Sunday, March 27, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग १...)

मला मुळातच ड्राईव्ह करायला खूप आवडतं. पण पुण्याचा ट्रॅफिक बघता कार चालवायची इच्छा इतकी मेली आहे की एक वेळ गच्च भरलेल्या बसने प्रवास करणं बरं वाटतं. म्हणून मी बाईक प्रेफर करतो. ऑफिस तसं चौदा-पंधरा कि.मी. दूर आहे, पण रस्ता माझ्याच आजोबानी बांधला आहे, आणि पुढे मेनटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा माझ्याच बापाला मिळालय, अशा मॅच्यूरीटीनी लोकंही गाडी चालवतात आणि मीही. त्यामुळे पुण्यात किंवा मुंबईत वेगळं मेडीटेशन करायची गरज पडतच नाही. ‘गाडी चालवा, एकाग्रता वाढवा’, असा समाजसुधारक विचार इथे मांडण्यात आलेला आहे. ह्या संपूर्ण एक-कल्ली यात्रे मध्ये कधीतरी असा क्षण येतोच जेंव्हा एखादी नवी व्यक्ती, अखाद्या नव्या अनुभवाची बॅग लटकवत, हमखास भेटते. ही गूढ व्यक्ती रसत्याच्या कडेला अत्यंत केवीलवाण्या (किंवा अत्यंत माजलेल्या) स्टाईलमध्ये अंगठा दाखवत उभी असते. ह्याला बोली भाषेत ‘लिफ्ट मागणे’ असे म्हणतात. मी अशी मदत बर्याचदा करतो हे माझ्या बायकोला मुळीच आवडत नाही. तिचा पॉइन्ट सुद्धा बरोबर आहे. कोण, कसा असेल काही सांगता येत नाही. पण मी तसा माणूस बघून थांबतो आणि ह्याच यात्रांमध्ये मला अनेक पर्सनॅलिटीज भटेल्या आहेत, ज्या आता तुम्हाला देखील भेटवतो.

Monday, March 21, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग ४...)

जोहॅनेसबर्ग मध्येच ‘चायना टाऊन’ नावाचा इलाका आहे. जन-गणना फोफावली की हलवलेल्या सोड्यासारखी माणसं बाहेर वाहू लागली; जशी भारतीय, तसेच चायनीज. भारतीय जसे धंद्यात आणि नोकरीत दिसतात, तसे चायनीज जास्त करून धंद्यात दिसतात. त्यांची इंग्लिशची बोंब आहे. त्यांच्या सोबत आपण व्यवहार करणं महा-मुश्किल. व्यवहारात अत्यंत चिकट असतात आणि घासा-घीस तर बिलकुल नाही. ‘चायना टाऊन’ हा होल-सेल चा माल विकायचा बाजार. तिथे चड्डी घ्यायची तर ती सुद्धा डझनावारी. ‘एक सिंगल-पीस दे की रे’ असं म्हणालो की समोरचा ब्रूस ली दुकाना बाहेर कीक मारून उडवून लावतो. आणि त्यात त्यांच इंग्लिश; अगगग! त्यामुळे नाम्यालाच मी पुढे करायचो भाव करायला. नाम्या म्हणजे अस्सल चायनीज स्टाईल मध्येच बोलायाला सुरूवात; म्हणजे इंग्लिश मध्ये बरका. असेच एका शनिवारी आम्ही अनेक जण तिथे गेलो होतो. मला घरात घालायला थ्री-फोर्थ चड्डी घ्यायची होती. तिथे आधी अनेकदा गेलेलो त्यामुळे अनुभवा वरून मी नाम्यालाच डायरेक्ट पुढे केलं. नाम्या दुकानात शिरला जुगलबंदीसाठी.