Sunday, March 27, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग १...)

मला मुळातच ड्राईव्ह करायला खूप आवडतं. पण पुण्याचा ट्रॅफिक बघता कार चालवायची इच्छा इतकी मेली आहे की एक वेळ गच्च भरलेल्या बसने प्रवास करणं बरं वाटतं. म्हणून मी बाईक प्रेफर करतो. ऑफिस तसं चौदा-पंधरा कि.मी. दूर आहे, पण रस्ता माझ्याच आजोबानी बांधला आहे, आणि पुढे मेनटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा माझ्याच बापाला मिळालय, अशा मॅच्यूरीटीनी लोकंही गाडी चालवतात आणि मीही. त्यामुळे पुण्यात किंवा मुंबईत वेगळं मेडीटेशन करायची गरज पडतच नाही. ‘गाडी चालवा, एकाग्रता वाढवा’, असा समाजसुधारक विचार इथे मांडण्यात आलेला आहे. ह्या संपूर्ण एक-कल्ली यात्रे मध्ये कधीतरी असा क्षण येतोच जेंव्हा एखादी नवी व्यक्ती, अखाद्या नव्या अनुभवाची बॅग लटकवत, हमखास भेटते. ही गूढ व्यक्ती रसत्याच्या कडेला अत्यंत केवीलवाण्या (किंवा अत्यंत माजलेल्या) स्टाईलमध्ये अंगठा दाखवत उभी असते. ह्याला बोली भाषेत ‘लिफ्ट मागणे’ असे म्हणतात. मी अशी मदत बर्याचदा करतो हे माझ्या बायकोला मुळीच आवडत नाही. तिचा पॉइन्ट सुद्धा बरोबर आहे. कोण, कसा असेल काही सांगता येत नाही. पण मी तसा माणूस बघून थांबतो आणि ह्याच यात्रांमध्ये मला अनेक पर्सनॅलिटीज भटेल्या आहेत, ज्या आता तुम्हाला देखील भेटवतो.काही वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. दिवाळी होती आणि होती पाडव्याची संध्याकाळ. मी गाडी काढली आणि एका मित्राच्या घरी निघालो होतो. आमच्या घरापासून काही अंतरावर देशी दारूच एक दुकान आहे. मी स्वत: कधी आत गेलो नाहीये, पण बाहेरून मला ते एकदमच शांत आणि निरागस ठिकाण वाटतं. बाहेरचा पुसट काळा बोर्ड ‘सरकारमान्य देशी दारूचे दुकान’ इताकीच पब्लिसीटी करत असतो; इन-फॅक्ट तेवडीच पुरेशी असते. कुठे झगमाट नाही, गोंगाट नाही. आत भरपूर प्रकाश कधीच नाही दिसला मला. थकलेल्या संध्याकाळी एक-मेकांचे फ्रस्ट्रेटेड चेहेरे बघण्यात कोणाला रस आहे, म्हणून लाईट बहुतेक डिम असावा. तर ह्या दुकानापासून काही अंतरावरच्या सिग्नलवरती मी उभा होतो. जागोजागी आकाश-कंदील लावलेले, आकाशात मस्त फटाके फुटत होते. मधूनच एक सुंदर मुलगी सिग्नल क्रॉस करून चाललेली. तिच्याकडे मी आणि इतर ड्रायव्हर टक लाऊन पहात उभे असताना अचानक माझं बॅक-सीट जड झालं. माझ्या मागे अचानक कोण येऊन बसलं म्हणून मी दचकून मागे पाहिलं तर एकदम चक्रावूनच गेलो. लाल डोळे, पापण्या मिटण्यासाठी कोणतीही किम्मत मोजायला तयार, कळकट्ट पांढरी टोपी आणि वाढलेली पांढरी दाढी. अंगात कुठल्यातरी लोकल लेझीम ग्रूपचा मळकट केशरी टी-शर्ट आणि खाली पिवळट पायजमा. हे असलं ध्यान अचानक जर तुमच्या मागे येऊन बसलं तर तुम्ही काय कराल! तब्येत अत्यंत मोडकाळलेली, म्हणून त्याला मी घाबरलो नाही, पण इरीटेट नक्की झालो. अरे यार काय एक्सपेकटेड होतं अजून! मी तोंड उघडून शिव्या सूरू करणार, तर त्याआधी तोच बोलला,

‘शिग्नल सुटला, हाल की लवकर, काय बघतो, पिला का!’

गम्मत म्हणजे मी सुद्धा न थांबता निघालो. हे असले आयटम मलाच का यार भेटतात! शेवटी मी म्हटलं, जाऊन देत, फार दूर नसेल न्यायचं,

‘कुठं जायचं मामा?’, मी विचारलं.

‘घरी’

‘कुणाच्या?’, मी पुढे विचारलं. तसं मी ठरवलेलं की फारच इरीटेट झालं तर पुढच्याच चौकात साहेबांना उतरवायचं. पण काही म्हणा, आयटम भारी होता यार!

‘दिवाळी हाये, खोटं न्हाई बोलनार. मला घरीच जायचं’.

‘अहो पण मामा, रहाता कुठं?’

‘धोत्रे भेळच्या तिथं थांब.’ धोत्रे भेळ हे तसं बरच लांब होतं, पण माझ्या रसत्यातच होतं.

‘तुझं नाव काये?’, मामांनी विचारलं.

मी अशा लोकांना खरं काहीच सांगत नसतो, म्हणून काहीतरी नाव सांगितलं.

‘तुमचं नाव काय मामा?’

‘कै... कै... कै... तिच्याईच्चा... कै... कैलास जगदाळे’, चार-पाच ट्राय, आणि स्वत:लाच एका शिवीनंतर जगदाळेला स्वत:चंच नाव उच्चारता आलं; म्हणजे बघा काय चढली असेल. मला मात्र धन्य-धन्य वाटलं. बेवडयां सोबत तासन-तास गप्पा मारू शकतो मी, आणि आज टॉप-लेव्हलच्या बेवड्यासोबत लॉन्ग-ड्राईव्ह; आहाहाहा! अजून काय लागतं दिवाळी साजरी करायला! म्हणून मग मीच पिन मारली म्हातार्याला.

‘काय मामा, आज दिवाळी आणि तुम्ही दारू पीत बसले. घरी घेतील का तुम्हाला?’

‘कोनाचा बाप आडवनार मला तिचायला! बाकी कोनी कायबी म्हनंल, पन बायको जर न्हाई म्हनली तर म्या घरात जानार न्हाय.’, म्हातारा फुल व्हॉल्यूम मध्ये बोंबलू लागला.

‘काय मामा, आज पाडवा आणि तुम्ही दारू पिऊन घरी जाणार तर बायको थोडीच घरात घेईल!’

‘अरं च...च...च...चालंल मला, भीत न्हाय मी. रसत्यावर झ...झ...झोपीन, कारन बायको सगळ्यात म्होटी. तिला फोन करन. तिची पर... परमिशन नसल तर म्या घरात जानार न्हाय, कारन बायको सगळ्यात म्होटी. ती ग्रेट असतीये, म्हनून बायको असतीये,’ जगदाळे आता फुल-फोर्मात येऊ लागलेला. त्याचा थोडा झोक जात होता आणि त्यामुळे माझी गाडी सुद्धा हेलकावे खात होती.

‘अहो पण मामा तुम्हाला पोरं असतील की. ते येऊन देतील का घरात?’

‘तिचायला...भ...म...ह...च... आई...’, अशा सगळ्या शिव्या स्वत:च्याच पोरांना देऊन श्री. कैलास पुढे बोलले, ‘... त्ये कोन बोलनार मला. त्यांच्यात दम न्हाय त्यो. पन येक सांगतो मित्रा, बायको सगळ्यात म्होटी.’ पुन्हा तेच. घरी पिऊन आला म्हणून बायको बडवणार ह्याची खात्री त्यालाच काय मला सुद्धा होती. म्हणून ‘बायको सगळ्यात म्होटी, बायको सगळ्यात म्होटी’ ही लाईन इथपासूनच चालू होती.

‘अहो मग मामा, बायको इतकी मोठी आहे तर पाडव्या दिवशीच का पिली!’

‘म्या कुटं प्यालो! आई-ची-आन म्या पिनार न्हवतोच. पन त्ये बाब्यानं पाजली तिचायला. पन आता श...श...शप्पत घ्येतो बायकोची, कारन बायको सगळ्यात म्होटी. दिवाळी हाये, खोट न्हाय बोलनार. कधीच पिनार न्हाय. तू गाडी घ्ये कडंला.’

मला वाटलं जगदाळे उतरणार म्हणून मी गाडी कडेला घेतली, ‘अहो पण मामा, तुम्ही पुढे उतरणार होते ना? मग इथे कशाला उतरले?’

‘न्हाई उतरानार न्हाय हिते, टोपी उडाली, उतरानार न्हाय हिते. तू हितच थांब. तिच्यायची टोपी मी आनतो. तू जाऊ नको, हितच थांब,’ असं मला बजावून, आणि हेलकावे घेत घेत जगदाळे रसत्याच्या मधो-मध पडलेली टोपी आणायला गेले. गाड्या येत होत्या, टोपी चिरडत होत्या, उडवत होत्या. जगदाळे मामा पाचोळ्यासारखे उडत त्या टोपी पर्यंत पोचले. तितक्यात काही गाड्या हॉर्न मारत त्याला पास झाल्या. स्वत: अगदी परफेक्ट असल्यासारखं, रस्त्याच्या मधोमध उभ राहून त्यांनाच चार शिव्या घातल्या जगदाळेनी. मला खर तर ह्या म्हातार्याची थोडी दया आली. काय लाईफ आहे यार ह्या माणसाचं! व्यसन म्हणा किंवा फ्रस्ट्रेशन मुळे सुरू झालेली गरज म्हणा. असं काय डोक्यात येत असेल की ज्यामुळे दिवाळीच्या दिवशी, ही दारू उडवायची इच्छा होत असेल? फॅमिली, कल्चर, संस्कार हे शब्द सुद्धा ह्या म्हातार्याला ठाऊक असतील की नाही हा डाऊट आहे. पण तरी तो जगतोय. का, कसा, कोणासाठी, कशासाठी हा क्वेसचन-मार्क ना त्याला पडत, ना त्याला पाहून परमेश्वराला. जाऊ देत! मी काही थोर नाही किंवा प्यायलेलो सुद्धा नाही. त्यामुळे फिलॉसॉफी कशासाठी झाडतोय काय माहीत! तसंही आजकाल फिलॉसॉफर व्हायला काही खास कारण किंवा इंटेलीजन्स लागत नाही. 

जगदाळे परत आला आणि माझ्या मागे बसला. गाडी पुढे जाऊ लागली आणि मी पुन्हा विषय काढला, ‘मग मामा, आता फोन करणार का बायकोला?’

‘हा आता आधी फोन करनार, मंगच घरी जानार. तू थांबव हितं. हितून करनार फोन.’ एका पी.सी.ओ. कडे कापणारा हात दाखवत जगदाळेनी मला थांबवलं. कैलास जगदाळे मग खाली उतरले आणि माझ्याशी काहीही न बोलता हेलकावे घेत पी.सी.ओ कडे गेले. एका गजबजलेल्या वस्ती मध्ये आम्ही थांबलेलो. तिथे एका घराबाहेर एक पानाची टपरी होती. त्यात होता हा पी.सी.ओ.. टपरी मध्ये कोणंच बसलं नव्हतं. मी थोडावेळ तिथेच उभा राहीलो. जगदाळे नक्की बोलेल कसा बायकोशी, हे मला पहायचं होतं. थोडा वेळ फोनवर जोर-जोरात ओरडत बोलला म्हातारा. काहीवेळानी शांत झाला आणि मग अचानक त्या शेजारच्या घरातून एक अत्यंत लठ्ठ बाई बाहेर आली. जगदाळेच्या हातात फोन तसाच होता आणि अचानक ती म्हातारी त्याला बडवू लागली. मला काही समजायच्या आत तिने जगदाळेला पकडून त्याला बडवतच त्या घराच्या आत नेलं. मग मी त्या पान टपरीचा बोर्ड पाहिला. ‘कैलास पान मर्चंट... प्रोप्रायटर: श्री कैलास जगदाळे.’ स्वत:च्याच घरात फोन करून बायकोचा अंदाज घेणार्या ह्या बेवड्यानी माझी ती दिवाळी एकदम मेमोरेबल करून टाकली. आजही त्या रसत्यावरून बर्याचदा जातो. म्हातारा कैलास त्या पान टपरीमध्ये बसलेला दिसतो. एकवेळ पुन्हा त्या बेवड्या जगडाळेला लिफ्ट देईन, पण भानावर असलेल्या जगदाळेशी मी स्वत:हून बोलेन सुद्धा की नाही ह्याची खात्री नाही. स्टिल लाफ थिंकींग अबाऊट दॅट मॅन, अ‍ॅन्ड दॅट ईव्हनिंग.

अशा अनेक यात्रा झाल्या आणि बरेच `आडवे अंगठे' रसत्यामध्ये डोकावताना दिसले. त्यांचाबद्दल पुढच्या भागात सांगतो.

(क्रमश:)

नवा विषय, नवी पात्रं, नवी मांडणी आणि नवा दंगा; कसा वाटला ते खाली कमेन्ट्स मध्ये जरूर कळवा.

7 comments:

 1. Hi Sameer,
  Lai bhari bagh! Mhanje ata mi imagine karu shakato ki mi pilyavar kasa bolat asen . Gr8 . Ata pudhache divas changale vachayla milnar tar! Keep it up.

  ReplyDelete
 2. near-perfect job! I hope u haven't shelved the plan to write a book some day. Keep writing. Gud job

  ReplyDelete
 3. Prashant: Thanks.
  Anoop: Thanks. To diwas nakki yeil, ajun thoda wel aahe.

  ReplyDelete
 4. :P perfect bevdyaachi language :D ...good job..awaiting next blogs on this ;)

  ReplyDelete
 5. pratyek prantachi sthanik bhasha aikaychi asel tar ekach thikan, tithle deshi daru dukan.. starter tar bhari laglay...pudhil item lavkar bhetav!!:)

  ReplyDelete
 6. lai bhari.. lai maja yete bevadyannshi bolatanna..

  ReplyDelete
 7. आरे लय भारी किस्सा !!! शेवट वाचून खुर्चीतून पडलो हसत हसत !! मस्तच

  ReplyDelete