Monday, October 24, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग १...)

बाप! किमान शंभर व्याख्या सहज असतील ह्या शब्दाच्या. लग्न झालेल्या पोरींच्या डोळ्यांच्या कडा सहज ओल्या करणार हा विषय आहे. पण तो क्षण, जेंव्हा एक स्त्री आई होते आणि एक माणूस बाप होतो, तो क्षण मात्र बहुतेक लोकांचा एकसारखाच असावा. स्वत:च्या बाळाला अगदी पहिल्यांदा मांडीवर घेऊन पहात बसण्यात ज्या भावना जाग्या होतात, त्या बाप लोकांच्या डोळ्याच्या कडा सहज ओल्या करुन जातात. माझ्या आयुष्यात सुद्धा तो सुखद क्षण एके दिवशी आला. पहाटेच बायकोला अ‍ॅडमिट केल आणि सुमारे पाच-सहा तासात ‘गुड न्यूज’ हा प्रकार काय असतो, त्याची अनुभूती झाली. डॉक्टर बाहेर आले आणि ‘सगळं नॉर्मल आहे’ अस सांगून निघून गेले. मग दना-दन फोन बाहेर निघाले आणि आमच्या बाळाचा जन्म ही एक ग्लोबल न्यूज झाली. पुण्याच्या एका प्रख्यात मॅटर्निटी हॉस्पिटल मधले सगळे लोक माझ्याचकडे पहात आहेत असा भास मला होऊ लागलेल; किंबहुना तसं एक्सप्रेशनंच मी चेह-यावर ठेऊन वावरत होतो. अर्ध्या तासात एक मध्यमवयीन नर्स, अत्यंत मक्ख चेह-याने बाळाला बाहेर घेऊन आली आणि त्याला माझ्या हातात दिल. ती पाठ फिरवून परतणार तोच मी तिला विचारलं,
‘नर्स! आणि माझी मिसेस...’‘सिस्टर म्हणा सिस्टSSSर!’, तेच मक्ख एक्सप्रेशन चेह-यावर ठेऊन तिने अत्यंत थंडपणे, पण जरा चढत्या स्वरातंच मला हटकलं.