Thursday, November 3, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग २...)‘रक्त तपासनीसाठी रांगेत बसा. एका वेळेला दोघंजन आत जायचं... ओ काका ते कार्डं काखेत घालू नका ओ, किती वेळा सांगू आता!’, गण्या पुन्हा आमच्या वर्गाचा मॉनीटर झालेला.

मी सगळ्यात पुढे जाऊन बसलो. माझ्या शेजारचे एक गृहस्थ, माझ्या कार्डाची, स्वत:च्या कार्डसोबत तुलना करत बसले होते.

‘तुझ्या टेश्ट जास्त कशा रेSSS?’, तुलनेचा रीझल्ट मला ऐकवत त्यांनी विचारलं.

‘काका माझा दहा हजारचा प्लॅन आहे, तुमचा पाच हजारचा.’

‘हे सगळे पैशे काढण्याचे धंदे बघ, दुसरं काही नाही.’


आता पैसे भरल्यानंतर मला कोणतच गिल्ट-फीलींग नको होतं. पण नको असलेलं संभाषण मला सूरू ठेवावं लागलं ‘अहो काका, पण आजच्या काळात हे महत्त्वाचं झालंय. मेडीकलचे येणारे खर्च टाळता येतात.’

‘उगी बोलालास की बे! पालिश्या काढूनं जीव वाचतेत काय? हे उगी पैशे काढायचे धंदे असतेतं’, ह्या वाक्यातला सोलापुरी हेल लक्ख दिसून आला.

‘अहो पण काका, मग तुम्ही इथे कसे?’

‘ते माझा पोरगा पाठवला रे, मला इथं. मी नाहीच म्हणालो. हे सगळे पैश काढण्याचेच धंदेत बे.’

तितक्यात एक नर्स समोरून तरा-तरा चालत गेली आणि म्हाता-याचं लक्ष विचलीत झालं; मी सुटलो. आता माझं लक्ष इतर मेंब-सकडे गेलं. माझ्या समोर एक अत्यंत सुंदर मुलगी बसली होती. ती आल्यापासून सतंत मोबाईलवर बोटं नाचवत होती. त्यामुळे माझ्या सकट इतर कोणाहीकडे तिचं ध्यान जाईना. तिच्याच शेजारी ‘सिद्धार्थ’ नामक एक पोरगा बसलेला. हा पहीलाच ईसम ज्याच्याशी माझं इंट्रोडक्शन झालं होतं. त्यामुळे मला त्याचं नाव माहीत झालं. त्याच्या टी-शर्टवरती एक अतिभयानक चित्र होतं. एका माणसाच्या हनवटी खालून सुरा आत जाऊन डोक्यातून बाहेर आलाय आणि उजव्या डोळ्यातून हिरवं रक्त वाहातय, असलं चित्र होतं ते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना, ह्या पेक्षा विचार करायला लावणारं काहीच असू शकत नाही. सिद्धार्थ...सॉरी ‘सिडी’ ... स्वत: हनवटी खाली छोटीशी दाढी ठेऊन होता. फक्त ती दाढी ठेवण्यापेक्षा करायची राहून गेली आहे, असं वाटत होतं. केसांसाठी हेयरजेल परवडत नसावं, म्हणून त्याने नाराळाचं तेल लावून एक ताठ स्टाईल दिली होती, कारण त्या तेलाचा भपकारा मला पहील्याच भेटीत आला होता.

सिडीच्या शेजारी एक म्हातारी बसली होती; कपाळावर अत्यंत मोठं कुंकू, डोक्यावर काळ्या केसांचा पण छोटासा अंबाडा, अंगात हिरवी नऊवारी साडी, सुरकूतलेल्या हातात बांगड्या आणि पाटल्या, तर पायात जवळपास सगळ्या बोटात चांदीची जोडवी. ती इतकी कंटाळून गेली होती की दर तीस सेकंदाला जांभई देणं हे तिचं रूटीन झालं होतं. बाकी इतर सुद्धा बरीच मंडळी होती, पण मी त्यांना न्याहाळणार तोच नर्सने माझं नाव पुकारलं. माझ्या जोडीला ते सोलापुरी काका सुद्धा असणार होते.

खोलीत गेलो तर तिथे चार-बाय-पाचच्या जागे मधे आधीच चार-पाच जणं उभी होती, शिवाय दोन खुर्च्या आणि एक टेबल. प्रत्येक खुर्चीपाशी दोन-दोन मुली उभ्या होत्या. मी एका आणि ते काका दुस-या, असे खुर्चीवर बसलो आणि मग त्या नर्स एकदम उंच आवाजात बोलू लागल्या.

‘हां आता कापसाला स्पिरीट लावा ग पोरींनो!’

माझ्या समोर उभ्या असलेल्या मुलीने शिस्तीत सांगितल्याप्रमाणे माझ्या कोपराच्या मागच्या बाजूला स्पिरीटचा कापूस चोळला. दुसरी पोरगी तिच्या खांद्यावरून, नक्की काय प्रोसीजर असते, अशा नजरेने पहात होती. मात्र त्या काकाच्या टीम मधल्या दोन्ही पोरी ब्लँक चेहे-याने नर्सच्या तोंडाकडे पहात उभ्या राहील्या. म्हातारा त्याहून ब्लँक चेहे-याने त्यांच्या तोंडाकडे पहात बसला होता. 

‘काय झालं गं? थांबलात का अशा?’, नर्सने विचारलं.

‘कसं लाऊ म्याडम?’

‘अगं त्यात काये! शर्टंवर करा त्यांचा आणि चोळा की कापूस.’

‘उगी बोलालात की ओ! शर्ट कशाला वर करालात की!’, म्हातारा एकदम बावरून गेला.

‘अहो काका, म्हणजे बाही वर करायची,’ नर्सने खुलासा केला.

‘तसंय काय’ असं म्हणून म्हाता-याने बाही वर केली आणि त्यातल्या एका पोरीने हातावर कापूस चोळायला सुरूवात केली. ती इतकी ताण देऊन चोळू लागली की म्हाता-याचा काळाकुट्ट हात लालसर दिसू लागला.

‘अशीच थोडावेळ घासत बसलीस, तर सूई लावायची गरजंच पडत नाही बघ तुला; तसंच रक्त काढतीस बघ. स्पिरीट कोण लावनार म्हनतो मी’, म्हातारा जाम वैतागला होता. त्या पोरिनं कापसाला स्पीरिट लावलच नव्हतं; नुसताच ड्राय कापूस. मला सुद्धा ह्या सगळ्या मुली जरा चमत्कारीकच वाटू लागल्या होत्या आणि म्हणून मग मी मधे पडलो.

‘एक मिनीट, एक मिनीट... हे नक्की चाललंय काय? डॉक्टर आर यू ओके?’

‘डॉक्टर’ असं म्हटल्या बरोबर त्या पोरींना असं काही धन्य-धन्य फीलींग आलं, जे त्यांच्या चेहे-यावर स्माईलच्या स्वरूपात दिसू लागलं.

‘ऐय्या सर आम्ही डॉक्टर नाहीये काही!’

‘म्हणजे?’, मी आणि म्हाता-याने एकदमच भितीयुक्त स्वर काढला.

काही दिवसांपुर्वी, एका दुपारी, आमच्या दारात दोन मुली आल्या होत्या. ‘आम्ही की नाही दादा, फिफ्थ स्टँडर्डमधे आहोत. शाळेच्या रीनोवेशनसाठी कॉन्ट्रीब्यूशन कलेक्ट करतोय. फाईव हंड्रेड अँड वन हे मिनीमम हवंच हवं’, असं सांगून त्यांनी सगळ्या घरांमधून वसूली केली होती. सेम... अगदी तेच सेम वाक्य इथल्या एका पोरीने काढलं,

‘आम्ही की नाही सर, फर्स्ट ईयर मेडीकल चे स्टूडन्ट आहोत. कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी ब्लड सँपल्स कलेक्ट करतोय. वन हंड्रेड अँड फीफ्टी मिली-लीटर हे मिनीमम हवंच हवं’

‘प्रोजेक्ट! अहो कोणतं कॉलेज तुमचं?’

‘श्रीमती यमुनबाई दुधारे मेडीकल कॉलेज अँड रीसर्च सेंटर’

‘हे कुठं आलं की ओ?’, म्हातारा इतका टेन्स झालेला की नकळत त्याने त्याच्या समोरच्या पोरीचा हात घट्ट धरलेला; जसं आपण एखाद्या सुराधारी मारेक-याला आडवू ना, अगदी तसं. टेन्शनने त्याच्या पांढा-या टोपीच्या कडा सुद्धा घामाने ओल्या झालेल्या दिसत होत्या. आय मस्ट अ‍ॅडमीट, मला सुद्धा जरा धडधडू लागलेलं.

‘काका पुण्यातच आहे आमचं कॉलेज, वडगावशेरीला.’ ह्या नावाचं ‘मेडीकल कॉलेज अँड रीसर्च सेंटर’ पुण्यात आहे हे ऐकून मी चाटच पडलो.

‘अहो पण दीडशे एम.एल.! इतकं कशाला लागतंय स्टडीसाठी?’, मी जरा इरीटेट झालेलो आता, पण तितक्यात ती नर्स बोलली.

‘तुम्ही नका हो टेन्शन घेऊ साहेब. मी आहे ना सुपरव्हीजनला...’ आणि मग त्या काका समोरच्या बावरलेल्या मुलीकडे बघून म्हणाली, ‘... हां तू स्पिरीट लाव आधी आणि मग सूई लाव. बाकीच्या सगळ्याच बघून घ्या गं नीट. मी पुन्हा पुन्हा सांगत नसते.’

मग त्या पोरीने स्पिरीट लावलं काकाच्या हाताला. तिचा हात तिथेच कापायला सुरू झालेला. ते पाहून काकाचे डोळे, हात आणि पाय कापू लागले.

‘मूठ आवळा, मूठ आवळा घट्ट’, नर्स ओरडली. म्हातारा जीव खाऊन मूठ आवळू लागला.

‘काका अजून जोरात आवळा’, सुई लावणा-या पोरीच्या मागची पोरगी आता बोलली. म्हाता-याने आता दात ओठ खाऊन ताकद लावायला सुरूवात केली; मी श्वास रोखून स्तब्ध, आणि तितक्यात, 

‘जा बाई नाडीच सापडेना!’, 

असं म्हणून भातुकलीचा खेळ अर्धवट टाकून एखादी मुलगी कशी उठून निघून जाईल, तशी ती भावी डॉक्टरीण एकदम मागेच सरकली.

‘उगी बोलालात की ओ! इतका आवळायलो मी की हातंच काय, सगळ्याच नाड्या सुजल्यात. कुठही नुसती टिचकी मारा, रक्त उडतय बघा...’ आणि मग एकदम माझ्याकडे बघून, ‘... हे बघा, सगळे पैशे काढायचे धंदे!’

म्हाता-याचा वैताग चुकीचा नव्हता; ईव्हन आय वॉज फ्रस्ट्रेटेड. तरी मी शांत राहीलो आणि त्या नर्सनाच एकदा करून दाखावायला सांगीतलं. फार त्रास आणि कष्ट पडत असल्यासारखं, नर्स तोंडाने ‘मिचीक’ असा आवाज काढून पुढे आली.

‘आता तुम्ही सुरू करा गं’, नर्सने माझ्या टीम मधल्या पोरींना सूचना दिली; मी आवंढा गिळला. जशी ती पोरगी कापूस घासू लागली, तसं मी घट्ट डोळे मिटून घेतले. मला इंजेक्शनची तशीही थोडी भिती वाटतेच. काही वेळातच सूईचं टोक माझ्या शरीरात प्रवेश करतंय ह्याची मला जाणीव झाली. पण पोरीचा हात कमालीचा हलका यार! सुई टोचल्याची जाणीव सुद्धा नाही झाली, आणि मी रोखलेला श्वास निश्चिंतपणे सोडला; डोळे मात्र बंद ते बंदच.

‘भरतकाम करायलीस की गं! ओ नर्स, ते नुसतं कातडीत खुपसलीये; ते बघ की जरा तिकडं!’

म्हाता-याचं हे वाक्य ऐकून मी ताडकरून सूईकडे पाहीलं. त्या पोरीने चक्क माझी नुसती कातडीच उकलून त्यातून सूई आत ढकलली होती. तरी म्हटलं मला काहीच कसं फील झालं नाही!

आता मात्र नर्स वैतागून पुढे आली आणि तिने अत्यंत निर्दयीपणे सूई नुसती उपसलीच नाही, तर ती पुन्हा खुपसली सुद्धा, आणि हे सगळं माझ्या नजरेसमोर एका क्षणार्धात घडलं. मी इतका जोरात ओरडलो की बाहेरची काही मंडळी आत डोकावून पाहू लागली. वेदना आणि संताप, शिव्यांच्या स्वरूपात एकदम बाहेर पडणार तोच मी स्वत:ला आवरलं. डोळ्यात तरारलेलं पाणी पुसत मी म्हात-याकडे पाहीलं आणि म्हणालो,

‘काका, हे सगळे पैसे काढण्याचे धंदे बघा’. 

‘नाही ओ, ते पोरी शिकतेत की ओ! ह्यात कसलं आलय पैशे. कायतर बोलालात की!’, म्हातारा असा फिरेल वाटलं नव्हतं मला. असो!

त्यानंतर बी.पी., हाईट, वजन वगैरे ह्यांची नोंद झाली. कापूस हातामधे घट्ट दाबून, मी आणि काका खोलीच्या बाहेर आलो. बाहेर आल्या बरोबर, एक भांडण चालू आहे, असं समजलं. मी उशीरा येऊन सुद्धा सगळ्यात आधी ब्लड-टेस्टला कसा काय गेलो, हे एका मेंबरला खटकलं होतं. 

‘धिस इज नॉनसेन्स! अटंर रीडीक्यूलस! आय वॉज इन दी यू.एस. फॉर फिफटीन ईय-स...’ हे सांगताना त्यांनी एकदा आम्हा सगळ्यांना, एक भुवई उंचावून नीट पाहीलं, ‘... फिफटीन ईय-स. पण हे असलं मिस-मॅनेजमेंट! इम्पॉसीबल!...’

ते अजून काही पुढे बोलाणार होते, पण मग गण्यानेच आणि इतर काही मेंबरांनी ते सेटल करून मला मधला एक नंबर दिला. पहिल्याच जोडीला इतका उशीर लागल्यामुळे, सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली.

‘उगी बारक्या पोरींना कामाला लावलेतं, म्हणून टाईम लागायलाय’, माझ्या सोलापुरी पार्टनरने हा खुलासा केल्या बरोबर अजून एक भांडण झालं. भांडणाचे लीडर पुन्हा तेच यू.एस. रीटर्न. काही-काही लोकांना अशी खुमखुमी असते यार! भांडणाचा मुद्दा कीतीही का क्षुल्लक असेना, पण स्वत:चा पॉईन्ट मांडणार म्हणजे मांडणारंच. मग काही डॉक्टर तिथे हजर झाले आणि त्यांनी त्या पोरींच्या स्टडीमधे व्यतय आणला. बिचा-या सूया टोचून-टोचून छान रमल्या होत्या. त्यांना मग तिथून दुस-या कुठल्यातरी डीपार्टमेन्टला पिटाळलं.  पण जाता-जाता त्यातली एक वैताग व्यक्त करून गेलीच,‘अगं छटाकभर रक्तात काय स्टडी होनार शलाका! मला तर बाई टेन्शनंच आलय. आधीच एक बाटली फुटली आत, अन आता ही एकच...’


हे ऐकून एक बारीकशी कळ माझ्या हाताला आणि एक काळजाला, एकदमच आली. मी काहीच ऐकलं नाही असं एक्सप्रेशन ठेऊन इकडे तिकडे पाहू लागलो. कारण नसताना एक दोन अनोळखी लोकांना स्माईल वगैरे सुद्धा दिले.


बाकीच्यांच्या टेस्ट्स आता भराभरा मार्गी लागल्या. नशीब, टेस्टसाठी मी छटाकभर का असेना, पण वेगळं सॅम्पल देऊन आलो होतो.


आता मी पुन्हा माझ्या कार्डकडे पहीलं. त्यात आधी होता ब्रेकफास्ट, मग पुन्हा ब्लड आणि त्यानंतर छातीचा आणि मणक्याचा एक्स-रे.


(क्रमश:)10 comments:

 1. Samya, Solapuri kaka faracha chan ahe."उगी बोलालात की ओ! शर्ट कशाला वर करालात की!" he tar agadi kadak ahe.

  ReplyDelete
 2. Simply grrrrrrr8! khup sundar. anakhi curiosity vadhali ahe . lavakar lihire.......................

  ReplyDelete
 3. शब्दांची मांडणी छान केली आहे सम्या.
  keep it up.

  ReplyDelete
 4. सगळे पैशे काढायचे धंदे...

  स्पिरीट, कापूस आणि इंजेक्शनची सुई मस्त जमलय मित्रा...

  ReplyDelete
 5. thanks Nagesh and Prasad. Bhaag 3 lavkarach

  ReplyDelete
 6. ekch number :D

  ‘जा बाई नाडीच सापडेना!

  mala ek choti mulagich disali gaal fugavun asa mhananari !!! n vaitagalele, ghabarlele kaka pan :)

  ReplyDelete
 7. :D Thanks Sanjeevani! Enjoy and keep reading!

  ReplyDelete
 8. Solapuri kaka bhari..khupch chan..
  उगी बोलालात की ओ! शर्ट कशाला वर करालात की!... :):)
  भरतकाम करायलीस की गं! ओ नर्स, ते नुसतं कातडीत खुपसलीये...
  :):)
  he vachatana feels like someone really talking in Solapuri tone.... :) good one

  ReplyDelete