Monday, March 21, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग ४...)

जोहॅनेसबर्ग मध्येच ‘चायना टाऊन’ नावाचा इलाका आहे. जन-गणना फोफावली की हलवलेल्या सोड्यासारखी माणसं बाहेर वाहू लागली; जशी भारतीय, तसेच चायनीज. भारतीय जसे धंद्यात आणि नोकरीत दिसतात, तसे चायनीज जास्त करून धंद्यात दिसतात. त्यांची इंग्लिशची बोंब आहे. त्यांच्या सोबत आपण व्यवहार करणं महा-मुश्किल. व्यवहारात अत्यंत चिकट असतात आणि घासा-घीस तर बिलकुल नाही. ‘चायना टाऊन’ हा होल-सेल चा माल विकायचा बाजार. तिथे चड्डी घ्यायची तर ती सुद्धा डझनावारी. ‘एक सिंगल-पीस दे की रे’ असं म्हणालो की समोरचा ब्रूस ली दुकाना बाहेर कीक मारून उडवून लावतो. आणि त्यात त्यांच इंग्लिश; अगगग! त्यामुळे नाम्यालाच मी पुढे करायचो भाव करायला. नाम्या म्हणजे अस्सल चायनीज स्टाईल मध्येच बोलायाला सुरूवात; म्हणजे इंग्लिश मध्ये बरका. असेच एका शनिवारी आम्ही अनेक जण तिथे गेलो होतो. मला घरात घालायला थ्री-फोर्थ चड्डी घ्यायची होती. तिथे आधी अनेकदा गेलेलो त्यामुळे अनुभवा वरून मी नाम्यालाच डायरेक्ट पुढे केलं. नाम्या दुकानात शिरला जुगलबंदीसाठी.


‘हे ब्रो, कम हीयर’ (ब्रो म्हणजे ब्रदर बरका)

चिन्याने आधी बघून न बघीतल्या सारखं केलं. एकवेळ धंदा बुडाला तरी चालेल पण नाम्या सोबत इंग्लिश नको यार, असं झालं त्याचं. आधीचे संवाद घडलेच होते ना तसे.

‘ए ब्रो... यू कम हीयर... व्हॉट डूविंग देयर’, नाम्या म्हणजे अस्सल वर्हाडी श्टाईल मध्ये ‘अरे ल्येका ये की इकडं.. काय बे करून राहीला तिकडं!’ असाच सुरू व्यायचा.

‘आयला सम्या, महामुष्किलीने इंग्लिंश बरं झालय. ह्याचा मुळं परत ग्र्यामर ची आई-माई होनार तिचायला!’

तो माणूस जवळ आला आणि ‘येस’ इतकंच बोलला. ‘येस’ आणि ‘नो’ हे दोनच शब्द नीट माहीती असतात ह्यांना.

नाम्यानी मग तळहात गुडघ्ह्या खाली नेला आणि पुढे बोलला, ‘शो प्यान्ट... प्यान्ट’. चिन्याची नजर एकदम ब्लँक, होऊन नाम्याच्या गुढगा आणि थोबाडाकडे शिफ्ट होत होती.

‘अबे त्याला तोंडानी थ्री-फोर्थ सांग की नाम्या’, मी मधेच बोललो.

अचानक अत्यंत वैताग त्याच्या चेहेर्यावर आला, ‘थ्री-फोर्थ सांगू! बर ठीके! मग गम्मत बघ आता.’

‘शो थ्री-फोर्थ प्यान्ट’ असं तो त्या दुकानदाराला म्हणाला.

‘नो नो नो नो नो’ असा लांब जप करत तो दुकानदार आम्हाला सोडून निघूनच गेला. मग नाम्यानी बोट कोपर्यातल्या गठ्ठ्या दाखवलं. तिथे थ्री-फोर्थ चड्यांचा ढिगारा होता. साध्या थ्री-फोर्थ शब्दाची भिती त्या चिन्याला, म्हणजे विचार करा!

‘अबे मग त्याला बोलाव की यार नाम्या.’

वैताग कंटीन्यू करत ‘मरून देत तिचायला! मी नसतो करत ते परत-परत. चायला चांगलं चालल्येलं तर म्हने थ्री-फोर्थ सांग तोंडानी. एका चड्डीसाठी बी.पी. वाढवून घेऊन त्याला सांगायची मला मुळीच इच्छा नाही. मागे त्या केद्याच्या टी-शर्टसाठी एक तास ग्येला. शेवटी भ*** नी घेतलं तर काहीच नाही, उलटा त्या चिन्यानी आई-बहीण काढून दुकानाबाहेर हाकलंल.’ मग जरा फोर्स केलं तेंव्हा थोडी घासा-घीस करून दोन थ्री-फोर्थ मिळाल्या.

एखाद्या व्यक्ती सोबत आपण अक्खं आयुष्य घालवत असू, पण तरी तिच्याबद्दल सगळं माहीत आहे हे ठामपणे सांगू शकतो का रे! मलातरी असं वाटतं की पन्नास वर्षांच्या सोबतीनंतर सुद्धा असा एकतरी पॉइन्ट नक्की सापडेल जो अत्यंत वेगळा रंग, एक डिफ्रंट शेड दाखवून जाईल. नाम्याच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडलं. माझी परत यायची वेळ जवळ आली. घरी जायची घर-घर जितकी मोठी, तितकीच जो-बर्गला सोडायची चिड-चिड. इथे नवे मित्र झाले, नवे दंगेकरी मिळाले, पण कॉन्टॅक्ट टिकवणं काही काळानी अवघड होत जातं. प्रयत्न करूनच मग नाती टिकतात, नाहीतर फेसबुकच्या असंख्य निरूपयोगी फ्रेन्ड्सची नुसती भर होऊन बसतात. मी निघायच्या नऊ-दहा दिवस आधी, एका संध्याकाळी, घरी पार्टी ठेवलेली. मस्त पंधरा-वीस मित्र जमलेले घरी. दंगा चाललेला, गप्पा चाललेल्या. ह्या सगळ्यांमध्ये ‘हरीकुमार रेड्डी’ नावाचा नवाच मुलगा आलेला. नाम्याचा हा नवा रूम-मेट तसा बर्यापैकी शांत बसलेला. त्याला थोडा ताप आलेला हे समजलं. होतं असं बर्याचदा नव्या ठीकाणी. काही वेळानी त्याला बसवेना म्हणून तो रूमवर आराम करायला गेला. पार्टी रात्री उशीरा संपली. अगदी दोन-अडीच वाजता, अर्ध्या नशेत, संपूर्ण झोपेत, पब्लिक आप-आपल्या रूमवरती गेलं. खूप दमायला झालेलं म्हणून मी सुद्धा पटकन झोपलो. हार्डली दहा मिनीटं झाले असतील जेंव्हा माझा मोबाईल वाजला. बघितलं तर नाम्या होता.

‘जसा आसशील तसा ऊठ सम्या आनि माझ्या रूमवर ये पटकीनी’, नाम्या चांगलाच प्यायला होता, पण आवाज स्पष्ट काढायचा प्रयत्न करत होता. मला वाटलं नशेत बडबडतोय, म्हणून मी फार लक्ष नाही दिलं. पण मग एकदम जोरात ओरडून म्हणाला, ‘सम्या जसा असशील तसा लवकर ये. आपल्याला हॉस्पिटल मध्ये जाव लागनारे.’

मग मात्र मी सिरीयस झालो आणि धावत त्याच्या रूमवर गेलो. नाम्या अजूनसुद्धा नशेत दिसत होता, झिंगत होता. पण मग बेडरूमकडे बोट दाखवून ‘हर्या’ इतकच म्हणाला. मी चटकन आत गेलो आणि पहातो तर हरी बिछान्यावर पडलेला आणि तोंडातून फेस येत होता. मी एकदम पॅनिक झालो आणि ‘ओ शिट!’ इतकच तोंडातून बाहेर आलं. तेंव्हा नाम्या माझ्या जवळ आला आणि म्हणाला, 

‘शां...शां... शांत हो सम्या. तो जिवंत आहे, मी चेक क्येलय. शांत हो आनि इकडं ये आता.’ 

हेलकावे घेतच नाम्या मला बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि पाण्याची भरलेली बादली उचलायला सांगितली. मग खाली बसला आणि म्हणाला

‘आता पटकीनी ओत ती माझ्या डोक्यावर. येकदम पटकीनी!’

मी पूर्ण ब्लँक होतो; त्याने जसं सांगितलं तसं केलं. थोडावेळ तसाच खाली बसून रहिला तो आणि मग हळूच उठून म्हणाला,

‘आता पळ आनि बाकी कोनि येतय का बघ. नसेल तर नुसती गाडीची चावी उचल आणि लगलीच इकडे निघून ये. वी ह्याव टू ट्येक हिम टू दी हॉस्पिटल.’

पाच मिनीटात मी आणि दिनेश कारपाशी आलो. नाम्या आणि नागेश, हरीला घेऊन आधीच तिथे होते.

‘अबे अंग जाम तापलय ह्याच सम्या. ह्याचा टच सुद्धा सहन होत नाहीये सम्या’, नागूच्या गळ्यात बेशुद्ध हरीचा हात होता आणि डोळ्यात माझ्या इतकीच पॅनिक लेव्हल.

‘मग भ*** टच करू नकोस त्याला, आनि शांतपने सगळे गाडीत बसा’, नाम्या थोडा चिडला आता.

‘अरे पण नाम्या हॉस्पिटल कुठलं रे?’

‘त्ये बघतो मी, तुम्ही बसा आत. आनि सम्या शांतपने गाडी चालवायची आता. नो प्यानिकींग भो***!’

गाडीत बसलो आणि नाम्यानी जी.पी.एस. लावला. त्याच्यावरून जवळचं हॉस्पिटल शोधलं. दहा मिनीटात आम्ही हॉस्पिटल मध्ये होतो, आणि हरी साहेब पंधराव्या मिनीटाला डॉक्टरच्या ताब्यात. टेस्ट्स झाल्या आणि कळालं की रेड्डीला टायफॉइड झालेला. ताप अचानक वाढलेला आणि त्यातच त्याला फीट सुद्धा आली. पुढचे दोन-तीन दिवस तो अ‍ॅडमिट होता, आणि मग जरा कंट्रोल मध्ये आल्यावर त्याला भारतात परत पाठवण्याची परवानगी देण्यात आली. ह्या सगळ्यात गम्मत अशी की नाम्या पूर्ण वेळ हॉस्पिटल मध्येच होता. हॉस्पिटलचा स्टाफ असून सुद्धा तो तिथे ह्या कारणासाठी बसलेला कारण हरीला मानसिक आधार मिळावा. परदेशात असल्या प्रसंगी एकटं वाटेल हा विचार सुद्धा कीती मोठा आहे यार! हरी रेड्डीशी अशी कीती ओळख नाम्याची; फक्त अर्धा दिवस! पण जबाबदरी समजून घेऊन, पॅनिक न होता, प्रसंगाच भान ठेऊन नाम्याने सगळं पार पाडलं; अगदी स्वत:ची दारू उतरवून घेण्या पासून. आय वॉज इंप्रेस्ड नाम्याचा हा रंग पाहून; इन फॅक्ट वी ऑल वेयर इमप्रेस्ड!

हरीला सुखरूप एयरपोर्टवर सोडलं आणि एक-दोन दिवसांनी माझा परतण्याचा दिवस सुद्धा आला. त्याच्या आदल्या रात्री नाम्यासोबत बाल्कनीत गप्पा मारत बसलेलो. बराच सेन्टी झालेला तो.

‘तू होतास इथे म्हनून येताना फार विचार नाही क्येला मी सम्या. आता पुन्हा कधी भेट होतीये काय माहीत?’ बीयरची बाटली हातात लटकवत नाम्या बोलत होता.

‘अरे यार तू येशीलचकी लवकर. आणि ई-मेल, फेसबुक, चॅट चालू असेलच नाम्या आपलं. एवढा काय सेन्टी होतो!’ मी त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणालो.

‘ते झालच रे सम्या. पन त्यात इमोशनल टच नसतोय मित्रा. आपन खूप धिंगाना घातला मुंबईत आनि इथं सुद्धा. पन आता इथून मला तरी लवकर परत नाही यायचंय गड्या.’ मला कळत होतं नाम्या काय म्हणत होता ते.

‘इथे कीतीही दिवस रहायची माझी तयारी आहे गड्या. कंपनीला सुद्धा त्येच हवंय. इथेच भरपूर पैसा कमवनं शक्य आहे. काही वर्ष काढली इथे, तरच पुन्याच्या एखांद्या बारक्या कोपर्यात स्वत:च घर होनं शक्य आहे. बायको सुद्धा लवकरच येईल इकडं. झकास शेविंग झालं पाहीजे आता.’ नाम्या अत्यंत ईमोशनल-कम-प्रॅक्टीकल बोलत होता; त्याच्या बीयरच्या एका बाटलीला पाऊणतास लागला संपायला.

मी पुण्यात येऊन काहीच दिवस झालेले आणि एका रविवारी बायकोच्या कचाट्यात मी सापडलो. ती जुन्या कपड्यांच गाठोड बांधत बसलेली. आई असो कींवा बायको; जितका उत्साह ते कपडे घेण्यात दाखवतात, त्याहून अधिक बोहारणीला तेच कपडे देण्यात दिसतो. मला सुद्धा तेच कपडे बांधण्याच्या कामात गुंतवलेलं. तितक्यात एका शर्टकडे माझी नजर गेली. मी तो मुकाट्याने गाठोड्यातून बाहेर काढला. नाम्याच्या पहिल्या भेटीचे शाईचे ठिपके अजूनही डार्क दिसत होते. कान्ट थ्रो अवे सम मेमरीज डूड; जस्ट कान्ट!

(समाप्त)

नाम्याला भरभरून प्रेम दिल्याबद्दल थॅंक्स! तुमच्या कमेन्ट्स खूप मोटीव्हेट करतात पुढे लिहायला. आवडल्यास नक्की कळवा खाली कमेन्ट्स मध्ये.

4 comments:

 1. नमस्कार
  नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू झाला आहे.तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
  धन्यवाद

  ReplyDelete
 2. Hi Sameer,
  Are yar chutput lagun rahiliy ki ata namya parat bhetnar nahi! Khup zakas lihiles asach lihit ja!

  ReplyDelete
 3. @Prashant. Thanks! Motivation aahe, mhanun he chalue.
  @मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू: Thanks maza blog tumchya site war taklya baddal.

  ReplyDelete
 4. अप्रतीम, भन्नाट, चाबुक, मस्त झालय...असे शब्द आता नेहमी ऐकायला मिळ्नार तुला...
  एक वेगळीच मज्जा येते वाचताना...
  चालु राहुदे तुझे लिखाण असेच...

  ReplyDelete