावलेले पाहून, ही बातमी त्यांना सुद्धा समजली हे लगेच लक्षात आलं. बायकोला पहाताच दोघेही ढसा-ढसा रडू लागले. सगळं वातावरण अचानक गंभीर होऊन गेलं. तितक्यात एका सिनीयर डॉक्टरांना घेऊन एक वॉर्डबॉय पळत आला. खंडागळेंचा ई.सी.जी. रीझल्ट तोवर जवळपास सगळ्यांनी पाहीला होता. सगळेच स्तब्ध झाले होते. इतक्या वाकड्या लाईनी ह्या आधी मी कधीही, कोणत्याही ई.सी.जी. रीपोर्टमधे पाहील्या नव्हत्या.
मग तो रीझल्ट त्या सिनीयर डॉक्टरांनी सुद्धा पाहीला आणि खंडागळेंना न बोलावता त्यांनी गण्याला हाक मारली.

‘गन्या भ***, इकडं ये!’, हे ऐकून सारेच चापपले. हुंदके देत बसलेल्या खंडागळे काकू सुद्धा आता बावरून हुंदके देऊ लागल्या. एका डॉक्टरच्या तोंडून शिवी पहील्यांदाच ऐकली होती, पण पुन्हा ई.सी.जी. मधे गण्याचा काय संबंध हे जाणून घ्यायलाच सगळे जास्त उत्सुक होते.
‘आता मी काय केलं?’

‘भ*** छातीवरच्या केसांमुळे होतय ते. इतके केस हायेत त्यांच्या आंगावर की वायरी चिकटेना झाल्यात बॉडीला. तुला सांगितलं होतं ह्या इंश्ट्रक्शन द्यायला.’, डॉक्टरांनी चमत्कारीकच खुलासा केला. पण चारसौघात खंडागळे हा एक केसाळ माणूस आहे हे बोंबलून सांगायची काय गरज होती. पण तेवढ्यात आई, बहीण, भ***, म***, ह***, च***, अशा अनेक शिव्या खंडागळेंनी, आपण हॉस्पिटलमधे आहोत ह्याच भान सोडून सुरू केल्या; ॲन्ड बाय-द-वे त्यांना ह्या ड्यूएट मधे साथ दिली मिसेस खंडागळेंनी. बायका सुद्धा शिव्यांमधे इतक्या क्रीयेटिव्ह असू शकतात हे मला नव्हतं माहीत. पण त्यांचा संताप सहाजिक होता. सकाळपासून ह्या विद्यार्थ्यांच्या अर्धवटपणामुळे काय काय भोग भोगावे लागले होते आम्हाला. पण ह्या सगळ्यांमधे लोळून, पोट धरून, निर्लज्जपणे कोण हसत होत सांगा पाहू! अर्थात खुद्द मी, सिद्धार्थ आणि कोप-यातल्या खुर्चीवर बसलेला तो गॉगल घातलेला पेशंट.

खंडागळेंना शांत केल्यानंतर सर्व टेस्ट संपल्याची वार्ता गण्याने दिली आणि साधारण दोन तासांनंतर रीपोर्ट घ्यायला यावे हे देखील सांगितलं. दुपारचे तीन वाजले होते; आम्ही जेवण उरकून घ्यायला कॅन्टीनचा रस्ता धरला.

(...क्रमश:...)

यार तुम्ही लोक फेसबुकवर असता की नाही! फेसबुकवर ‘काय सांगू राव’ च्या नवीन लेखांचे अपडेट्स मिळत रहाण्यासाठी: www.facebook.com/kaaysangurao

2 comments:

  1. bahot khub yar! Mi hya field madhe asunahi etke jocks hou shaktat ! can't believe yar! Mastach......

    ReplyDelete