Monday, April 11, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग २...)

लिफ्ट मागण्यासाठी दरवेळेस अंगठा दाखवलाच पाहीजे असं नाही. एखादाच जगदाळेसारखा अचानक येऊन बसतो, तर काही जण रेल्वेचा झेंडा दाखवल्यासारखं हात बाहेर काढून उभे रहातात. आंगठा सुद्धा आडवा धरलाच पाहिजे असा काही लेखी रूल नाहीये; आडवा, उभा, तिरपा, कसाही चालतो. पण असेही काहीजण सापडलेत मल जे दबा धरून बसलेले असतात. काहीजण डबा धरून बसलेले सुद्धा असतात, पण त्यांचा ह्याचाशी काही संबंध नाही.  कोण, कधी, कुठे, चाललाय हा वास जणू ह्या दबावाल्या पब्लिकला येतो. हेतू एकच, फुकट प्रवास. असाच एक लिफ्टभुकेला ईसम मला नेमका सिनेमा थेटरच्या बाहेर सापडला. सापडाला म्हणजे खरंतर त्यानेच मला शोधलं. झालं असं की आमच्या घराजवळच्या थेटरमधून मी तिकीटं काढली आणि घरी निघालो होतो. संध्याकाळचे चार वाजले होते आणि शो होता साडे-पाचचा. मी थेटरबाहेर आलो आणि माझ्या गाडीपाशी एक आजोबा उभे होते. माझ्या गाडीच्या टाकीवर अगदी हक्कानी एक पिशवी ठेवून ते कोणाचीतरी वाट बघत होते. डोक्यावर एक जुनी, पांढरी, कापडी हॅट; जी पुरातन काळातील केसांचे काही अवशेष लपवत होती. डोळ्यावर सात ते आठ नंबरचा चष्मा. अंगात एक बुश-शर्ट आणि पॅन्ट, तर पायात साध्या चपला. आजोबांचा चष्मा इतका जाड होता की डोळे ताणून बघताना एक स्माईल आपोआप तयार होत होता.‘आजोबा जरा पिशवी काढता का?’, मी गाडीजवळ जाऊन म्हणालो.

आजोबांच्या चेहेर्यावर आता अचानक एक नॅचरल स्माईल प्रकट झाला. तोंड, बंक मारलेल्या क्लासरूम सारखं; तिथे चार-पाच पोरं असतात तसे इथे चार-पाचंच दात.

‘ओहोहो! आलास का? तुझीच वाट बघत होतो. चल.’,

मी काही बाबतीत विसरभोळा आहे  हे जगजाहीर आहे, पण मला खात्री होती की मी येताना कोणताही म्हातारा सोबत आणला नव्हता. माझ्या चेहेर्यावरचा डाऊट आजोबांना समजला असावा आणि ते पुढे बोलले.

‘अरे मला श्रीकांत हौसिंग सोसायटी मध्ये जायचं होतं. तू कुणीकडे चाललायस?’

मला तसं बरच  आड होतं हे ठिकाण पण बारीक पाऊस पडत होता. मला दया आली अजोबांची.

‘चला बसा आजोबा; सोडतो.’

आजोबा अत्यंत नम्रपणे ‘थँक-यू’ म्हणाले आणि मग अगदी सावकाश बसले माझ्या मागे. त्यांना पाय उचलता येईना खूप, म्हणून मला गाडी सुद्धा तिरपी करावी लागली. अजोबांनी माझ्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेला आणि दुसर्या हातात पिशवी धरलेली. 

यात्रा सुरू झाली आणि सुरू झाले आजोबांचे प्रश्न. म्हातार्या लोकांच एक पाहिलय मी. त्यांना लिफ्ट दिली की शांत बसवत नाही. पहिल्या पाच मिनीटात, मी कोण, कुठे रहातो, लग्न झालय का माझं, वडील काय करतात, असले पर्सनल तपशील ते सहज विचारतात आणि मी देखील माहीती देतो. हा विषय झाला की मग रहदारी कशी सहन नाही होत, नविन पीढ़ी बेफाम कशी वागते, आणि ह्या वयात कोण-कोणत्या व्याधी मागे लागल्या आहेत, हे टॉपिक झाले. काही अंतरच दूर गेलेलो आम्ही आणि अचानक आजोबा म्हणाले,

‘बास बास बास! इथेच थांबव.’

‘अहो पण तुम्हाला श्रीकांत सोसायटीला जायचं होतं ना?’

‘अरे ते जायचंच आहे. इथे चिकू दिसतायत छान. ते घेऊ आणि मग जाऊ पुढे’, माझं लक्ष घड्याळाकडे गेलं. तिथे पावणे पाच वाजत आले होते. तरी मी म्हटलं हरकत नाही, कीती असा वेळ लागणारे चिकू घ्यायला! तिकडे आजोबा मात्र अत्यंत सावकाशपणे चिकू निवडत उभे होते. मग सुरू झाली टिपीकल घासाघीस. चार चिकूंसाठी आजोबा पन्नास टक्के डिस्काऊंट मागत होते. दुकानदार ऐकेना म्हणून मी गाडी लावली आणि त्यांचापाशी गेलो. आजोबा ब्लँक चेहेर्यानी माझ्याकडे बघत उभे राहीले. मी पटकन उरकाव म्हणून घाई करत होतो आणि फायनली काही फार डिस्काऊन्ट न घेताच मी चिकू अजोबांच्या हातात दिले. त्यांच्या जवळ सुटे पैसे नव्हते म्हनून पाच रुपये सुद्धा मीच दिले दुकानदाराला. आजोबा तेंव्हा सुद्धा एकदम ब्लॅन्क एक्सप्रेशन दाखवत आणि पहात उभे होते. ते झालं आणि मागे वळालो तर माझ्या गाडीपाशी एक हवालदार उभा असलेला दिसला मला. अजोबांना घेऊन मी गाडीपाशी आलो.

‘गाडी तुझी का?’, ह्या प्रश्नानंतर हवालदार लोकांच इंटेनशन आणि पुढच्या काही मिनीटांचा कालचक्र आपल्याला क्लीयर दिसत असतं.

‘हो माझीच. काय झालं?’

‘जरा लायसन्स, पी.यू.सी. बघू’, घड्याळात पाच-ला-पाच कमी झालेले. शाळेत असताना आई-वडीलांना रीपोर्ट-कार्ड आणि आता पोलीसाला लायसन्स दाखवणं, मला कधीच टाळता नाही आलेलं. लायसन्स पहातच हवालदार बोलले,

‘साडे-तीनशेचा दंडय. नो-पार्कीन्ग मध्ये गाडी लावलीये’, हवालदार माझ्या नजरेला नजर न भिडवताच बोलत होते. डोळ्यावरचा सोनेरी फ्रेम असलेला काळा गॉगल इतर नागरीकांना चेक करत होता. मधेच एका रीक्षावाल्यानी जाता जाता हवालदाराला हात केला. हवालदाराच्या बोलण्याची खात्री असून देखील मी ‘नो-पार्कींग’ ची पाटी शोधू लागलो. ती शेवटी मला, माझ्याच पायाखाली, रोडवरती पेंट केलेली सापडली. घड्याळात पाच वीस झालेले आणि तितक्यात अत्यंत अनपेक्षित घटना घडली.

‘ह्या अशा बेफाम वागण्यानेच आज देश मागे पडलाय. हायली इर्रीस्पॉन्सीबल जनरेशन आहे ही’, तोंडाचा ‘आ’ इतका मोठा झालेला की त्यात अक्खा चिकू बसला असता. आजोबा त्याच साईजच्या चिकूंची पिशवी धरून हवालदाराला सांगत होते.

‘नाही, तुम्ही दंड लावाच ह्या पोराला. अहो मागच्या अठवड्यात हा फुट-पाथ वरून गाडी चालवत चाललेला. अत्यंत उद्धट आणि बेदरकार वागणं आहे हे.’

एखादी झकास पोरगी पाहून जसा चेहेरा होतो, तसा माझा चेहेरा झालेला. फरक फक्त कपाळावरच्या आठ्यांचा होता.

‘अहो हे काय सांगताय आजोबा? मला कधी पाहिलं तुम्ही ह्या आधी? आणि मी उलट तुमचीच मदत करतोय, तर तुम्ही माझीच वाट लावताय.’, मी थोडा आवाज चढवूनच बोललो.

हवालदाराला माझ्या आणि म्हातार्या मधल्या ऋणानूबंधाशी काही घेण-देण नव्हत. हो म्हाताराच म्हणणार मी! तळपायाची आग मस्तकात जाऊन पुन्हा तळपायात आलेली, इतका चिडलेलो मी. दंड भरण्याचं मुळीच दुख: नव्हतं रे, पण हा प्रकार विचित्रच होता यार! त्यात पावणे सहा वाजले होते. फोन घरीच विसरलेलो म्हणून कोणाला काही सांगताही येईना.

‘साहेब, अत्यंत थोतांड आहे, हा जे काही बोलतोय ते. माझा काय संबंध रे तुझ्याशी! ही शूद्ध भामटेगिरी झाली’, 

थोतांड, भामटा, भुरटा, लंपट हे असले शब्द सहसा मी मराठी न्यूज-पेपर मध्ये वाचतो. आज पहील्यांदा कोणाच्या तोंडून ऐकले होते. हा म्हातारा नक्की काय चमत्कार आहे हे मला समजेना! बर हवालदार शेजारी उभा म्हणून भांडतासुद्धा येईना.

‘चला दंड भरा आणि गाडी काढा लवकर’, हवालदारानी कमांड सोडली.

‘आत्ता तेवढे नहीयेत माझ्याजवळ. बघा साहेब, सेटल करा इथेच. मला उशीर होतोय. घरी वाट बघतायत सगळे.’, भ्रष्टाचार मलाही नाही पटत. पण ही वेळ आदर्शवादाची नव्हती. अ‍ॅट-लीस्ट त्या वेळेस मलातरी काही सुचलं नाही.

‘सेटल करा म्हणजे! अरे काय निर्लज्ज हा मुलगा बघा!’, म्हातारा पुन्हा ओरडला. ‘तुझं वय काय आणि ह्या वयात ही प्रव्रुत्ती!  पंचवीस वर्ष पोलीस खात्यात होतो मी. रीटायर्ड अ‍ॅज असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस, पण कधीच वाकलो नाही.’

बोंबला! हे वाक्य हवालदारानी ऐकलं आणि त्याचा गॉगल एकदम खिशातच गेला. आता तर लाच देण-घेण इंपॉसिबल झालेलं. मग हवालदारानी रीटायर्ड ए.सी.पी. साहेबांची चौकशी केली. पाळणाघरात संध्याकाळी आई दिसल्यावर जसा चेहेरा मुलांचा होतो, तसा हवालदाराचा चेहेरा दिसत होता. ‘मी ह्या पुढे लिफ्ट कधीच देणार नाही. ऐंशी वर्षावरील ईसमांना लिफ्ट देण हा कायद्याने गुन्हा आहे.’ हे वाक्य मी स्वत:लाच ऐकवत होतो. थोडा वेळ चर्चा झाली आणि हवालदारानी माझं लायसन्स त्याचा खिशात टाकलं.

‘चौकीवर यून दंड भरायचा आणि लायसन घ्यून जायचं’, हवालदारानी मला बजावलं आणि गॉगल चढवून चक्क निघून गेला. चर्चा करण्यात काहीच  पॉइंट नव्हता म्हणून मी निमूटपणे गाडीला चावी लावली आणि गाडीवर बसणार तोच म्हातारबाबा माझ्या जवळ आले.

‘मला श्रीकांत हौसिंग सोसायटीला सोडणार का प्लीज?’, संताप का होऊ नये तुम्हीच सांगा मला. चेहेर्यावर स्माईल तसाच होता म्हातार्याच्या. वयाचा मान राखून मला शिव्या घालता येईनात, पण तरी मी भर रसत्यात भांडण सुरू केलं. अरे एकतर सिनेमा हातातून गेलेला. ते पैसे तर वाया गेलेच, शिवाय आता लायसन्स आणायला वेगळा दंड आणि मनंस्ताप. निर्लज्जपणे वर पुन्हा लिफ्ट मागीतली म्हातार्याने. का चिडू नये मी! तिळपापडंच काय पण बटाटा, पोहा, नाचणी असे सगळेच पापड होत होते माझ्या मस्तकात.

बराच वाद झाला, बरीच गर्दी जमली. म्हातार्याचं वय बघता त्याचा आवाज कमी नव्हता पण त्यालाच सिंपथी मिळाली रे, आणि पब्लिक मलाच दरडावू लागलं. शेवटी इतकी गर्दी बघून जे नको तेच झालं. हवालदारानी दुसरी ईनिंग खेळायला पुन्हा एन्ट्री मारली.

‘काय नाटक लावलय रे भ***. तू चल आता चौकीवर. तिकडेच बोलू आपन’, असं म्हणून माझ्या गाडीची चावी ताब्यात घेतली. प्रकरण आधीच खूप हाताबाहेर गेलेलं, आणि आता अजून चौकीवर जाणं म्हणजे महावैताग. मला भीती नाही वाटली पण काही सुचेना. तितक्यात एक गंमत झाली. अंदाजे माझ्याच वयाचा एक मुलगा गर्दीत सामिल झाला आणि त्या म्हातार्याला ‘ओ आबा चला घरी’ असं म्हणून म्हातार्याला ओढू लागला. मी हवालदाराकडून ‘टाईम-प्लीज’ मागीतला आणि त्या पोरापाशी गेलो. तेंव्हा कळालं तो म्हातार्याचा नातू होता. झाला प्रकार मी त्याला पूर्ण सांगितला. यार नशीबानं तो माझ्या बाजूनी बोलू लागला, आणि मग हवालदारापाशी गेला.

‘शेलार साहेब सोडा, जाऊन द्या ह्याला. हे माझे आजोबा आहेत. वयामुळे सगळं विसरायला होतय. घरच्यांना सुद्धा नाही ओळखत हे. आपण कुठे आहोत, कोणा सोबत आलोय, काय करतोय काही लक्षात नाही रहात. हा उलटा मदत करतोय तर ह्याच्यावर भडकले,’ असं तो म्हणाला आणि आम्ही दोघही हसू लागलो. हवालदाराचा सेन्स-ऑफ-ह्यूमर फार वरचा असावा कारण त्याला काही हसू येईना, पण लायसन्स परत केलं बाबा एकदाचं. मग मी आजोबांजवळ गेलो,

‘येतो आजोबा, काळजी घ्या’, त्यांना म्हातारा म्हणणं मला नाही जमणार पुन्हा.

‘दळणाच्या डब्याची पुन्हा गडबड नकोय मला, सांगून ठेवतोय. नेहेमीचं झालय तुझं. पीठ चोरता! भामटे कुणीकडचे’, हसू नये पण मला हसू आवरेना खरंतर. पण मग मी सुद्धा सांभाळून घेतलं, ‘नाही आजोबा, परत नाही होणार चूक.’

मी पुन्हा गाडीपाशी आलो आणि कीक मारणार तोच आजोबांचा नातू माझ्यापाशी पुन्हा आला.

‘हे घे तुझे पाच रुपये. ते म्हणतायत तू दिलेस.’, अत्यंत ईमानदारीने, न वाकता नोकरी केल्यामुळे तेवढं लक्षात होतं त्यांच्या. 

‘अरे सॉरी यार, मी रागाच्या भरात खूप वाईट बोललो त्यांना’, मला माझ्याच उर्मटपणाची लाज वाटत होती.

‘अरे दॅट्स ओके...’, तो मुलगा म्हणाला, ‘... आधी हे सांग त्यांना लिफ्ट कुठून दिलीस तू? त्यांची स्कूटर तिथेच आहे. बर्याचदा जाताना स्कूटरनी जातात आणि येताना लिफ्ट नाहीतर रीक्षाकरून येतात.’ मी कपाळावर हात मारला आणि त्याला स्कूटरचं लोकेशन सांगीतलं. ‘थँक्स!’ म्हणून नातू आणि आजोबा निघून गेले.

मी देखील निघालो आणि सरळ घर गाठलं. सिनेमा तर मिस झालेला खरा, पण आय फील इट्स ओके! हा इन्सीडन्ट जास्त वर्थ होता. जाणीव ही देखील झाली की एक दिवस आपणही म्हातारे होणारच आहोत. कदाचित व्यक्तिमत्व वेगळ असेल, पण मूळ साचा हाच. तेंव्हा हे जग कसा प्रतिसाद देइल?

(क्रमश:)

ह्याच छोट्या-छोट्या स्टेप्स उद्याची मोठी उडी असाव्यात ही इच्छा आणि हेच स्वप्न. थॅंक्स-अ-लॉट, माझ्या ह्या सीरीजला देखील झकास प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल. पण काहीही चुकत असल्यास ते देखील नक्की सांगा यार!

9 comments:

 1. bevada zala, mhatara zala, ata next SHALETLA PORGA ahe ka?..karan yach 3 jamaati lift maagtat!!...2ra episode pan mast..

  ReplyDelete
 2. Samya leka lai bhari..... Ajoba is real ajuba :D :D

  ReplyDelete
 3. Hemant, Prashant: Thanks mitranno. Hya astitvatlya vyakti naahet. Nave chehere lavkarach yetil.

  ReplyDelete
 4. Saneer , gr8! Aapan pan mhatare hou pan good observation!

  ReplyDelete
 5. Sameer Bhai mastach re!...

  jara mulinchya swabhav gundharman varati hi kahi tari yeu dya asa mhanto me, kas? :D :D

  ReplyDelete
 6. Prashant & Veerendra: Thanks! Pudhche characters lavkarach yetil.

  ReplyDelete
 7. अफलातून किस्सा रे..
  :)

  ReplyDelete
 8. भन्नाट लिहलंय! किस्सा आवडला. अजुन किस्से वाचायला आवडतील.

  एक शंका:
  तिकीट काढलीस तो चित्रपट ‘गझनी’ होता का? ;-)

  ReplyDelete
 9. उत्तम लिखाण.
  तिकिटाचे पैसे मिळून लिफ्ट किती मधे पडली, तेवढे मात्र कलव.
  प्रसाद.

  ReplyDelete