Monday, June 13, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग ३...)

लिफ्ट देणे-घेणे ह्यात खरंतर मी वेगळं असं काही करतोय असं मुळीच नाही; नाही म्हणजे कौतुकास्पद वाटवं असा इव्हेन्ट नाहीच आहे तो. पण आज लिफ्ट देण्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये मला एकदाही नॉर्मल माणसं भेटलेली नहीयेत. ह्याचाच अर्थ ह्या जगात कोणीही नॉर्मल नाही हेच सिद्ध होतं. गंमत अशी की लोकंही काही वेळातच पर्सनल गोष्टी शेयर करू लागतात. अनोळखी माणसासमोर स्वत:ची सुख-दुख: उलगडायला कसलीच शरम नाही कींवा रीस्क नाही. कोणाच्या घरी मृत्यू झालेले असतात म्हणून चक्क थोडी रडारड, तर कोणी आजोबा झालेला असतो तर त्याच्या नातीचं त्याच कौतुक. कोणाचं अप्रेझल बकवास झालेल असतं म्हणून मॅनेजरला शिव्या, तर कुणी नवा धंदा सुरू केलेला असतो ह्याच्या प्लॅनची उमेद. आणि हे ऐकायच्या बदल्यात आपण काय देतो! कान आणि गाडीचं सीट. आपला प्रवास कुठून कुठेही असू शकतो. लोकं निराळी, त्यांचे एक्सपीरीयन्स निराळे आणि स्वभाव तर त्याहून निराळे. असाच एक प्रवास म्हणजे आमची शिर्डी यात्रा. मी आणि माझा मित्र सचिन, असे आम्ही दोघेच शिर्डीला जायच ठरवलं. साईबाबांच्या कृपेनेच, आमच्या बाबांनी कारने जायची परवानगी दिली. पुणे-शिर्डी हा प्रवास तसा तीन ते साडे-तीन तासांचा. पण ध्यानी-मनी नसताना असं एक कुटुंब सोबत आलं की ज्यामुळे मी आज सुद्धा सच्याच्या थोतरीत ठेवून देऊ शकतो.साधारण सहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सचिन देशपांडे हा माझा अगदी बालमित्र; अगदी म्हणजे अगदी नर्सरी पासून आम्ही एकत्र. त्याने आणि मी चिकार भटकंती केली. असंच आम्ही शिर्डीला जायचं ठरवलं. आमच्या सोबत सच्याचे मामा, मामी आणि त्यांचा मुलगा यायचं ठरलं. मला तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण सच्याचा हा दिग्या मामा हा अत्यंत खवचट स्वभावाचा आणि मामी ही अत्यंत उर्मट. यांच्या स्वभावाचा नमूना म्हणजे हा मामा लग्नात स्टेजवर नव-या मुलाला म्हटलेला,

‘हिच्याशीच लग्न करायचं होतं तर आमच्या शेजारच्या खोटेंची मुलगी काय वाईट होती! दणक्यात लग्न राहूदेत रे; नसेल तुझ्या सास-याची ऐपत. पण कीमान सरळ नाकाची मुलगी तरी नक्कीच मिळाली असती तुला.’

आणि हे सगळं मुलीच्या बापाच्या कानवर पडेल असं चाललेलं. मुलीला काही ऐकू आलं नाही असं जर वाटत असेल तर तो गैरसमज झाला, कारण तिच्या कॉन्फीडन्सचं खोदकाम मामी करत होत्या,

‘काय गं, काय म्हणतोय निलेश! दिसला नाही आज इथे. मला तर बाई वाटलेलं तुझं त्याच्याशीच लग्न होणार. तुमचं अफेयर तसं बरच गाजलं होतं बाई! फारच रोमॅन्टीक. तो कशाला येतोय म्हणा!’ पाठवणी च्या वेळेस ती पोरगी आणि तिचा बाप त्या निलेशच्या आठवणीनेच जास्त रडले असावेत.

हे असलं अघोरी कपल आमच्या सोबत येणार होतं. चार तास; तब्बल चार तासांचं मला भयानक दडपण आलेलं. तरी सच्याला बजावलेलं, तर तो ‘थोड अ‍ॅडजस्ट कर यार, एल्स मला लाईफ-लॉन्ग ऐकून घ्याव लागेल.’

सच्याच्या दोस्ती खातर मी ह्या कपल सोबत यात्रेला तयार झालो, आणि त्या दिवशी पहाटे पाच वाजता आम्ही दोघे दिग्या मामाच्या गेट समोर थांबलो. सुमारे पंधरा मिनीटांनंतर मामा, मामी आणि त्यांचा दहा वर्षांचा मुलगा बाहेर आले. मामींच्या हातात आरतीचं ताट होतं आणि मामांच्या हातात नारळ आणि एक सूटकेस होती.

‘बघीतलस सम्या. तुझ्या लक्षात नाही राहिला माझा बर्थ डे, पण मामी ओवाळायला ताट सुद्धा घेऊन आली. अरे बदलतात माणसं. वी शुड अ‍ॅप्रीशीयट दॅट चेंज इन देम.’

माझं आणि माझ्या अनेक मित्रांच एक कन्फेशन आहे. आम्हाला कुणाच्याच बर्थ-डेट्स लक्षात नाही रहात. इन-फॅक्ट ‘आज माझा बर्थ-डे आहे, साल्या विश कर मला’ असे कॉल सुद्धा आलेत मला अनेक वेळेला. आजकाल फेसबुकमुळे हे काम सोपं झालंय. मी लगेच सच्याला विश केलं आणि आम्ही सच्याच्या ओवाळणीसाठी खाली उतरलो. पण सच्याचा अपेक्षाभंग मामीने एका सेकंदात केला. मामी अचानक गाडीलाच ओवाळू लागली आणि मामा गाडीच्या बंपरपाशी उभे राहिले. दोघेही कोणतातरी मंत्र पुट-पुटत होते. मला सच्याचा चेहेरापाहून लई हसू येत होतं पण मामानी तितक्यात एक जोरदार आरोळी ठोकली,

‘बम भोले! जय श्री साईनाथ महाराज!’, असं ओरडले आणि माझ्या कारसमोर तो नारळ बॉम्ब फेकावा तसा फेकला. हाईट म्हणजे तो नारळ न फुटताच बाऊन्स झाला आणि कारच्या बंपरला आपटला. एक आठवडा; यार फक्त एकच आठवडा जुनी होती कार त्या वेळेस. डेन्ट इतका मोठा होता की शिर्डी ट्रिपचा दुप्पट खर्च त्यात ओतावा लागणार हे दिसत होतं. लहान मूल धडपडल्यावर त्याचे आईवडील कसे धावत जाऊन त्याची जखम बघतात ना, तसे मी आणि सच्या पुढे सरसावलो आणि कारचा डेन्ट पाहू लागलो. मी काही बोलणार त्याच्या आत मामाच बोलले,

‘बघीतलस दामिनी ... ’, दामिनी म्हणजे मामी बरका, ‘... ही म्हणे नवी गाडी ह्यांची. ह्या आजकालच्या फडतुस गाड्यांमध्ये भिकारचोट मटेरीयल वापरतात आणि विकतात बिंधास्त. साधा नारळाचा टच सहन नाही करू शकली.’

नारळाचा टच! माझा संताप त्या पहाटेच्या अंधारात सच्याला सोडून कोणालाच नाही दिसला. तो म्हणाला,

‘जाऊन देत सम्या. मी देतो हा डेन्ट काढण्याचा खर्च. आता वाद घालत बसलो तर पूर्ण ट्रिप खराब होईल.’

मामानी मग मुकाट्याने तो नारळ पुन्हा उचलला आणि पुन्हा आपटला. ह्या वेळेस मात्र तो फुटला राव आणि मग आम्ही माझ्या फुटक्या नशीबाच्या कार मध्ये बसलो. मामांच्या कारट्याने ड्रायव्हर शेजारच्या सीट वर बसण्याचा हट्ट धरला. मामा सुद्धा चापटर. त्याच्या पोराला समजावण्याच्या नादात सच्याला ते सीट मामाच्या स्वाधीन कराव लागलं. मग मागच्या सीटवर सच्या, मामी आणि ते कार्ट, असे तिघे बसले.

गाडीत बसलो आणि अचानक मामी ओरडल्या

‘अरे थांब थांब, लिंबू राहीलाच की!’

हे लिंबू चाकाखाली चिरडायची प्रथा का आणि कशी सुरु झाली हे मला जाणून घ्यायचय. मला कुणाच्याही धार्मीक भावना दुखवायची इच्छा, आकांक्षा आणि गरज
नाहीये. मला फक्त रुढीवादामध्ये वास्तव शोधायला आवडतं. तरी सच्या मामींच्या सांगण्यावरुन लिंबू चाकाखाली ठेवायला उतरला. तो उतरला आणि ते कार्टं
पुन्हा हसलं आणि म्हणालं,

‘लिंब्या उतरला लिंबू घेऊन’

लहानपणी मोठ्या भावाला असं काही म्हणालो असतो तर आईने थोबाडात ठेऊन दिली असती. इथे मामी स्वत:च फिदी-फिदी हसून म्हणाल्या

‘ह्याचा सेन्स ऑफ ह्यूमर फारच वाढलाय नाही का हो!’

मामी सोडून तो ह्यूमर कोणालाही समजला नाही, पण बारक्याचा आगाऊपणा मात्र मला समजला. मामा मात्र एकदम मक्ख तोंडानी बसले होते. ह्या माणसाच्या फेशीयल
एक्सप्रेशन्स मध्ये काहीच फरक नाही पडला. मी लहानपणापासून दिग्या मामाला सच्याच्या घरी बघत आलोय. माणस अपग्रेड होतात दिवसेंदिवस. दिग्या मामाची
स्थूल बॉडी, गोरा रंग आणि तुळ-तुळीत टक्कल सोडले तर बाकी तसाच्यातसाच हा माणूस. नेहमी व्हाईट कींवा ऑफ-व्हाईट रंगाचा बुश शर्ट, खाली डार्क निळी कींवा काळी पॅन्ट. पायात
पूर्वी चपला असायच्या पण आता फ्लोटर घालतो. डोळ्यामध्ये अत्यंत निरस एक्सप्रेशन आणि डोळ्यावर त्याहून निरस सोनेरी फ्रेमचा चष्मा. चेहेर्यावर निखळ हास्य असं कधी
नाहीच. हसलाच तर ते कुणाची तरी वाट लागल्याची बातमी देताना. स्वभाव अत्यंत उद्धट आणि तापट. माझातरी क्वचीतच संबंध आला ह्या फॅमीलीशी,
पण त्यांच्या नातलगांमध्ये सुद्धा ना यांनी कधी कोणाला जवळ केलं आणि ना यांना कोणी. तसे मूळचे नाशिकचे हे, पण कॉलेज रोडचा पत्ता सुद्धा माहीत असेल की नाही ह्याची गॅरेंटी नाही. थोडक्यात, आयुष्य हे ‘आम्ही प्रॅक्टीकल आहोत’ हे लेबल लावून जगणारी माणसं. पण ‘प्रॅक्टीकल’ हा शब्द बहुतेक लोक ‘सेल्फ-सेंटर्ड’ अर्थात ‘आत्मकेंद्रीत’ च्या ऐवजी वापरतात हे त्यांना माहीत नसतं.

असो, तर सच्यानी लिंबू ठेवला चाकाखाली आणि मग पुन्हा येऊन बसला गाडीत. मामी आणि तिच्या पोराचं हसणं चालूच तोवर.

मी गाडी सुरु केली आणि रीव्हर्स घेऊ लागलो तर तितक्यात मामी ओरडल्या,

‘अरे अरे अरे... मागे काय घेतलीस एकदम! थोडं भान ठेव ना.’

माझा ब्लँक चेहेरा पाहून मामांनी जस्टीफीकेशन दिलं,

‘यात्रेची सुरूवात ही मागचा पाय टाकून कधीच सुरू करू नये. संपूर्ण यात्रा ही अपशकूनी ठरेल. दर्शन सुद्धा लाभलं तरी त्याला पुण्याच्या हिशोबात शून्य कींमत असेल.’

‘मग आता काय करायचं मामा?’, हा प्रश्न माझ्या मनात आणि सच्याच्या तोंडात एकदम आला.

मामांनी कंबर वळवून मागे पाहीलं आणि अत्यंत संतप्त मुद्रेत सच्यावर ओरडले,

‘अक्कल वाळीत टाकली नसशील तर खाली उतर, वर जा, एक नवा लिंबू आण, चाकाच्या पुढच्या बाजूला ठेव, आणि तू...’ म्हणजे मी बरका,‘... तू गाडी सरळ घाल, लिंबाला चिरड आणि मगच गाडी रीव्हर्स घे.’

तो ‘चिरड’ हा शब्द इतका ताण देऊन म्हटला की खरं सांगायच तर ती पहाट अचानक जास्तच शांत झाली एकदम. हे अतीच होत चाललेलं. पण मामा माझा नव्हता, आणि असता तरी हे असले प्रकार नसता करत बसला. म्हणून मला काहीच बोलता येईना. माझ्याच गाडीत मलाच ऑब्लीगेशनचं फीलिंग येऊ लागलेलं. पण सच्या काहीही न बोलता खाली उतरला आणि सांगितल्या प्रमाणे केलं. मी सुद्धा गाडी दोन फूट पुढे घेतली आणि मगच मागे घेतली. पहाटे चारला घर सोडणारे आम्ही, सहा वाजता मामाचं गेट सोडलं.

हायवे सुरू झाला आणि मामी आणि त्यांच ते कार्ट, गाढं झोपलेले दिसले. मामींचा घोरण्याचा सूर अचाटच होता. कारपेंटर रंधा मारताना कसा आवाज येतो, सेम तसा. मामा मात्र अत्यंत ईमानदारीने ड्यूटी करणा-या वॉचमनसारखे, टक लावून सरळ रसत्याकडे बघत बसलेले. काहीतरी विषय काढायचा म्हणून मी मामांना म्हणालो,

‘बाकी मामा, ऑफीस वगैरे काय म्हणतंय तुमचं?’

आता ह्यात काय चुकलं माझं, पण मामा अजूनच सिरीयस झाले ‘तुझ्या वडीलांना तू असेच प्रश्न विचारशील का!...’ त्यांच्या चेहेर-यावरच्या एक्स्प्रेशनला ‘बाप’ म्हणायचं होतं, तोंडातून ‘वडील’ आलं हे माझं नशीब.

‘मामा मी साधाच तर प्रश्न विचारला तुम्हाला. त्यात काय चिडताय इतकं!’ मी थोडा इरीटेट होऊनच बोललो.

‘हा नक्कीच साधा प्रश्न नाही बाळ. माझी नोकरी नाहीये आता हे तुला माहीत असून सुद्धा तू मुद्दाम विचारतोयस. असो! यात्रेला निघालायस. इथले भोग इथेच भोगून जावे लागतात.’

आणि मग माझी ट्यूब पेटली. माझा काका सुद्धा दिग्या मामाच्या कंपनीतच होता. रीसेशन मध्ये कंपनीने व्ही.आर.एस. घ्यायला लावलेल्यांच्या यादीत मामांच सुद्धा नाव होतं. ही गोष्ट मला काका बोललेला, पण मी खरच सांगतो रे, मला तेंव्हा नाही आठवलं.

मी मनापासून सॉरी म्हणालो आणि पुन्हा तोंड बंद ठेवून गाडी हाकत राहीलो. हे असले क्षण येवून गेले ना की एक प्रकारची अस्वस्थ शांतता पसरते. अत्यंत ऑक्वर्ड सिचूवेशन होवून जाते राव! माझी नजर मिरंर कडे गेली आणि मला सगळे टक्क जागे दिसले.

काही काळ गेला आणि अंदाजे आठ वाजता सच्या म्हणाला, ‘गाडी थांबव एखाद्या हॉटेल वर. जाम भूक लागलीये यार.’

मी गाडी एका ढाब्यावर थांबवली आणि खाली उतरलो. मामा, मामी आणि त्यांच कार्ट काही हललेच नाहीत. मी आत डोकावून विचारलं तर मामी म्हणाल्या,

‘शिर्डी यात्रा ही न थांबताच करायची आहे हे मी सचिनला आधीच बोलले होते. पण त्याच्या आई सारखाच तो सुद्धा मामीचा अपमान करणारच. खा बाबा! अजून ताटं मागवून घे, पंच पकवान्न होऊ देत तुमची. साईबाबांची यात्रा ही तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठीच आहे. आम्ही मात्र नाही उतरणार. गाडीत बसून राहू. आमच्यासाठी यात्रा अजून सुरूच आहे.’

हे चालू असताना मामांचा एक हात गाडीचं दार उघडणार होता हे मी पाहीलेलं. मामी बोंबलू लागल्या आणि त्याने तो हात हळूच मागे घेतला. त्यांच पोरगं हॉटेलच्या बाहेर लावलेल्या बोर्डवरची, वेगवेगळ्या डिशेसची चित्र बघत होतं. त्या पोराची त्या वेळेला खरच दया आली मला. अरे काय होती ही फॅमीली! सतत ताप, सतत वाद, सतत तणतण.

सच्या पुन्हा गाडीत बसू लागला. मग मात्र मी त्याला थांबवलं आणि अत्यंत हळू आवाजात म्हणालो,

‘अबे तुला यायचं नसेल आत तर नको येऊ, पण मी मात्र भुके पोटी पुढे नाही हलू शकत.’

असं म्हणून मी सरळ हॉटेलात घुसलो. ह्याला कोणी उद्धटपणा म्हणत असेल तर बिंदास म्हणाव. पण माझ्या लेखी कुठलाही देव आपल्या पोटाची खळगी पाहून पुण्याची खळगी भरत नसावा. एकमेकांशी नीट बोललो, वागलो; आप-आपली कर्तव्य नीट पार पाडली; गरजेच्यावेळी गरजूंना मदत केली आणि स्वच्छ मनाने दर्शन घेतलं भगवंतांच, तरी पुरेसं असतं; हा बावळट विचार माझाच बरका. कोणी तो पाळावा असं मुळीच नाही. मी नास्तिक मुळीच नाही, पण म्हणालो ना ; रूढी, परंपरा डोळे झाकून पाळणारा मी नाही.

मी सरळ आत जाऊन बसलो आणि मुकाट्याने डोसा मागवला. नंतर बाकीच्यांसाठी पार्सल घेतलं आणि कारमध्ये येऊन बसलो. कारमध्ये सुन्न शांतता होती. सगळ्यांच्या हातात एक-एक पार्सल दिलं आणि गाडी पुढे हाकू लागलो. मामींच्या कार्ट्याला इतकी भूक लागलेली की त्याने स्वत:चा, मामींचा आणि मांमाचा अर्धा डोसा संपवला. उरलेला डोसा मामा हातात धरून बसले. मामींच्या संतापाची इतकी धास्ती घेतलेली की हातातल्या पार्सलकडे लक्ष जात होतं, पण आवंढा गिळून पुन्हा रसत्याकडे लक्ष डायव्हर्ट करत होते. सच्यानी मात्र त्याचा डोसा संपवला आणि पुन्हा गाढ ताणून दिली.

चाकणच्या ब्रेकफास्ट एपीसोड नंतर पेठ, मंचर, नारायणगाव, अशी छोटी-मोठी गावं पार पाडत आम्ही संगमनेरला पोचलो; संपूर्ण वाटेत शांतता बरका.

‘सगळ्यांना बोर होत असेल तर मी सी.डी. लावू का?’, असं मामांनी विचारलं. मामा आणि म्युझिक म्हणजे मला जरा चमत्कारीकच वाटलं. पण इतका वेळ शांत बसलेलो आम्ही सगळे की जीभ सुद्धा टाळूला, ड्राय होवून चिकटून बसलेली. मी सुद्धा उसना आनंद दाखवत मंजूरी दिली. पण मामांनी कार मधली सी.डी. लावण्या ऐवजी, स्वत:च्या पाऊच मधली सी.डी. काढली. त्याचं कव्हर पाहूनच मला धडकी भरली. शाहरूख आणि काजोलच्या फोटो मागे गणपतीचा फोटो असलं कव्हर होतं ते. आणि सी.डी. सुरू झाली की लगेच. त्याच्या पहिल्या गाण्याचे लिरीक्स ऐकूनच श्री. गणेशाचा कोप होईल की काय अशी धास्ती मला वाटली. ‘रुक जा ओ दिल दीवाने’ ह्याची चाल असलेलं टायटल सॉन्ग होतं. मला पक्के बोल नाही आठवत आता, पण असं काही तरी होतं ते,

"थांब रे तू श्री गणेशा, जाऊ नकोस रे दूर तू. मोदक वाढले तुला आज, उद्या वाढेन रे तुला लाडू." आणि वर ब्रास-बॅन्ड म्युझिक. गंमत म्हणजे त्या तीघांनाही संपूर्ण सी.डी. पाठ होती.

असाच सायकोलॉजिकल जाच सहन करत करत आम्ही फायनली पोचलो शिर्डीला. जरा फ्रेश झालो आणि राहिलो लायनीत उभे. मला कुठल्याही देवस्थानी गेलं ना, की ते वातावरण पाहूनच खूप मस्त वाटतं. भावीक अत्यंत नम्रपणे रांगेत पुढे सरकत असतात. मधेच एखादा माणूस, त्या गजबजाटा मध्ये जोरात आरोळी ठोकतो,

‘श्री साईनाथ महारज की...’ आणि माग बाकी सगळे नुसतं ‘...जय!’ म्हणून ते वंदन पूर्ण करतात.

काही जणं एखादी छोटीशी पोथी ओंजळीत धरून, अगदी भक्तीभावाने पुढे सरकत असतात. काही थकलेले जीव, थोडा काळ का होईना, कडेच्या बाकावर बसून निवांत होत असतात. हातातलं ताट सांभाळत मी सुद्धा पुढे सरकत होतोच.

‘कीती रुपयांना म्हणे हे ताट?’, मामांनी विचारलं.

‘पंचवीस, तीसला असेल.’

एक कुच्छीत हास्य काढून मामा कंटीन्यूड अ‍ॅज एक्सपेकटेड ‘चांगलंय! चालू द्यात अशीच चैन! एक फूल, एक फालतू हार, पाच साखरेचे पेढे आणि एक उदबत्ती; ह्याला पंचवीस रुपये! तुमच्या सारखे धनाड्य कुबेर बसले आहेत म्हणून सामन्य माणसाला आज दर्शन सुद्धा महाग झालय.’ मी सच्याकडे हताश होवून पाहीलं. तो बिचारा एका झकास पोरीकडे टक लावून उभा होता. मामी सुद्धा एक पोथी घेऊन पठण करत उभ्या होत्या आणि त्यांच कार्ट रांगा बनवायला जे डिव्हायडर बनवलेले असतात ना, त्यांच्यावर लटकत बसलेलं.

दीड-एक तासात मस्तं दर्शन झालं. मग आम्ही बाहेर आलो आणि एका हॉटेलात गेलो. ह्या वेळेस मात्र यात्रा पूर्ण झाली म्हणून मामा-मामींनी सुद्धा जेवण उरंकलं. सच्याने बील भरलं आणि कोणी जवळ नाही पाहून माझ्या जवळ आला.

‘यार मला माहीत आहे की तू खूप वैतागला आहेस मामाला. आय अ‍ॅम सॉरी यार!’

‘सोड रे. हार्डली आज संध्याकाळ पर्यंतचा प्रश्न आहे. एकदा का पुणे गाठलं की विषय संपला.’ पण खरतर मला जाम वीट आलेला ह्या फॅमिलीचा.

तितक्यात मामा अ‍ॅन्ड फॅमिली आमच्यापाशी आले. मी प्रसादाचे पेढे त्यांच्या समोर पुढे केले.

‘काय रे अमेरीकेला जायचं मागीतलस का बाबांकडे? तुझ्याच नशीबात ते अमेरीका काही येत नाहीये बाबा. तुझी आई मात्र खूपच सांगत होती जाणार-जाणार म्हणून’, इती मामी विथ स्माईल. आता मात्र मी खरच डिप्रेस झालेलो राव. काय काय नसेल केलं त्या अमेरीकेसाठी. भूक मला सहन नाही होत, म्हणून उपास तेवढे नाही केले. कुंडल्या दाखवून झाल्या. मंत्र पठण, स्तोत्र वाचन, ते सुद्धा झालं. अकरा ब्राह्ममणांना जेवण सुद्धा घातलं. गंमत म्हणजे त्यातल्या तिघाजणांची पोरं मात्र गेली अमेरीकेला; मी इथेच. शेवटी जेंव्हा एका मांत्रिकाने ‘नरबळी दे’ असं सांगितल्यावर मी नाद सोडला. पण ह्या नादात अख्या गावाला चर्चा-कम-चेष्टेला विषय मिळाला ना राव. त्यात मामींसारखे लचके तोडणारे सुद्धा आलेच. मी काहीही नं बोलताच तिथून निघणार तर मामाच बोलले,

‘चला रे, येतो आम्ही. नासिकची बस पकडतो आता.’

जितका आनंद नोकरी मिळाली तेंव्हा सुद्धा झाला नसेल, तितका ते ऐकून मला झाला. हे आम्हाला का नाही सुचलं की मामा-मामी येतीलच कशाला परत पुण्याला! आणि गंमत म्हणजे सचिनला सुद्धा हे माहीत नव्हतं. साधं थॅन्क-यू सुद्धा न म्हणता ते तीघे निघून गेले. जाम रीलीफ!

परत येताना सचिन निवांतपणे बोलू लागला. मामाला सचिन घाबरत तर होताच पण त्याच सोबत एक ऑब्लीगेशन सुद्धा होतं. सच्याचे वडील तो लहान असतानाच वारले. त्याला आणि त्याच्या आईला थोडाफार आधार ह्या मामाचाच होता. मला सुद्धा सचिनची पोझीशन समजत होती. उपकाराखाली दबलेला होता तो. काही लोकांच आपण ब-याचदा पहातो. जितकं केलं त्या पेक्षा तिपटीने बोलून दाखवतात हे लोक. आमचा कैलास दैठणकरंच घ्या. सन २००७ मध्ये कंपनीच्या अ‍ॅन्यूवल फंक्शन मध्ये लावलेल्या फुग्यांच कौतुक हा आज सुद्धा ऐकवतो. मला तर वाटतं अप्रेझल मध्ये आज सुद्धा ह्याचा हिशोब हा मांडत असेल. तसंच आहे दिग्या मामाचं. बर वरती एक स्टेटमेन्ट बिंदास ऐकवतात हे लोक,

‘जो करतो तो बोलून दाखवणारच की!’

अरे मामा तू कर आणि ऐकवत सुद्धा रहा, अरे पण म्हणून मी आणि इतरांनी का सहन करावा हा वैताग!

आज बरेच दिवस झाले ह्या यात्रेला, पण काही दिवसांपूर्वी मी आणि सच्याने पुन्हा असाच प्लॅन केला आणि अजून काही मित्रांसोबत दापोलीला जायचं ठरवलं. सगळं प्लॅनिंग झालं आणि आदल्या रात्री सच्याच्या आजीचा फोन आला.

‘अरे तुम्ही चाललाच आहात दापोलीला तर सोबत आमच्या दिगंबरला सुद्धा घेऊन जा. ह्या वेळेस एकटाच आला आहे तो. नुसताच बसून कंटाळला आहे. गाडीत जागा आहे असं कळालं, तर येईल तो तुमच्या सोबत.’

आज एक वर्ष झालं, दापोलीचा प्लॅन कॅन्सल करून.

(...समाप्त...)

ब-याच दिवसानंतर पुन्हा लिहीतोय; ब-याच दिवसानंतर अडकलेला मोठा श्वास घेतोय. कमेंट्स मध्ये जरूर कळवा यार.

7 comments:

 1. सम्या, दिग्या मामाला तु शब्दात मस्त मांड्ल आहेस... खरच रे आपल्या आजु-बाजूला अशी अनेक दिग्या मामा आणि मामी असतात, ज्यांना लोकांना खोचुन बोलन्यात आनंद मिळ्तो... असो....

  वाचुन जाम मजा आली...मस्त :)

  ReplyDelete
 2. मस्त ..छान लिहिले आहे.....अशी बरीच माणसं आपल्याला भेटतात...व्यवस्थित लिहिले आहे एकदम.... !!!!

  ReplyDelete
 3. Sameer ,
  Ekdam zakas yar! khup wat baghayla lavlis ! Lihit jare baba asech . Ekhada jijaji pan lift magel tula, tyachavar pan lihi.....

  ReplyDelete
 4. bhaarich aahet ki he character... aagaau kunikadche :P

  ReplyDelete
 5. "आज एक वर्ष झालं, दापोलीचा प्लॅन कॅन्सल करून."
  हा शेवट फार छान केला मित्रा.बाकी लेख एकदूम मस्तच.
  प्रसाद

  ReplyDelete