Monday, April 11, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग २...)

लिफ्ट मागण्यासाठी दरवेळेस अंगठा दाखवलाच पाहीजे असं नाही. एखादाच जगदाळेसारखा अचानक येऊन बसतो, तर काही जण रेल्वेचा झेंडा दाखवल्यासारखं हात बाहेर काढून उभे रहातात. आंगठा सुद्धा आडवा धरलाच पाहिजे असा काही लेखी रूल नाहीये; आडवा, उभा, तिरपा, कसाही चालतो. पण असेही काहीजण सापडलेत मल जे दबा धरून बसलेले असतात. काहीजण डबा धरून बसलेले सुद्धा असतात, पण त्यांचा ह्याचाशी काही संबंध नाही.  कोण, कधी, कुठे, चाललाय हा वास जणू ह्या दबावाल्या पब्लिकला येतो. हेतू एकच, फुकट प्रवास. असाच एक लिफ्टभुकेला ईसम मला नेमका सिनेमा थेटरच्या बाहेर सापडला. सापडाला म्हणजे खरंतर त्यानेच मला शोधलं. झालं असं की आमच्या घराजवळच्या थेटरमधून मी तिकीटं काढली आणि घरी निघालो होतो. संध्याकाळचे चार वाजले होते आणि शो होता साडे-पाचचा. मी थेटरबाहेर आलो आणि माझ्या गाडीपाशी एक आजोबा उभे होते. माझ्या गाडीच्या टाकीवर अगदी हक्कानी एक पिशवी ठेवून ते कोणाचीतरी वाट बघत होते. डोक्यावर एक जुनी, पांढरी, कापडी हॅट; जी पुरातन काळातील केसांचे काही अवशेष लपवत होती. डोळ्यावर सात ते आठ नंबरचा चष्मा. अंगात एक बुश-शर्ट आणि पॅन्ट, तर पायात साध्या चपला. आजोबांचा चष्मा इतका जाड होता की डोळे ताणून बघताना एक स्माईल आपोआप तयार होत होता.