Monday, October 24, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग १...)

बाप! किमान शंभर व्याख्या सहज असतील ह्या शब्दाच्या. लग्न झालेल्या पोरींच्या डोळ्यांच्या कडा सहज ओल्या करणार हा विषय आहे. पण तो क्षण, जेंव्हा एक स्त्री आई होते आणि एक माणूस बाप होतो, तो क्षण मात्र बहुतेक लोकांचा एकसारखाच असावा. स्वत:च्या बाळाला अगदी पहिल्यांदा मांडीवर घेऊन पहात बसण्यात ज्या भावना जाग्या होतात, त्या बाप लोकांच्या डोळ्याच्या कडा सहज ओल्या करुन जातात. माझ्या आयुष्यात सुद्धा तो सुखद क्षण एके दिवशी आला. पहाटेच बायकोला अ‍ॅडमिट केल आणि सुमारे पाच-सहा तासात ‘गुड न्यूज’ हा प्रकार काय असतो, त्याची अनुभूती झाली. डॉक्टर बाहेर आले आणि ‘सगळं नॉर्मल आहे’ अस सांगून निघून गेले. मग दना-दन फोन बाहेर निघाले आणि आमच्या बाळाचा जन्म ही एक ग्लोबल न्यूज झाली. पुण्याच्या एका प्रख्यात मॅटर्निटी हॉस्पिटल मधले सगळे लोक माझ्याचकडे पहात आहेत असा भास मला होऊ लागलेल; किंबहुना तसं एक्सप्रेशनंच मी चेह-यावर ठेऊन वावरत होतो. अर्ध्या तासात एक मध्यमवयीन नर्स, अत्यंत मक्ख चेह-याने बाळाला बाहेर घेऊन आली आणि त्याला माझ्या हातात दिल. ती पाठ फिरवून परतणार तोच मी तिला विचारलं,
‘नर्स! आणि माझी मिसेस...’‘सिस्टर म्हणा सिस्टSSSर!’, तेच मक्ख एक्सप्रेशन चेह-यावर ठेऊन तिने अत्यंत थंडपणे, पण जरा चढत्या स्वरातंच मला हटकलं.


‘बर सॉरी, सिस्टर! अहो पण माझी बायको कशी आहे ते सांगता का?’‘ठीक आहे’, असं म्हणून तिने पाठ फिरवली ती न परतण्या साठीच. म्हणजे एखाद्या टेस्टरला, त्याला नको असलेल्या प्रोजेक्टमध्ये काम करायला लावल्यानंतर जर विचारलं ‘काय रे किती डिफेक्ट आहेत?’, आणि जर तो ‘ठीक-ठाक’ असलं मोघम उत्तरला, तर मॅनेजरची जी चिड-चिड होईल, तीच माझी झालेली. नावडत्या व्यवसायात, अनिच्छेने काम करायला लागत असेल तर असा उत्साह निर्माण होत असावा.असो! मी दुर्लक्ष केलं आणि माझ्या सोन्याला मांडीवर घेऊन एका बाकावर बसलो. त्याचा अगदी पहिला-वहिला स्पर्श! सगळे कुटुंबीय घोळका करुन त्याला पहात होते. हॉस्पिटल मधे शांतता हवी असते म्हणून कुजबुजण्याचाच कल-कलाट चाललेला. अत्यंत भावूक क्षण होता तो. माझे डोले पाणावलेले, नाकातलं पाणी खाली पडू नये म्हणून मी चोंबाळून पुसत होतो. बहीण, आई, आजीची, ‘काय बाबा, कसं वाटतंय!’ अशी चिडवा-चिडवी चाललेली. दूर एका कोप-यात बाबांना हर्षवायूचा अ‍ॅटॅक आलेला. कोणालातरी मोबाईलवरून ते बातमी सांगत होते, आणि तितक्यात माझा फोन व्हायब्रेट झाला. अभिनंदनाचे कॉल्स येत होते म्हणून मी त्याच अपेक्षेने फोन कानाला लावला
‘अभिनंदन सर! नवीन बाळाच्या आगमनासाठी तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा’, समोरचा अनोळखी आवाज, अत्यंत उत्साहात बोलत होता.
‘थँक्स थँक्स. कोण बोलतंय?’   तमुक बँकेचं नाव घेऊन त्याने चक्क एका इंश्युरन्स पॉलिसीचा उल्लेख केला. मला जितका आनंद मुलाच्या जन्माचा झालेला, तितकाच धक्का ह्या ईसमाच्या पुढच्या वाक्याने झाला.
‘सर मी फार वेळ नाही घेणार तुमचा. आता जे बाळ तुमच्या मांडीवर झोपलं आहे, त्याचं आगमन हे सुखकारक, पण तितकंच जबाबदारीचं नाही का! तुम्ही एक जबाबदार फादर आहात याची मला पूर्ण खात्री आहे, आणि म्हणूनच आमची बँक आपल्या सारख्या सूज्ञ वडीलांसाठी ‘पित्रुत्व दातृत्व सुरक्षा’ असा प्लॅन घेऊन आली आहे.’मी खरं सांगू, माझं टाळकं सरकलं होतं! तासा भरात ह्या बँके पर्यंत हे सगळे डीटेल्स कसे पोहोचले हे गूढ मला सुटेना. मी त्याची बड-बड मधेच कापत बोललो‘अरे मित्रा आत्ता मी खरच ह्या मूड मध्ये नाहीये. प्रसंग काय, तुझं चाललंय काय!’पण तो अतीशय थंडपणे, ‘सर, तुम्ही रागावू नका, पण ही पोलिसी तुमच्या बाळाला ह्या क्षणापासूनच कव्हर करायला सुरु करतीये. आहो त्या बाळाकडे एकदा बघा...’मी मान खाली वाकवली तर बाळ माझ्या मांडीवर नव्हतच. ह्याच्या फोनच्या नादात, ते माझ्या आईने कधी तिच्या मांडीवर घेतलं, ते मला कळालं सुद्धा नाही.‘... एकदा बघा की तुमचं बाळ कीती निरागस, कीती डिपेंडंट आहे ते. पण समजा तुम्हाला ह्या क्षणाला काही झालं, काही अघटित घटना घडली, तर कोण आहे त्याच्या पाठीशी!...’आता ह्या क्षणाला असलं अभद्र कोण आणि कसं बोलू शकतो यार! पण हा बोलला आणि नंतर एक गिल्ट फीलिंग सुद्धा देऊन गेला.‘...अहो तुम्हाला तरी फार उशीरा जाणीव होतीये, नाहीतर काही जबाबदार पालक लग्नानंतर, आणि हनीमूनच्या आधीच, लगेचंच ही पॉलिसी उचलतात; मूल होईल तेंव्हा होईल’, जबाबदार पालक म्हणे! इतकं गिल्टी-गिल्टी वाटू लागलेलं म्हणून सांगू! पण तेवढ्यावंर हा थांबला नाही. पुढे टेंन्शन प्रक्रीया सुरू झाली.‘...आता तुमचं हॉस्पिटलचंच बील घ्या; अडोतीस हजार, सातशे बावन्न! हे असले खर्च आता वाढत जाणार. इंजेकशन्स, लशी, औषध, चेकंप्स, हे कमालीचं महाग आणि आवाक्या बाहेर आहे आज. तो सगळा खर्च आम्ही कव्हर करणार आहोत आणि शिवाय टॅक्स बेनीफिट सुद्धा!’जे बील मी अजून पाहीलं सुद्धा नव्हतं, ते ह्याला ‘सातशे बावन्न’ इतकं अ‍ॅक्यूरेट माहीत होतं. गंमत अशी होती की हा फोन कट करण्या ऐवजी मी कानावर का धरला होता हे माझं मलाच समजलं नाही. मला एक डाऊट आला, की हा माणूस माझ्यावर पाळत ठेऊन आहे, म्हणून मी नजर फिरवून एकदा पूर्ण होस्पिटल पाहीलं. सगळे मोबाईलवाले मला हा एजंट वाटू लागले. पण तेवढ्यात माझी नजर हॉस्पिटलच्या रीसेपशनकडे गेली. तिथे ह्या विख्यात बँकेने स्वत:चं टेबल टाकलेलं दिसलं आणि तेंव्हा सगळं गूढ उकललं गेलं. पुढचे सुमारे वीस मिनीट ह्या माणसाने मला इंन्श्यूरन्स प्लॅन सांगीतला आणि फायनली त्या दिवशी मी दोन बिलं फाडली; एक होस्पिटलचं, दुसरं हे ‘पित्रुत्व दातृत्व सुरक्षा’.महिने उलटंत गेले आणि तसं आमच्या बाळाच्या लशी, चेकप व तत्सम कार्य सुद्धा कालांतराने पार पडत गेले. आमच्या बाळाची पहीलीच पोलिसी इतकी बोगस निघाली की त्यांच्या ‘कंडीशन्स अ‍ॅप्लाय’ मुळे माझ्या हाती काहीच लागलं नाही. बर पुन्हा वरती ‘बारश्यासाठी पर्सनल लोनचे’ फोन सतत सुरूच. संतापून ‘कोणताच मेडीकल इंश्यूरन्स मी कधीच काढणार नाही’ अशी प्रतिज्ञाच मी घेतली.दैवंयोगाने म्हणा कींवा नशीबाने म्हणा, पण मला पुन्हा अशाच पॉलिसीच्या उंबरठ्यावर कोणीतरी आणून उभं केलंच. काही महीनेच उलटले होते आणि अचानक कंपनीतल्या एका मित्राचे वडील वारल्याची बातमी कळाली. त्यांची नुकतीच बायपास सर्जरी झालेली, पण नाही वाचले ते. अगदी जवळचाच मित्र आहे म्हणून खूप वाईट वाटलं. पण त्याच बरोबर अजून एक तपशील समजला की एकूण चार लाख रुपये खर्च आलेला काकांच्या ट्रीटमेंटला. ह्या विषयाचीच रीघ मागे ओढत मग ‘मेडीकल इंशूरन्स’ हा विषय पोरांनी माझ्याच क्यूबीकल मध्ये सुरू केला. अत्यंत विरोधात असलेलं माझं मन सुमारे तासाभराच्या डिस्कशन नंतर पुन्हा गिल्ट फीलिंगचं गाठोड घेऊन उभं होतं. आमच्या कंपनीत सत्यजीत नावाचा एक कामगार होता. होता म्हणजे तो अजून सुद्धा आहे, पण फार काळ एकाच कंपनीत ‘तो आहे’ असं म्हणायला तो टिकत नाही. आर्थिक गुंतवणूकीचा हा महागुरू. त्याला मी गाठलं आणि त्याच्याचकडून एका कडक ‘मेडीकल इंश्यूरन्सचे’ डीटेल्स घेतले. त्यानेच एका एजंटचा नंबर सुद्धा दिला जो मला त्याच संध्याकाळी भेटायला घरी आला.‘हिते, हिते, हिते, हिते, हिते आनि हिते’, फॉर्मवरती सह्यांसाठी फुल्या मारून दिल्या माझ्या एजंटने.‘आपलं नाव काय म्हणालात?’, मी त्याला विचारलं.‘गन्या!’‘गण्या, म्हणजे गणेश का गणपती?’, मला खरं तर थोडं हासायला येत होतं, कारण त्याने स्वत:ची सही सुद्धा ‘गण्या’ ह्या नावानेच केली होती.‘ते नावाचे डीटेल्स राहूदेत सर!’, गण्या थोडास ओशाळून उत्तरला. तितक्यात गण्याचा फोन वाजला. फोन उचलल्या बरोबर लगेचंच गण्या सुरू झाला.‘... हा बोला काका. तुमचा संडासचा काय शीन असतोय?’मला जरा धक्का मिश्रित एक ऑक्वर्ड फीलिंग एकदम आलं. पलीकडचा कोणी का असेना, पण फोन उचलल्या बरोबर लगेच हे स्टेटमेंट!‘...अहो काका म्हंजे तुमचा येत्या शनवारी मेडीकल चेकप असनारे. फुल्ल बॉडी चेकप! सकाळी सात वाजत तेश्ट सुरू होतेत. पहिलीच श्टूल टेस्ट अस्तिये. तसंच यायचं, परसाकडला न जाता...’, गण्या रूल्स सांगू लागला. मी अंदाज बांधला की हे मला सुद्धा लागू असणारेत. म्हणून गण्याचं मी पुढे ऐकू लागलो, ‘... लागलीच रक्त तपासनी असतिये काका. म्हनून बारा तास आधी पासूनच जेवन-खान बंद. पोट मोकळं असावं लागतय तिथं. चेकपला भरपूर गर्दी असतीये. सकाळी सहालाच रांगेत थांबायचं, म्हंजे दुपारी चार पर्यंत मोकळे होता तुम्ही. मी असतोच तिथं. सगळे नियम लक्षात ठेवा काका आनि भेटा शनवारी सकाळी हॉस्पिटलमधे.’, हॉटेल मधला वेटर मेनू जसा सांगतो, तसं हे सगळं मला सुद्धा रीपीट करून गण्या घराबाहेर पडला. मला बाकी कशाचच टेन्शन नव्हतं, फक्त इतक्या सकाळी उठण्याचं सोडून.फायनली तो शनीवार उजाडला.पहाटे पाचचा गजर लावून मी अंदाजे सहाला उठलो. बारा तासाचा उपास होऊन सुद्धा मला भूक लागली नव्हती. प्रातरविधी उरकायचे नव्हते, बट आय वॉज स्टिल कंफरटेबल. ब-याच वर्षांनी इतका सकाळी बाहेर पडलो होतो मी. मस्त वाटत होतं! साधारण पावणे-सात वाजता हॉस्पिटल मधे पोचलो. इतकी सकाळ असून सुद्धा हॉस्पिटल अगदी गजबजलं होतं. बहुतेक लोक पेशंटचे नातेवाईक, किंवा हॉस्पिटल कर्मचारी वाटत होते. मी थोडा बावरल्यासारखाच इकडे-तिकडे पहात होतो.‘ओ साहेब... इकडे इकडे!’, गण्याचा आवाज ज्या दिशेनी आला, तिकडे मी पाहीलं. जवळपास पंधरा-वीस लोकांनी त्याला गराडा घातलेला. सगळ्यांच्या हातात एक-एक कागदी कार्ड होतं, माझ्याही हातात गण्यानी एक कार्ड दिलं. त्यावर माझ्या टेस्ट्सची यादी होती.‘बरं नीट ऐकायचं सर्वांनी आता... ओ तात्या ते कागद काखे घालू नका, घामानं बरबटतंय ते... हां, तर आता आधी ब्लड टेश्ट, यूरीन टेश्ट, मंग बी.पी., आनि बाकीचं नंतर बघूत... ताई फेसबुकवर नंतर टाका माझा फोटो, आधी नीट ऐका... तर ब्लड नंतर नाष्ता... नाषत्या नंतर पुन्हा ब्लड...’, गण्या मला मुकादम वाटू लागलेला आणि आम्ही रोजंदारीवरचे कर्मचारी.‘अहो पण ते स्टूल टेस्टचं काय म्हणालेलात?’, एका काकांनी गर्दीतून मान वर करून विचारलं. त्यांच्या चेह-यावर थोडी, आणि शरीराच्या हालचाली मध्ये कमालीची तगमग दिसत होती मला. शेजारी एक माझ्याच वयाचा मुलाचं सतंत येर-झार्या घालणं चाललं होतं. त्याचं शारीरीक प्रेशर त्यांच्या चेहे-यावर स्पष्ट दिसू लागलेलं. मी अजून सुद्धा निवांत होतो; सकाळचा पहिला चहा झाला नव्हता ना!पण तेवढ्यात गण्याने खुलासा केला ‘... ओ काका जरा निवांत घ्या. सगळं करतो मी बरोबर.’, आता ह्या केस मधे हा काय बरोबर करणार होता ते त्यालाच ठाऊक. ह्या प्रेशरला लपवण्याचा प्रत्येकजण कसोशीन, पण सोसत-सोसत प्रयत्न करत होता. एक-दोघं जण सतंत येरझार्या मारत होते. येणा-या जाणा-या नर्सेसचं त्यामुळे सतंत ‘ओ काका बसून घ्या, ओ मावशी बसा-बसा!’ असं चाललं होतं. बाकीचांच्या पद्धती निरनिराळ्या असतील, पण हेतू एकच. एक माणसाचं तर सतंत भुवया वर उडवून ‘हुशSSS! हुशSSS!' असे लांब सुसकारे टाकणं चाललेलं. मला अश्या टाईपचा सीन चालू असताना हसू कंट्रोल होत नाही. आपलं नाणं खरं असताना कसलंच टेन्शन नाही ना यार!


पंधरा-वीस मिनीट झाले तरी काही कोणीच आमची विचारपूस करेना. तितक्यात एक नर्स त्याच काकां समोर येऊन थांबली,


‘काका स्टूल...’, काका म्हणजे त्या नर्सला कुठे ठेऊ आणि कुठे नको असा आविर्भाव ठेऊन उठले.


‘हो हो... चला चला’


नर्स मात्र एकदम ब्लँक, ‘ओ काका कुठे चालले? तुमच्या खालचा स्टूल घ्यायले आले मी. तुम्ही बसा तिकडे’. काका बिचारे केविलवाणं एक्सप्रेशन घेऊन शेजारच्या बाकावर जाऊन बसले.सुमारे अर्धा तास उलटून गेला तरी हॉस्पिटल कडून काहीच हालचाल होईना. काहीजण आता निपचित पडतात की काय असं वाटू लागलेलं आणि तितक्यात एक लेडी-डॉक्टर धावत येऊन गण्याचा शोध घेऊ लागल्या. तो नाही सापडला आमच्यात म्हणून मग त्याला फोन लावला.‘गण्या, कुठे आहेस तू? ताबडतोब इथे ये आधी...’, डॉक्टर भडकल्या होत्या, पण मग फोनवरच गण्याला झाडू लागल्या.‘अरे मूर्खा ह्यांना स्टूल टेस्ट आहे असं कोणी सांगितलं? तुला कोण सांगितला हा आगाऊपणा करायला! ...... अरे तुझ्या काकांची करावी लागली, कारण त्यांना जंताचा विकार होता...... गण्या म्हणून काय सगळ्यांनाच करायला लावशील का!’, आता मात्र मला आणि अजून एकाला हसू कंट्रोल होईना. म्हणजे स्टूल टेस्ट मुळात नव्हतीच! गण्याला सगळे शिव्या घालत होते, पण मी जाम खुश झालो. तश्या ह्या टेस्ट्स एक बोरींग काम असतं. पण सुरुवातच इतकी दंगा! माझ्या आणि त्या दुस-या मुलाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं, इतके आम्ही हसत होतो. इन-फॅक्ट अनोळखी असून देखील टाळ्या दिल्या आम्ही एक-मेकांना. बाकीच्या त्रस्त लोकांना हा पांचटपणा नसेल आवडला बहुतेक, कारण आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न बरेच जण करताना दिसले. डॉक्टरनी खुलासा केल्या बरोबर जी धावपळ सुरू झाली की बस. इतकं पॅनिक झालेलं पब्लिक की आमच्या मागेच असलेलं शौचालय कोणालाच नाही दिसलं. त्यात एकाच हॉस्पिटल मधे इतकी सोय कशी असणार. त्यामुळे बाकी काहीजणं हॉस्पिटलच्या समोर असलेल्या ‘सशुल्क सुलभ शौचालया’ मध्ये शांत होऊन आले.एक-एक करून मग बाकी पब्लिक सुद्धा परत आलं आणि फायनली आमच्या टेस्ट्स सुरू झाल्या. आता पहिली होती ती ब्लड टेस्ट...(क्रमश:)

No comments:

Post a Comment