Monday, November 7, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ३...)

ब्रेकफास्टची सोय हॉस्पिटलच्याच कॅन्टीनमधे केलेली, आणि ती सुद्धा एकदम झकास. सोलापुरी काका इतक्यावेळ कापसाचा बोळा हातामध्ये घट्ट धरून बसले होते.

‘काय काका, नर्स फारच आवडली दिसतीये?’, गण्यानं हातात चहाचा कप धरून विचारलं.

‘काय फालतू बोलालास बे उगी!’

‘नाही ते कापसाचा हात अजूनपर्यंत छातीला कवटाळून बसलेत, म्हनून विचारलं. ते कापूस टाका तिकडं डसबिन मधे, आनि चला नाषत्याला’, वाकडंच बोलायचं कधीपण, सरळ जमतंच नाही आपल्याला!

एक तर बारा-तेरा तासांचा उपास घडलेला, म्हणून आधीच हापापले होते सगळे. पण सिद्धार्थ नामक माणसाला वेगळ्याच भुका लागलेल्या. एका पोरीच्या पाठीशी हा मित्र गेले दोन तास उभा होता. आल्यापासून सतत,

‘आयला मिनीमम मोबाईल नंबर पाहिजे राव हिचा!’,
हे त्याने मिनीमम दहा वेळा मला ऐकवलं होतं. आता त्याच वाक्याच रूपांतर,

‘आयला मिनीमम आपल्या फेसबुकमधे आली पाहिजे राव ही!’,

ह्या आशेमधे झाल होतं.

‘काय शिडी, यार तू काही खाईनास झालय! ते पुन्हा ब्लड द्यायचय ठाऊके ना!’, गण्या आता सिद्धार्थच्या शेजारी जाऊन उभाच राहीला.

‘अरे खातो रे गण्या’, सिडी खरंतर गण्याला टाळायचा आणि जमल्यास त्या टेबलावरून  हकलायचा प्रयत्न करत होता.

‘सिड! डू यू थिंक धिस इज अ हायजिनिक प्लेस?’, ती पोरगी अगदी नाजूक, लडीवाळपणे सिद्धार्थला म्हणाली.

‘अब्बी भपाश ईय्या आभे... एपबम भप्पं!’, तोंडात इडल्या गच्च कोंबून, आणि अर्धा-पाव शितांचा फवारा उडवत, एक काका बोलले.

ते पाहूनच ती पोरगी आणि सिड्या उठले आणि कॅन्टीन सोडून बाहेरंच निघून गेले. इतकच नव्हे तर त्या काकांच्या टेबलावरच्या उरलेल्यांनी एकदम बफे स्टाईल मधे उभ राहून खाणं पसंत केलं.

‘काय म्हनले?’, गण्याने थोडं इरीटेट होऊन विचारलं.

पाण्याच्या घोटासोबत इडल्या घशात ड्रेन करत काकांनी त्या गूढ-कम-लिबलिबीत वाक्याचा खुलासा केला.

‘मी म्हणालो, अगदी झकास इडल्या आहेत... एकदम स्वच्छ!’

‘ओ बापट काका, इडलीचं मार्केटींग ठीके, पन तुम्हीतर पब्लिकला शांपल सुद्धा द्यायलात की! ... ए रव्या, ते टेबल साफ कर’, हा टोमणा बापट काकांना नाही समजला. रवी नावाच्या कॅन्टीन मधल्या पो-याने, मुकाट्याने ती शितं साफ करून घेतली. मग लग्नाच्या पंगतीत जसं सांगतात, तस सगळ्यांना ‘सावकाश होऊन दे! सावकाश होऊन दे!’, असं सांगत गण्या फिरू लागला.

गण्याचं मला खरच कौतूक वाटत होतं. माझ्या घरी फॉर्म भरायला तो त्या संध्याकाळी आलेला, पण त्या दिवशीचा गण्या आणि आत्ता पहाटे-पहाटे उठून आलेला गण्या; दोघेही तितकेच फ्रेश आणि अ‍ॅक्टिव्ह. इस्त्री केलेले फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट; पायात पॉलिश्ड नव्हते, पण फॉर्मल शूज होते. केस व्यवस्थित भांग पाडून सेट केलेले. सावळ्या रंगाच्या चेहे-यालाच फक्त पावडर लावलेली, मान आणि गळा तसाच राकट सावळा; आणि काम, बुद्धी, आणि जीभ, तिन्हीही चलाखी मध्ये एकाच लेव्हलवर.

माझ्या शेजारच्या खुर्चीवर मॅन्यूएल कोएल्हो नावाचे एक एच.आर. मॅनेजर बसला होता. मी सॅन्डविच खात असताना अचानक ‘बिच!’, अशी सिवी त्याच्या तोंडून आली. मी चपापून त्याच्याकडे पाहीलं, तर तो म्हणाला,

‘अरे आय अ‍ॅम सॉरी मॅन! जस्ट पिस्ट-ऑफ विथ माय वाईफ.’

‘अहो बायकोच ती! तिच्यावर काय चिडनार कोएल्हो साहेब!’, गण्या एक मोकळी खुर्ची ओढत बोलला.

‘मित्रा ती माझी वाईफ नाही. आय अ‍ॅम स्टिल अनमॅरीड. माझा फॉर्म तू वाचलास ना!’

‘आ! अहो पन त्या दिवशी तुमच्या घरी तर त्या वाईफ शिवाय काहीच वाटत नव्हत्या’, गण्या एकदम कोड्यात पडला होता. मला मात्र हे सगळ कारण नसताना ऐकत बसावं लागत होतं. दुस-यांचा आयुष्यात कय चालालं आहे, त्यात मला कधीच इंटरेस्ट वाटला नाही. म्हणून तर मी ते ‘डेली-सोप’ बघत नाही यार! पण नेमकी रात्रीच्या जेवणाला आई, बाबा आणि बायकोला एकच सिरीयल आवडते आणि ती जेवण संपेपर्यंत मला पहात बसावी लागते. तसच काहीसं आत्ता चाललं होतं.

‘अरे आय अ‍ॅम इन अ लिव्ह-इन रीलेशनशिप विथ हर! ती माझी बायको नाही, पण एकत्र रहातो आम्ही.’ 

आता लिव्ह-इन रीलेशनशिपचं मला काही नावीन्य नाही. म्हणजे मी कधी तसा होतो असं नाही, पण त्याचं वावगं वाटावं अशी विचारसरणी आता माझी नाही राहिली. तसे खूप किस्से ऐकण्यात येतात आजकाल, आणि मुख्य म्हणजे आय डोन्ट केयर. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. पण शेजारी बसलेल्या शेलार काकूंना काही हे पटलं नाही. त्या एकदम ‘बाई, बाई!’ असं म्हणून उठून निघूनच गेल्या. मी आणि कोएल्हो एकमेकांकडे बघून हलकेच हसलो.

हळू हळू सगळ्यांचाच मनसोक्त ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही कॅन्टीनमधून बाहेर आलो. अचानक गण्या एका वॉर्डबॉयला घेऊन आला, आम्हा सगळ्यांच्या हातात एक-एक गुलाबी कापड दिलं आणि पुढे बोलू लागला,

‘आता ऐका! हे सगळ्यांनी आता अंगात घालायचं. तुमचे कपडे, घड्याळ, मोबाईल, पाकीट, सगळं तिकडे लॉकरमधे ठेवायचे.’

गुलाबी रंगाचे कपडे पाहून मला भयानक ऑक्वर्ड फीलिंग आलं. मी चेंजिंग रूम मधे गेलो आणि ती घडी उलगडली; एक बेबी-पिंक पायजमा आणि एक बेबी-पिंक शर्ट, असा यूनीफॉर्म होता तो. लाजत-लाजत मी ते अंगावर चढवले आणि खोलीच्या बाहेर आलो आणि हास्याचा भयानक मोठा अ‍ॅटॅक मला आला. हसू दाबत दाबत मी समोर पाहिलं, तर मी आणि सिद्धार्थ सोडून बाकीच्या सगळ्यांना बेबी-पिंक कलरचे गाऊन दिले गेले होते. गंमत म्हणजे ते गुडघ्यापर्यंतच असलेले गाऊन्स बाई-पुरूष असा लिंगभेद न ठेवता नुसते वाटलेच नव्हते, तर ते पब्लिकनी घातले सुद्धा होते. आमचे सूट पाहून त्या यू.एस. रीटर्न काकांना संताप आवरला नाही. ते तडक अजून काही ईसमांना घेऊन गण्याकडे गेले,

‘गण्या! धिस इज अटंर नॉनसेन्स. ही काय फालतू चेष्टा लवलीये!’

‘सगळ्यांनी शांत व्हा, शांत व्हा! ही काही चेष्टा नाहीये, हा हॉस्पीटलचा नियम आहे पुढच्या सगळ्या टेश्टसाठीचा’, गण्याने पब्लिकचा राग कंट्रोलमधे आणण्याचा प्रयत्न केला.

‘पण मग त्या दोघांनाच ते नाईट-सूट का बरं?’, आमच्याकडे बोट दाखवत बापट काकांनी विचारलं. पण हा खुलासा वॉर्डबॉयने केला,

‘अहो ते पेशंटसाठी असलेले कपडे आहेत. वॉशिंग मधनं चुकून इकडे आले असतील.’

आणि मग आम्हाला ते कपडे बदलून गाऊन्स घालायची माफक विनवणी त्याने केली. मी आणि सिद्धार्थ कशाला देतोय ते कपडे परत! स्टूल टेस्टच्या वेळेस सुद्धा मी आणि सिद्धार्थच फक्त हसत सुटलेलो. एकतर बेबी-पिंक हा रंग निवडणारी बहुदा स्त्रीच असावी, जिने मेडीकल कॉलेजमधे सुद्धा ‘व्हॅलेंटाईन डे’ ची कार्ड आणि गुलाब गोळा केल्याशिवाय दुसरं काहीच नसेल केलं. गुलाबी रंगापर्यंत ठीक होतं, पण ते गाऊन प्रकरण कमालीबाहेर लाजीर्वाणं होतं; स्पेशली पुरूषांसाठी. नाकं मुरडंत का होईना पण लोकांनी ती वस्त्रे परीधान केली. पण ह्या सगळ्यात उठून कोण दिसत असेल तर ती म्हातारी मावशी. कपाळावर एक इंच रेडीयस चे कुंकू, अंगात तो पिंक गाऊन आणि गळ्यात गंठण, मोहनमाळ, चपलाहार, ठुशी, एक मोठ मंगळसूत्र, आणि एक जाड सोन्याच्या मण्यांची माळ, इतकं सगळं दाखवत ती एका बाकावर बसली होती. ह्या ऊपर ते पायातली जोडव्यांची रांग आणि हातात दोन-तीन अंगठ्या.

तिला पाहून गण्याची बडबड सुरू झाली,

‘अबबब...! मावशे, प्रत्येक टेश्ट नंतर डॉक्टर, नर्सला ईनाम म्हनून एखादा दागीना काढून देनार का काय!’

आणि मग ते सगळं सोनं काढून ठावावं लागणार हे तिला पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. दहा-पंधरा मिनीट झाले तरी म्हातारी ऐकेना. शेवटी रीसेप्शनमधे बसलेल्या तिच्या नव-याला बोलावणं पाठवावं लागलं, तेंव्हा कुठे म्हातारी तयार झाली.

आता ब्रेकफास्टनंतर पुन्हा ब्लड देण्याचा एपीसोड झाला. त्यानंतर आम्ही सगळे स्पाईन, म्हणजे मणका आणि छातीच्या एक्स-रे साठी रांगेत बसलो. तितक्यात एक वॉर्ड-बॉय एका व्हील-चेयरवर एक कसाबसा जोडलेला माणूस घेऊन आला; दोन्ही पायात वरपर्यंत प्लॅस्टर, उजव्या हातात प्लॅस्टर आणि पूर्ण डोक्याला पट्टी गुंडाळलेली. डावा हात नशीबाने मोकळा होता, म्हणून त्याला एक एम.पी.थ्री. तरी धरून बसता आलेलं. त्याला आमच्याच रांगेत सगळ्यात पुढे जाऊन बसवलेलं. हे पाहून मावशीचं मातृत्व जागं झालं. ती अगदी जवळ बसलेली त्याच्या; आजूनच पुढे जाऊन म्हणाली,

‘काय झालं रे लेकरा?’

‘त्याला मराठी येत नाही आजे...’, पाठराखणीसाठी पाठवलेल्या वॉर्ड-बॉयनेच उत्तर दिलं आणि मग त्या पोराला म्हणाला, ‘वो तुमको पूछ रही क्या हुआ करके!’

कानात एम.पी.थ्री. घातल्यामुळे पोरगा ढिम्म.

वॉर्डबॉयने पुन्हा आवाज वाढवत विचारलं, ‘वो आजी पूछ रही, क्या हुआ तुमको!’

पोरगा मात्र एकदमच मग्न झालेला गाण्यांची लिस्ट वाचण्यात. वॉर्डबॉयने मग त्याच्या खांद्याला हलकेच धक्का देऊन त्याला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्या पोराने कानाताले लाऊड-स्पीकर काढले आणि त्याच्या कमालीच्या उद्धटपणाचे दर्शन घडवले,

‘तुमको समझ मे नही आता, मुझको उससे बात नही करनी! चुपचाप प्लॅस्टर निकालो, एक्स-रे निकालो और चलो वापस!’

हे ऐकल्या बरोबर वॉर्डबॉयने सरळ व्हील-चेयर मागे ओढली आणि रांगेच्या सगळ्यात मागे नेऊन उभी केली. इतक्या वेळचा रोल नंबर वन, एकदम रोल नंबर सत्तवीस झालेलं पाहून पोरगं खवळलं.

‘मेरेको कायको चिल्ला रहे! वो पब्लिक नही मान रही, उनको पूछो.’

वॉर्डबॉयचा फाजीलपणा त्या पोराच्या लक्षात आलेला, पण मग पब्लिककडे एक नजर टाकून तो पुन्हा एम.पी.थ्री. कडे बघण्यात दंग झाला.

‘अरं असं कशाला केलं? पोरगं कंटाळलं असंल. इतक्या प्ल्यास्टर मदी कोनपन कंटाळल’, अपमान होऊन सुद्धा मावशीची दया काही गेली नाही.

‘कंटाळला, तो का आम्ही! अगं आजे, दोन आठवडे झाले ते बेनं इथं आलय. आल्यापासून नुसतं खेकस्नं, नुसतं खेकस्नं! अगं याक्शीडेंट झाला त्यो सुद्धा रॉंग साईडनं येका म्हातारीला उडवल्यानंतर. ती बिचारी, तिस-या मजल्यावर, कायमची खाट पकडून बसलीये! पण ह्या भ*** चा माज उतरेना अजून.’

पब्लिक मान वळवून त्या पोराकडे बघत असतानाच एकदम नर्स पुन्हा एक-एकाचं नाव पुकारू लागली.


एक्स-रेची वेळ झालेली आणि माझा नंबर येईपर्यंत मी शेजारी बसलेल्या माणसाची फालतूच्या गप्पा मारत बसलो. वेळ ढकलणे... बस्स!

(...क्रमश:...)


`काय सांगू राव' च्या फार म्हणजे फारच प्रेमात पडला असाल तर फेसबुक वर जरूर `Like' करा.


फेसबुक पेज वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

4 comments:

  1. Samir aaj P. L. sahebanchi athavan kadht part-3 vachala. Zakas jamlay... Gr*! Tu asach lihit ja

    ReplyDelete
  2. Thanks Prashant! P.L. saaheb he ek University aahet. Faar tar faar tithlyaa ekaa nursery cha me student mhanavu shakato.

    ReplyDelete
  3. मस्त रे मित्रा... गण्या छा रहा है...

    ReplyDelete