Wednesday, November 23, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ४...)

एक्स-रे ची प्रक्रीया सुरू होणार तोच आमच्या हातात एक नवाच फॉर्म देण्यात आला; ‘प्रेग्नंसी डेक्लरेशन’ फॉर्म. म्हणजे आमच्यापैकी कोणी गरोदर असल्यास आधीच कबूल करावं; असल्यास एक्स-रे काढतेवेळी विशेष काळजी घेण्यात येईल, असं त्या फॉर्ममधे लिहीलं होतं. आता तो फॉर्म मला, इनफॅक्ट कोणत्याही पुरूषाला का दिला असावा? मी कनफ्यूज होऊन इकडे-तिकडे पाहू लागलो. तितक्यात शेजारी बसलेल्या एकाने माझ्या खांद्याला हात लावून विचारलं,

‘पेन आहे का ओ?’

आता मात्र हद्द झाली. मी म्हणलो,

‘अरे मित्रा, तो फॉर्म आपल्यासाठी कशाला असेल!’

‘अरे नाही, ते रूल मधे आहे म्हणे. उगीच चिडायचं कोणीतरी’, असं भोळसट उत्तर देऊन तो पुन्हा इकडे-तिकडे पेनची चौकशी करू लागला. मला अशा लोकांसाठी काय भावना व्यक्त करू तेच समजत नाही यार. इरीटेट व्हाव, तर त्यांच्या भोळसटपणा आड येतो, आणि कीव करावी तर ते त्यांच वय नसतं. माझ्या जुन्या कंपनी मधल्या सौमित्रची मला एकदम आठवण झाली. हा माणूस कुणाला त्रास नाही होणार, कींवा एखादा रूल त्याच्या हातून नाही मोडणार ह्याचा फार विचार करायचा. अत्यंत मोकळ्या रसत्यावर, चारही बाजूंनी कोणतेही वाहन येत नाही हे दिसत असताना सुद्धा, रात्री बारा वाजता हा माणूस सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत थांबायचा. का, तर रूल मोडता कामा नये. ह्याला काहीजण सभ्यपणा म्हणतात, काही बावळटपणा सुद्धा म्हणतील. मात्र, ज्याला जसा अनुभव, ज्याची जशी मानसिक जडण-घडण, तशी त्या व्यक्तीची वर्तणूक, असं माझं मत आहे. तरी कॉमनसेन्स वापरावा कधीतरी, पण... असो! मी ह्या विचारामधून बाहेर आलो आणि तो फॉर्म तसाच परत केला. 

एक्स-रेसाठी पुरूष-स्त्री असं विभाजन केल्यामुळे दोन छोट्या-छोट्या रांगा तयार झाल्या. तरी सुद्धा एक-एका माणसाला इतका का वेळ लागत आहे, ही कीर-कीर हळू हळू पसरू लागली. एरवी एक्स-रे हा मामला चटकन आटोपता घेतला जातो. शेवटी माझी पाळी आली आणि मी खोलीत जाणार तोच एक नर्स एका काकांना घेऊन माझ्या आधी आत घुसू लागली. यावरून मेंबर लोकांचा आणि त्या नर्सचा वाद सुरू झाला. शेवटी मी आणि गण्यानेच शांत केलं ते प्रकरण आणि काकांचा विजय झाला; ते माझ्या आधी आत गेले. इतर कोणी पुन्हा घुसू नये म्हणून नियम धाब्यावर बसवून गण्या आणि एका वॉर्डबॉयने मला सुद्धा आत पिटाळलं. आत गेलो तर तिथे आधीच दोन ईसम बसल्याचे आढळून आले. त्यातला एक हॉस्पिटल कर्मचारी होता. मात्र दुस-याला पाहून माझ्या काळजात धस्स झालं. म्हणजे त्याच्या रंग-रूपात काही भयानकता होती असं नाही, पण त्याच्या गळ्यातल्या आय-कार्डमधे नक्कीच होती. त्याच्या आय-कार्डवर लिहीलं होतं,

‘श्रीमती यमुनाबाई दुधारे मेडीकल कॉलेज अ‍ॅन्ड रीसर्च सेंटर’.

आता मला उमजलं की एक्स-रे साठी सगळ्यांना इतका का वेळ लागत होता ते. तसं एक्स-रे मधे घाबरण्यासारखं काहीच नाही, पण काय भरवसा यार! तो पोरगा निमूटपणे काहीतरी लिहीत बसला होता. धष्ट-पुष्ट अंगात पांढरा डॉक्टरचा कोट, केस तेलाने आणि भांगाने चपचपीत बसवलेले आणि डोळ्यात जाड भिंगाचा चष्मा.

‘प्रोजेक्टचं काम चालालय वाटतं’, मीच गिनीपिग असल्या कारणाने जरा प्रोजेक्टच्या व्यापाचा अंदाज घेण्यासाठी विचारलं. फार म्हणजे फारंच दडपण आलेलं यार!

पण त्या स्टूडंट ऐवजी, ‘त्याच्या आ*** प्रोजेक्ट!’ अशी अत्यंत कडक, पण कुजबुजलेली शिवी त्या हॉस्पिटलच्याच कर्मचा-याने  घातली. त्यावरूनच मी अंदाज बांधला की येणारे वीस मिनीट हे अत्यंत बिकट असणारेत... माझ्या सोबत आलेल्या त्या दुस-या काकांसाठी. खुद्द माझ्यासाठी मी एका वेगळाच सुटकेचा मार्ग शोधू लागलो.

‘ओ काका, ते गाऊन काढा!’, अशी एक उद्धट-कम-तापट सूचना त्या कर्मचा-याने दिली. लगेच ‘आधी गाऊन काढून ठेवणे’, अशी पुटपुटलेली सूचना त्या पोराने त्याच्या वहीत उतरवून घेतली.

‘आयला प्रत्येक लाईन अन लाईन उतरवून काढतंय’, कर्मचारी पुन्हा वैतागला. त्याच्या छातीवरच्या बिल्ल्यावरून त्याचं नाव केदार हे मला समजलं.

‘का रे केदार काय झालं?’, मी त्याला विचारलं. तोवर काका सगळ्यांसमोर कसं उघडं व्हायचं ह्या विवंचनेमधे हळू हळू गाऊन काढत होते.

‘अहो काय सांगू दादा!...’, केदार पुटपुटत त्याची व्यथा व्यक्त करू लागला. रडकुंडीला आलेला बिचारा,

‘... सकाळपासून येऊन बसलंय हे. पुस्तक समोर ठेवलय अन त्यातले डाऊट मला विचारतय. हीच प्लेट का उचलली तुम्ही, फिल्म बनवन्यासाठी कोनतं मट्रीयल वापरतेत, एक्स-रे मशीननं पेट घेतला तर काय कराव, हे असले प्रश्न असतेत काय कुठं!’, डोळ्यात बारीक तरारलेलं पाणी दिसू लागलं मला केदारच्या.

‘... आनि वाक्य-अन-वाक्य लिहून काढतय. आता एक्स-रे साठी गाऊन काढून ठेवावा हे सकाळपासून एकोनीस वेळा लिहिलय भाड्यानं.’

मग केदारने मला आतल्या एका खोलीत जाऊन बसायला सांगितलं. त्या काकांना पहिली पाठमोरी पोज द्यायला सांगून ते दोघे सुद्धा आत आले. माझ्या अंदाजे एक्स-रे हा प्रॅक्टीकलचा विषय आहे. मात्र पूर्ण वेळ ह्या पोराने पेन सोडून, त्या खोलीतल्या कोणत्याही यंत्राला हात नाही लावला. त्या क्षणाला मला एका गोष्टीचा उलगडा झाला. मेडीकल क्षेत्रात सुद्धा सॉफ्टवेयर क्षेत्रासारखेच ‘कागद कर्ण’ भरलेले आहेत तर. कर्णाने, अर्जुनाने, प्रॅक्टीकल करून विद्या संपादन केली. इथे हा कर्ण मैदानात उतरायला तयारच होईना! त्या काळात समजा कर्णाने, अर्जुनाने, कींवा त्यांना शिकवणा-या द्रोणांनी असं काही केलं असतं, तर महाभारत कसं बनलं असतं यार! म्हणजे इमॅजिन कर बरका, की द्रोणांचा क्लास चालू आहे आणि भीम डाऊट विचारतोय,

‘सर माझ्या डोक्यात एक आयडीया आलीये! समजा बाना ऐवजी गदा लावली तर धनुष्याला?’

‘त्यानं काय होईल!’, तासभर बसून वैतागलेले द्रोण विचारतात.

‘घुसनार नाय, पण दनका कसला असतोय गदेचा! आपोनेंट गप गार!’

‘डायग्रॅममधे काय दिलय?’

‘सर, बान.’

‘देन आय जस्ट डोन्ट अंडरस्टॅन्ड धिस भीम! इफ द बुक सेज अ‍ॅरो, देन इट हॅज टू बी बाण ओनली’, द्रोणाचार्य चष्मा नाकावर ठेऊन दरडावतात.

‘मी तेच म्हणालो सर त्याला...’, आता अर्जुन एकदम सिंसीयरली बोलू लागतो, ‘...नोट्स मधे जे आहे तेच फॉलो कर ना. उगीच काय फालतूपणा.’

‘ए तू गप रे! लांबून बान मारनं सोपय. आयला मला डायरेक्ट फ्येस कराव लागतय गदेनं. हान हान हानतोय त्यो दुर्योधन.’

हे बोलणं ऐकून, क्लास बाहेरून भीष्म आत येतात.

‘देन यू शुड हॅव थॉट अबाऊट धिस बिफोर सिलेकीटींग धिस लाईन भीम. करीयरच्या ह्या स्टेजला असले डाऊट्स म्हणजे अटर नॉनसेन्स. यू बेटर लीव्ह द क्लास, यू आर क्रीयेटिंग न्यूसन्स. तो कर्ण बघा जरा. कोणाच्या तरी जुन्या नोट्स वाचून सी.ई.टी. क्लीयर केली त्यानं. अ‍ॅन्ड वी ऑल नो द रीझल्ट. फर्स्ट आलाय तो, आणि ह्याच क्लासचा अर्जून सेकंड.’, छाती फुगवून भीष्म वर्गाला सांगतात.

‘ओ सर त्याचं नाईट कॉलेज आहे. त्याला कोण विचारतयं’, अर्जुनाची जळ-जळ अशी बाहेर पडते.

‘डूड, ही इज नाव द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ वन ऑफ माय सिस्टर कन्सर्न. तू अजून इथेच आहेस. सो जरा तोंड बंदच ठेव’, दुर्योधन आता मधेच पेटून उठतो.

‘सायलेन्स...’, द्रोण सर वर्गाला शांत करत ओरडतात,‘... मूळ पॉईन्ट असा आहे, की स्टिक टू द बुक. पुस्तकात जे दिलय तेच पाठ करा आणि पास व्हा.’

हे असलं झालं असतं महाभारत तर भगवंतच जाणोत, काय ऐकायला मिळालं असतं. एक्स-रे रूम मधल्या कर्णाने मग माझ्यासाठी सुद्धा त्याच नोट्स पुन्हा उतरवून काढल्या, आणि मी बाहेर आलो.

बाहेर येताच माझी नजर समोरच्या बाकाकडे गेली. तिथे एक अंदाजे तीस वर्षांचा माणूस बसला होता. त्याच्या अंगातल्या गुलाबी सूट वरून तो हॉस्पिटलचाच पेशंट आहे हे समजलं. डोक्यावरचे सगळे केस काढलेले, डाव्या आणि उजव्या हातात सलाईनचे कनेक्टर लावले होते, डोळ्यावर काळा गॉगल घातलेला आणि कानात एम.पी.थ्री. प्लेयरचे ईयर-फोन्स होते. पेशंट तर तो नक्कीच होता, पण खूप काळ हॉस्पिटल मध्ये घालवला असणार, कारण येणा-या जाणा-या प्रत्येक हॉस्पिटल कर्मचा-याशी त्याची ओळख होती. सगळेच येता-जाता त्याला टाळ्या देत होते, त्याच्याशी चेष्टा-मस्करी चालली होती. कोणता तरी गंभीर आजार असणार त्याला हे लगेच लक्षात येत होतं. पण तरी सुद्धा कमालीचा हसतमुख, कमालीचं प्रसन्न व्यक्तीमत्त्व होतं ते. त्याच्याबद्दल सहानुभूती, आणि थोडी दया सुद्धा वाटली मला. शांतपणे एक सुस्कारा टाकत मी माझं कार्ड पाहीलं. ‘लंग टेस्ट’ अशी माझी पुढची टेस्ट होती. ते पाहून माझ्या फुफूसांनी अजून एक सुस्कारा टाकला, कारण त्यानंतर अजून फक्त एकच टेस्ट शिल्लक होती. मग झालेल्या सगळ्या टेस्ट्सचे रिपोर्ट आणि डॉक्टरांकडून सल्ला. बस्स!

लंग टेस्टसाठी वाट पहात असताना यू.एस. वाल्या काकापाशी मस्त गर्दी जमली होती. मी सुद्धा त्यात सामिल झालो. गप्पा सुरू झाल्या त्या हॉस्पिटलचे कार पार्कींग हा विषय धरून, पण पंधरा मिनीटात तो सबजेक्ट भरकटत ‘यू.एस. ते तसं - भारत हे असं’, असा पेटला. यू.एस. रीटर्न काकांच नाव कारखानिस हे तेवढ्यात कळालं.

‘...आपल्या देशाचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, की इथे उगाच दुस-याच्या आयुष्यात लुड-बुडायची फार सवय आहे. यू.एस. मधे तसलं काही नाही; आपण बरं, आपलं आयुष्य बरं. म्हणून प्रोग्रेस होतो त्या देशाचा...’

इतर काही लोकांनी सुद्धा लगेच माना हलवून आणि ‘हो हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर’ असं म्हणून दुजोरा दिला. वास्तविक हा पर्टीक्यूलर मुद्दा आपण ब-याच लोकांकडून ऐकला असेल. दुस-याच्या आयुष्यात लुडबुड करणे आणि प्रगती होणे हे कसे जोडलेले असतात, हे कोणाला समजलं नक्कीच नाही, पण पटलं मात्र सर्वांना. खुद्द मला सुद्धा यू.एस. ची ओढ आहेच की; सॉफ्टवेयर इंजिनीयरची मानसिक गरजंच आहे ती. पण म्हणून वाटेल तो मुद्दा मान्य कसा करू! तरी मी स्वत:कडेच दुर्लक्ष करून पुढे ऐकू लागलो.

‘...आणि फायर! फायर नाही इथल्या लोकांमधे. काही जगावेगळं करून दाखवण्याची भूक लागली पाहीजे. ती नाही इथे...’

‘अगदी परफेक्ट बोललात बघा सर. अहो साधा दळणाचा डबा घ्या की; लाईट नाही म्हणून गुरूवारी नाही मिळत. ह्याला काय अर्थ सांगा!’, असं संदर्भहीन वाक्य एका काकांनी ह्या निरर्थक संभाषणात जोडलं.

असं जवळपास पाच-दहा मिनीट चाललं. मी शांतपणे ऐकण्यापलीकडे काहीही नाही केलं. सिद्धार्थ तितक्यात माझ्यापाशी येऊन बसला.

‘चला, चायला झालं काम!’, बराच उत्साहात दिसत होता तो.

‘काय झालं रे?’

‘फेसबुक... डूड फेसबुकमधे आली ना राव ती.’

आणि तितक्यात गण्याने त्याचा मोबाईल आमच्या पुढे धरला. त्यात त्याच्या फेसबुकच्या यादीमधे त्या पोरीचं नाव निघालं. इतकच नव्हे तर गण्याच्या एक-दोन कमेंटला तिने ‘लाईक’ सुद्धा केलं होतं.

‘आयला शिड्या, साधं येवढं आरामात जमेना तुला म्हणजे हाईट झाली!’

सिडीला अत्यंत मोठा धक्का होता तो. क्लासमधल्या सगळ्यात माठ पोराला, अनपेक्षितपणे सगळ्यात भारी कंपनीमधे नोकरी मिळाल्यावर जे फीलिंग्ज असतील तेच इथे सिद्धार्थच्या मनात असावेत.

‘काय गण्या, एक नंबर सुटलायस तू! इतकी भारी पोरगी सहजा-सहजी फेसबुकमधे येत नाही. पण तुला कशाला रे तिच्यात इंटरेस्ट?’, उसनं अवसान आणत, आणि छातीतली जळजळ दाबत, सिड्या बोलला.

‘मला घंटा तिच्यात इंटरेस्ट. मला तिच्या फ्रेंडलिस्ट मधे इंटरेस्ट.’

‘म्हणजे? तिथे कोण आहे?’, मी विचारलं.

‘तिथं कोने! यार तिथं तर अक्ख गाव आहे’, गण्या आमच्या शेजारी बसत म्हणाला. आमच्या चेहे-यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे बोलू लागले.

‘एक गंमत सांगतो, ऐका. आमच्या गावाकडं एक हनुमानाचं मंदीर आहे. त्याच्या लगंत एक पार आहे. पारावर गावातलं सगळं पब्लिक येत जात असतं, एक मानूस सोडून जो तिथंच कायम सापडल...’ हे सांगताना गण्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. आमच्या नकळत आजूबाजूची काही मंडळी सुद्धा हे संभाषण ऐकत होती.

‘... तर पारावर कायम सापडणारा एक मानूस म्हनजे बाळ्या. बाळ्या तसा सत्तरी उलटलेला, पन गावातली पक्की खबर त्याच्याकडे सापडनार म्हनजे सापडनार. अहो त्याच्या ह्याच कॉनट्याक्ट मुळ तर गावात लई वट आहे त्याचा...’

‘त्याचा त्या मुलीशी काय संबंध?’, शेजारी बसलेल्या अनिलने आता विचारला.

‘... सांगतो की! फेसबुक हा एक भला मोठा पार आहे, जिथं टाईमपाससाठी लोकं येऊन बसतेत. ती पोरगी म्हनजे आमचा बाळ्या. पुढच्या पंधरा दिवसात पंधरा पॉलीशीज नाही काढल्या तर नावाचा गन्या नाही.’

‘अँड यू थिंक, धिस ट्रिक विल वर्क?’, सिद्धार्थने माझ्या तोंडातला प्रश्न विचारला.

‘ट्रिक कसली त्यात! तिला सांगून तिच्या मित्रांना कॉल केले सुद्धा आपन. नऊ जनं भेटनारेत ह्या आठवड्यात. कुनाकडून मदत घ्यावी, पन कुनाचा उपयोग नसतो करून घेत आपन.’

मला खरच कमालीच कौतुक वाटत होतं ह्या गण्याचं; व्हॉट अ बिजनेस माईंड!

‘बुलशिट...’, अत्यंत उद्धट, पण सणसणीत शिवी कारखानीसांनी घातली. हा वाद रंगणार हे माझ्या ध्यानात आलं.

‘... हे असले धंदेकरून बिजनेस वाढत नसतो मित्रा! भले भले झोपले त्या अमेरीकेत! हाच फरक तर म्हणत होतो मी, आपल्यात आणि अमेरीकेत...’

कारखानिसांचं वाक्य मधेच कापत गण्या एकदम बोलू लागला ‘इंश्यूरन्सच्या फॉर्मचं प्रिंटींग माझ्या प्रेस मधे होतं. ह्याच सोबत अनेक बँकांचे फॉर्म आणि त्यांचं इतर प्रिंटींगचं काम सुद्धा आपल्याच प्रेस मधे होतं. सकाळी जो नाष्ता तुम्ही केलात ना कारखानीस साहेब, तो आपल्याच कँटीनचा. अशे पंधरा कँटीन चालतात आपले पुन्या मधे. पारट्यांच्या ऑर्डर घेतो आपन त्या वेगळ्या. टोटल केली महिन्याची, तर वीस ते पंचवीस लाखाचा टर्नओव्हर आहे आपला कारखानीस साहेब.’

मी अवाक होऊन पुढचा प्रश्न विचारला, ‘अरे पण मग तू ही नोकरी का करतोयस?’

‘सुपरव्हिजनसाठी; इथं धंदा अजून नवीन आहे. एकदा का योग्य मानूस हेरला, की त्याच्या हातात म्यानेजमेंट सोपावनार, अँड देन आय अ‍ॅम आऊट ऑफ हीयर’, त्याचं प्रत्येक बिझनेसचं एक व्हिजिटींग कार्ड आमच्या सगळ्यांच्या हातात देत तो बोलत होता. जाता जाता गण्या अचानक थांबला आणि मागे वळून कारखानीसांना म्हणाला,

‘कारखानीस साहेब, फायर इथे गावा-गावात दडलीये. फुंकर मारून ती विजवता पन येतीये आनि पेटवता पन येतीये. फुंकरीचा टाईप आपन ठरवायचा. माझं नशीब बलवत्तर म्हनून चांगले मोटीव्हेटर, चांगला आत्मविश्वास देनारी मानसं भेटली मला. नाहीतर अशा लाखो फायर, गावात काय आनि शहरात काय, विजायला वेळ नाही लागत. वी ह्याव इनफ फायर सर, वी नीड मोर लीडर्स टू रेकगनाईज द्याट फायर.’

सगळे मेम्बर चिडीचुप. त्या गुलाबी गाऊनमधे तर कारखानीसांचे कान जास्तच लाल दिसत होते. हातातल्या व्हिजीटींग कार्ड कडे मी पुन्हा पाहीलं. त्यावर पूर्ण नाव होतं ‘गणपत विनोबा शेलार’; आणि मग माझ्या आणि इतर काही जणांच्या ध्यानात एकदम आलं. ह्याच नावाच्या एका गण्याला अंदाजे दोन महीन्यांपूर्वी कोणत्यातरी प्रख्यात मासिकाने ‘स्टार अपकमिंग बिजनेसमन ऑफ द ईयर’ हे अ‍ॅवॉर्ड दिलं होतं. गण्याला आता ‘गण्या’ म्हणवेना, ‘गणपत सर’ हे जास्त सूट करत होतं.

(... क्रमश: ...)खूपच प्रेमात पडला असाल, आणि मनापासून आवडलं असेल काय सांगू राव, तर फेसबुकवर नक्की Like  करा,  Share  करा यार पेज ला. काय सांगू राव ची फेसबुक लिंक आहे, 


आजच्या लेखाबद्दल सुद्धा अभिप्राय जरूर कळवा दोस्तांनो.

3 comments:

 1. ekch number ! dusara numberach nahi :)
  te Mahabharatatali shala ekdam bhari bara ka.
  kay tar mhane समजा बाना ऐवजी गदा लावली तर धनुष्याला?’
  :D :D

  ReplyDelete
 2. Thanks a lot Sanjivani! Waachat raha! :)

  ReplyDelete
 3. Pregnancy form Joke - deadly...

  ReplyDelete