Saturday, February 19, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग ३...)

बायोडेटा वरती एक्स्पीरीयन्स ३.६ दिसू लागलेला. हे अनुभवाचं वय सांगायची गम्मत अशी की आज-काल माझ्या मुलाचं वय सुद्धा मी १.३ सांगतो. नॉन-आयटी वाल्या लोकांना गम्मत वाटते ऐकताना. तर मूळ मुद्दा असा की ३.६ वर्ष झालेली आणि मी मुंबई सोडून पुण्याला आलो. काही दिवसांनी नाम्यानी कंपनीच सोडली आणि पुण्याला शिफ्ट झाला. दोघांचीही लग्न ठरलेली. माझी होणारी बायको विदर्भातली आहे ह्या एकाच पॉइन्टवरती तो माझा मेव्हणा झाला. 


‘आयला सम्या, लग्नानंतर तुझ्या घरी जेवनाची जुगलबंदी चालनार बघ. वहीनी तिखट, आनी तू गोड. फार गोड खाता राव तुम्ही पुनेकर. चिकन, मटन मध्ये साखर टाकता येत नाही म्हनून खोबरं टाकून त्ये पन गोड. आरारारा! आनी आमचा विदर्भी ठसका बघ आता. झन-झनीत!’ माझ्या सुदैवानं तसं काही नाही झालं. बायको अगदी सुगरण मिळाली, नाहीतर पाईल्सची स्वप्नं पडू लागलेली मला ह्या ह*** नाम्यामुळे.

काही महिने उलटले आणि आमची लग्नं सुद्धा पार पडली. संसार सुरू झालेले आणि मग करीयर मधला फोकस वाढू लागला. नाम्याशी कॉन्टॅक्ट संपले नाहीत, पण दुर्मीळ झाले. महिन्यातून एखादा फोन कींवा मेल, तर कधी चॅट. नाम्यानी पुण्याच्या मध्यभागी, अगदी पेठेत एक जागा भाड्याने घेतली. कोणी विचारलं की ‘नाम्या कुठे रहातोस?’ तर आवलीपणा दाखवत ‘डाऊन-टाऊन पुने’ असा टिळक रोडचा वरचा त्याचा पत्ता सांगायचा.

सगळं तसं नॉर्मल चालालं होतं पण एक मोठी उडी हवी होती. एखादा सैनिक बॉर्डरवर लढण्याचं जसं स्वप्नं पहातो, तसाच प्रत्येक सॉफ्ट-वेयर इंजिनीयर ऑन-साईटचं स्वप्नं पहातो. ह्याचंच ध्येय उराशी बाळगून करीयरची सूरूवात होते. एका रविवारी संध्याकाळी मी आणि नाम्या ‘एस.पी. कॉलेज’ समोर भेटलो आणि हाच विषय निघाला 

‘च्या-मारी सम्या हद्द झाली राव’ असं म्हणत नामदेवनी कटिंग-चहाचा घोट घेतला. टिळक-रोडवरच्याच एका अम्रुततुल्या मध्ये आम्ही बसलेलो. (नॉन-पुणेकर लोकांसाठी; अम्रुततुल्य इज-ईक्वल-टू चहाचं हॉटेल कींवा टपरी).

‘काय झालं रे?’ मी विचारलं.

नाम्यानी अजून एक चहा मागवला आणि म्हणाला, ‘अबे परवा माझा पासपोर्ट एक्सपायर झाला. आयला राव कोनताही ऐरा-गैरा जाऊन राहीला ना राव ऑन-साईट, अन आपन बसलोय इथच. नेपाळचा का होईना, पन एकतरी वीजा पासपोर्टला चिकटू देत यार. ’

‘खरंय यार नाम्या. पण नशीबात असेल तर मिळेल रे. आणि तसही तुझं ऑनसाईट झालय की रे!’ मी खवचटपणाने म्हणालो.

‘हा बरोबरे! करा चेष्टा आमची. आयला माझं ऑन-साईट म्हनजे दोन महिने कोल्हापूर आनि सहा महिने इचल-करंजी. आनि हो; मध्ये तीन महिने उरूळी-कांचन. तेच आमचं यू.के. म्हनायचं झालं.’ नाम्या आधी सातार्याला एका छोट्या कंपनीत होता. मालक आणि तो, असे दोनचं प्रोग्रॅमर त्या कंपनीत. पत-पेढ्या, सहकारी बँका, छोट्या दुकानांची, कारखान्यांची बिलिंग सिस्टिम असे प्रोजेक्ट असायचे तिथे. म्हणून हीच शहरं हे त्याचं ऑन-साईट. आणि खरं सांगायचं तर, नॉन-आयटीवाल्यांसाठी ऑन-साईट म्हणजे परदेश, असं ईक्वेशन झालं असलं तरी ते चुकीचं आहे. ऑन-साईट म्हणजे थेट क्लायंट कींवा कस्टमरच्या ऑफिस मध्ये बसून करण्याचं काम; भले मग शहर कींवा देश कोणताही असो. मला सुद्धा एका परदेश यात्रेची अत्यंत ओढ लागलेली, अ‍ॅन्ड फायनली वन डे माय प्रेयर वॉज अ‍ॅन्सर्ड; साऊथ-आफ्रीका! ज्या दिवशी हे तिकीट आलं, त्या दिवशी नाम्या माझ्यापेक्षा जास्तं खुश होता. माझ्या आणि माझ्या बायको सोबत ते कपल शॉपिंगला सुद्धा आलं. 

जवळपास दोन महिने झालेले मला जोहॅनेसबर्ग मध्ये येऊन, आणि कंपनीत डेटाबेसच्या माणसाची रीक्वायरमेन्ट आली. वेळ न दवडता नाम्याचा रेज्यूमे मी पुढे सरकवला. टॅलेन्ट आहे त्याच्यात, तो सिलेक्ट सुद्धा झाला. मग काय यार! नाम्या महिन्याभरात साऊथ-अ‍ॅफ्रीकेत माझ्या सोबत. एका घरात नाही रहात, पण एकाच बिल्डींग मध्ये आहोत. म्हणालो ना, काही माणसं च्यूविंग-गम केसांना चिकटावं तशी चिकटतात!

परदेश म्हटलं की नवीन कल्चर, नवं शहर, नवी माणसं आणि नवे कोरे किस्से. तसं तर इथे बरच काही घडत असतं, पण काही ठरावीक सांगतो.

जोहॅनेसबर्ग हे अत्यंत सुंदर महानगर आहे, पण त्याचं अजून एक मोठं कारण म्हणजे इथल्या पोरी यार! काय सांगू राव! कोणाचे डोळे छान, कोणाचे केस, कोणाच स्माईल, तर कोणाची स्टाईल; हे असं आपण नेहेमी ऐकत असतो. इथे म्हणजे रस्त्यावर ब्यूटी कॉम्पिटीशन सुरू असते. नाम्या म्हणजे पहिल्या आठवड्यात सैरा-वैरा धावत सुटलेला. आपलं लग्न झालय हे विसरून, टक लाऊन उभा असायचा. मात्र फालतूपणा आम्ही कधीच केला नाही. भारताची सीमा एकदा का ओलांडली की काही लोकं चारीत्र्याची सीमा ओलांडायचा वीजा मिळालाय, असा समज करून घेतात. मी, नाम्या आणि आमच्या आजू-बाजूच्या अनेक मित्रांनी मात्र हा बॅलेन्स कधीच ढळून दिला नाही. मजा करा, दंगा करा, अरे मी तर म्हणतो व्यसन नाही लागत तितकी दारू सुद्धा प्या. आमचा नाम्या आठवड्यातून एक-दोन पेग मारतोच की. पण नको त्या गल्लीत आपली उपस्थिती दाखवणं; कधीच नाही. असो! प्रत्येकाला अक्कल नावाचा अवयव नाही देता येत देवाला, पण तो प्रकार अस्तित्वात असतो. म्हणून ते मी इथे पाजळत नाही. लोकांना तोंड काळं करायचय, त्यांनी करूर करावं. पण माझ्याकडे ‘चल की एकदा, काय होतय!’, असं म्हणत आलात पुन्हा, तर त्या रंगात निळा रंग मिसळायला मी मागे-पुढे पहात नसतो; आणि माझ्यापेक्षा नाम्या!

नाम्याचा अजून एक हिट किस्सा म्हणजे इथल्या एका सलून मध्ये घडला. जोहॅनेसबर्गमध्ये फोर्ड्सबर्ग नावाचा एक एरीया आहे. भारतीय, पाकीस्तानी, बांगलादेशी आणि आफ्रीकी लोक इथे अत्यंत शांतपणे आप-आपला धंदा करत असतात. इथल्या एका हेयर-कटींग सलून मध्ये आमची महिन्यातून एकदातरी चक्कर असते; चाऊ-थाई मेन्स पार्लर. आता पाकीस्तानी माणसानी चायनीज नाव का द्यावं त्याच्या दुकानाला हे एक कोडंच आहे. असो! तर आम्ही एका रविवारी इथे आमची डोकी दाखवायला गेलो. परदेश म्हटलं की नाम्या इंग्लिश मध्येच सुरू होतो एकदम. ते ठीक होतं, पण पाकीस्तान्यानं हिंदी सूरू केलं, तेंव्हा नाम्याची तंतरली. मग एकदम गप्प झाला आणि त्याच्या सोल्जर-कटसाठी खुर्चीवर बसला. दुकानात एक टी.व्ही. चालू होता आणि त्याचे चॅनल आमचा नागेश बदलत बसलेला. नाम्याचंच नशीब बघा, नागेश नेमका ‘गदर’ ह्याच पिक्चरवर येऊन थांबला. पाकीस्तानी सलूनवाला अचानक थांबला आणि एकदा नागेशकडे नजर टाकली. नाम्या सोडून बाकी कुणालाच काय झालं ते नाही समजलं. ‘सनी देओल’ हॅन्ड-पंप उखडतो तो सीन चालू झाला आणि सलूनवाला नाम्याचे केस त्याच स्टाईल मध्ये उखडू लागला. नाम्या आम्हाला खुणावत होता पण लक्ष कोणीच देईना. त्याची कटिंग झाली आणि आम्ही दुकानातून बाहेर पडलो. बाहेर पडताना सुद्धा नजर टी.व्ही. कडेच होती आमची. आम्ही जरा आड बाजूला आलो आणि मग नाम्यानी शिव्यांचं म्यूजियम उघडलं. मला, नागेशला, केदारला आई-बहीणीच्या इतक्या शिव्या झाल्या, आणि मग आम्हाला आमची चूक समजली. हसणं कंट्रोल होत नव्हतं, आणि नाम्याला मानेवरची जळ-जळ सहन होत नव्हती. सलूनवाल्याला, सनी देओलनी फारच पेटवलेलं. गळ्यावरून वस्तरा फिरवता आला नाही म्हणून त्यानं सगळा राग मागच्या गल्लीत, मानेवर काढला होता. कोकचा चिल्ड कॅन लाऊन नाम्या मानेला शांत करत होता.


नाम्या जेंव्हा जो-बर्गला आला तेंव्हा त्याच्या बायकोला कायगोलीला सोडून आलेला. तिच्या जवळ मोबाईल होता, पण कॉल्स महा-महाग राव! आठवड्यातून एखादा कॉल करायचा तो, आणि ते सुद्धा मस्त तासभर. तसं नुक्तच लग्नं झालेलं त्यांचं, सो तो जरा जास्तच मिस करत होता तिला. नाम्याला कधीच कोणत्या मुलीशी बोलताना मी ऐकलं नव्हतं, त्या मुळे बायकोशी तरी कसं बोलतो हे मला एक कोडंच होतं. तसा अधून-मधून माझ्याकडून टिप्स घ्यायचा, पण इमप्लीमेन्ट झालेलं कोणीच नव्हतं ऐकलं. एका रात्री मी कंपनी मधून उशीरा घरी आलो आणि नाम्याच्या रूमवर गेलो. दार सताड उघडं टाकून, अगदी अंधारात नाम्या बायकोशी बोलत होता. तसे कोणाचे पर्सनल कॉल्स ऐकू नयेत, पण माझ्या अंगातले कीडे वळवळत होते. नाम्या नक्की बोलतो कसा हे मला ऐकायचं होतं. तो डोक्यावरून पांघरूण घेऊन आरामात पडलेला, आणि आतून आवाज ऐकू येत होता. मी जवळ जाऊन ऐकू लागलो.

‘हं... काय म्हनली?... काही ऐकू येऊन नाही राहिलं... कुठंय तू आत्ता?’, नाम्याचं पुट-पुटणं सुद्धा अगदी क्लीयर ऐकू येत होता. मी मोबाईलचा रेकॉर्डर चालू केला. कीडेच ते, त्यांना मी तरी कसं आवरू!

‘... अगं त्ये रानात कशाला गेली आत्ता! त्ये शिंत्रे तिथंच बसतात परसाकडला. झाडा मागून म्हातारा कधी अनि काय ऐकल काही भरवसा नाही. तुला घान कशी वाटत नाही गं!’ मी तोंडात टॉवेल घातलेला हसू आवरायला.

‘... आनि बाकी कशेत सगळे?... हं...हं... माझी आठवन येती का? तुले येत नसेल, तरी मले फार येती’, हे मले-तुले अधून मधून बर्याच वेळेला ऐकलय नाम्याच्या तोंडून; ग्रामीण विदर्भातली अजून एक मराठी अदा.

मग एकदम रॉमॅन्टीक नाम्या जागा झाला, ‘बाहेर चंद्र पाहिलास का शीतल? कशी पोर्निमा खुलून राहीलीये बघ जरा. त्या चंद्राकडं पाहिलं की तुझीच आठवन यून रहिली बघ मले’, डोक्यावरून चादर ओढलेली ह्या ह***, आणि ह्याला चंद्र दिसला बरका! ‘...आ, काय सांगते! आज पोर्निमा नाही? चंद्र अर्धाच दिसतोय? आयला मला कसा पुर्नं चंद्र दिसून राहिला मग! त्ये देश बदलला ना की चंद्राची डायरेक्शन पन बदलते बघ’, अगगग! थाप मारावी, पण इतकी मोठी! माझ्या तोंडातला टॉवेल मी अजूनच आत दाबला. डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आणि हसू कंट्रोल करणं अवघड होत होतं.

आणि फायनली, ‘... चल आता ठेवतो रानी; बील वाढत चाललंय. आय लव यू, म्हन की येकदा... आयला म्हनलंस की लगेच! मले वाटलं लाजशील. प्र्याकटीस दिसून राहीली तुले.’ आणि मग स्वत:च जोरात हसला. खूद्द बायकोला असलं स्टेटमेन्ट हाच मारू शकतो. त्याने फोन कट केला आणि मी तोंडातला बोळा काढून जोर-जोरात हसायला लागलो. अंधारात दचकला नाम्या, आणि मग जेंव्हा ते रेकॉर्डींग त्याला ऐकवलं, तेंव्हा माझ्या उरावर बसून ते डीलीट करायला लावलं. अ‍ॅक्चूवली ते डीलीट केलं नाही मी, अजून सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये आहे. सॉरी काय करू, आहेतच तसे कीडेच अंगात!

(क्रमश:)

तिसरा भाग तसा मी संपवला होता. पण व्रूषाली, स्वप्निल, प्रशांत, आशीष, दिनेश, नागेश आणि इतर अनेक लोकांच्या सजेशन्स-कम-शिव्या खाल्या आणि कंटीन्यू करावं लागलं.

स्पेशल थॅंक्स टू ‘समीक्षा नेटके’, माझ्या ब्लॉगचा उल्लेख मुम्बईच्या ‘प्रहार’ ह्या न्यूज-पेपर मध्ये त्यांच्या लेखात केल्याबद्दल. हा लेख तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर...

१. http://epaper.prahaar.in/ ही वेबसाईट ओपन करा.
२. वरती तारीख ६ फेब्रीवारी २०११ करा. क्लिक बटन `GO'.
३. वरतीच ‘कोलाज’ ह्या पुरवणी वरचं, ४ नंबरचं पेज क्लिक करा.
४.  लेख : ‘व्यायामसोहळा’.

4 comments:

 1. मस्तच होती लेखमालिका.. आवडली.. मनात आणले तर संपूर्ण कांदबरीच लिहू शकता तुम्ही या व्यक्तीरेखेवर..

  ReplyDelete
 2. mhatrecha foto dakava na rav! ...ani abhinandan prahaarmadhye zalaklyabaddal.. thnx 2 samixa netke also..

  ReplyDelete
 3. Thanks Sanket and Hemant.
  Hemant: Arey Mhatre cha photo dakhavta ala asta tar mala pan bara watla asta. Pan ji vyakti astitvat naahi ticha photo kasa kaay dakhvu mitra! :D

  ReplyDelete
 4. Hey hi thr,
  Keep writing with this "Namya"
  Bhari Hi Fundo patra rangavlays
  kharach namya asava itake chaan kisse aahet
  "NaMyA RoCkS"
  Ekch number Dusra numberch nahi :)

  ReplyDelete