Monday, January 31, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग २...)

अनेक महिने उलटत गेले. कधी नाम्या आणि मी एकाच प्रोजेक्ट मध्ये असायचो, तर कधी क्लायंटंच वेगळे. नाम्याला त्या कंपनीत येऊन, एक-सव्वा वर्ष झालेलं तसं, आणि एका सकाळी नाम्या आणि मी कॅन्टीन मधे गेलो. तिथे कंपनीतली एक अप्रतीम मुलगी मला भेटली आणि आम्ही थोड्यावेळ बोलत उभे राहिलो. थोड्या वेळाने ती निघून गेली आणि ब्रेक-फास्ट करून आम्ही परत आलो. उरलेला पूर्ण दिवस नाम्या एकदम शांत. लंचच्यावेळी सुद्धा काहीच बोलला नाही. मला वाटलं तब्येत बरी नसेल म्हणून मी एक-दोनदा विचारलं देखील. रात्री जेवणाच्या मेसवर ताट समोर येईस पर्यंत तोंड एकदम बंद त्याचं. मी पहिलाच घास घेतला आणि नाम्या तेंव्हा अचानक बोलला,


‘सम्या येकतरी पोरगी पाहिजे मला’

मला ठसकाच लागला एकदम,

‘ह्ये घ्ये, पानी पी’, पाण्याचा ग्लास मला भरून देत म्हात्रे बोलले, ‘भ*** ठसका तर असा लागलाय जसं काय मी वाईट-वंगाळ बोलून राहिलो. अबे पोरगी पाहिजे म्हनजे गर्ल-फ्रेन्ड म्हनून राहिलो ना बे! तुझं डोकं कसं चाललं असेल ते ठाऊके मला.’

मी ठसक्यातून सावरत म्हणालो ‘अबे ह***, तू एक तर अक्खा दिवस थोबाड बंद ठेवलंयस, आणि जेंव्हा उघडलं तर डायरेक्ट हे स्टेटमेन्ट. काय, झालय काय तुला?’

‘तुला ना मित्राचं दुख: दिसेना झालंय. नाही, बरोबरे! स्वत:चं पोट गच्च भरल्यालं असंल, तर दुसर्याच्या बरगड्या काऊ-मुन बघनार तुम्ही!’ नाम्याच्या चेहेर्यावर फ्रस्ट्रेशन साफ दिसत होतं, पण मला आणि आमच्या इतर मित्रांना हसू आवरेना.

‘हसू नकोस आनी येकतरी मैत्रीन मिळवून दे यार सम्या! तुला सांगतो सच्या, ह्या सम्याला नेहेमी पाहातो मी. एक पोरगी नसेल कंपनीत जिच्याशी ह्याची ओळख नाही. अन येकाच घरात राहून आम्हाला बघा. आमचा नंबर एकाजरी पोरीच्या फोन मध्ये दिसला तरी तिच्याशी लग्नं करीन मी, ती कशी का असेना मग! आयला माझ्या शेजारी बसनार्या त्या माधवी शक्शेनाला मी ‘चहाला येती का?’ असं विचारलं तर मला ‘नाही नको, मी चहा घेत नाही’, असं हिंदीत म्हनली. आनी पंधरा मिनीटानंतर ह्या सम्या सोबत कॉफी ढोसताना तिला मी पाहिलं. आता तूच सांग, का नाही जलनार माझी! हसनं बंद कर आधी आनी मदत कर यार सम्या.’

मी ताकाचा घोट घेतला आणि हसू आवरून त्याला म्हणालो, ‘अरे नाम्या, त्या नुसत्या फ्रेन्ड्स आहेत माझ्या.’

‘ते काही नको सांगू, फक्त पोरगी पटवून दे. लग्न कराचय बे, आता बास झालं!’ अगदी केवीलवाणा चेहेरा झालेला रे त्याचा!

मग मी कीराणा मालाची यादी सांगावी तशी कंपनीतल्या मुलींची नावं घेऊ लागलो. ह्यातून नाम्याचा चॉईस काय आहे ते पहायचं होतं मला.

‘काजल खन्ना’... ‘अबे तिच्या नावातच बॉलीवुडचा वास येऊन राहिलाय. तिला म्हातारपनी जरी मी प्रपोज क्येलं, तरी कवळी बाहेर काढून, चावा घेऊन हकलून लावेल मला.’

‘प्रियांका कुलकर्णी’... ‘वा वा! काय पन नाव घेतायत साहेब बघा! अबे ती अशी पोरगी हाये, जिन्हं फ्येसबुक मधे परवा नुस्तं ब्रॅकेट आनी ठिपके असं काढलं...’, नाम्यानी समोर ताटाच्या खरकट्यावर :( हे चिन्ह काढून दाखवलं, ‘... तर नुस्तं ब्रॅकेट आनी दोन ठिपके असं काढलं तर तिला तीस कमेन्ट आल्या पोरांच्या. काही जनं तर बहुदा विचारपूस करायला तिच्या डेस्कवर पन गेले असतील ल्येकाचे. आनी आम्ही फ्येसबुक मधे त्येच केलं बरका; शेम-टू-शेम त्येच केलं; तर आम्हाला कमेन्ट तर नाहीच नाही, वर चार ‘लाईक’ आले त्या मेसेज ला. आता मला रडू येऊन राहिलं, श्याड फील होऊन राहिलं, ह्यात लाईक करन्या सारखं काये मित्रा!’, आम्ही डोळ्यातून पाणी येईस तोवर हसत होतो. नाम्या म्हणजे पेटला होता, ऐकायलाच तयार नाही! पोरगी पटवणं जर इतकं सोपं असतं तर मी स्वत: आई-बापाला कशाला अरेंज्ड-मॅरेजचा त्रास दिला असता!

‘त्ये काही नाही, दिवाळीवरून आलो परत आपन सगळे, की सम्या तू मदत करनारेस माझी सोईरीक जुळवायला. नैवेद्यापुरत अफेर झालं की लग्नच करायचय डायरेक्ट मला.’ अशी त्याची बड-बड ऐकत आम्ही टेबलावरून उठलो. नाम्यासाठी मुलगी पटवायला जायचं, म्हणजे स्वत:च्या मैत्रीणी घालवून बसायची भीती होती मला. नाही, नाम्यात काहीच कमी नव्हतं ओ, पण जे होतं ते जरा जास्तंच होतं. पण तरी मी अ‍ॅटलीस्ट एक सिम्पल मैत्रीण त्याला मिळवून द्यायला ट्राय करायचं ठरवलं. काही दिवसांनी आम्ही सगळेच दिवळीच्या सुट्टीसाठी आप-आपल्या गावी गेलो; मी पुण्याला, कोणी इंदौरला, कोणी दिल्ली तर कोणी चेन्नईला रवाना झाले. नाम्यासुद्धा त्याच्या गावी गेला; बुलडाणा जिल्ह्यातलं त्याचं कायगोली हे छोटसं गाव. नाम्याच्या भाषेत ‘प्रत्येकाला प्रत्येकाच्या चपलीचा साईज सुद्धा पाठ असंल’, इतकं छोटं गाव.

दिवाळीतंच आईनी मला एक गठ्ठा हातात दिला; अ‍ॅट-लीस्ट डझनभर मुली माझ्या लग्नासाठी शॉर्टलिस्ट केल्या होत्या. ‘अगं आई, पण इतकी काय घाई!’, असा वैताग मी काढला तर माझी आई म्हणाली, ‘अरे राजा, वय होत आलं आता आमचं. सगळं वेळेत झालेलं बरं असतं.’, हे इमोशनल वाक्य माझी आई माझ्या वयाच्या दुसर्या वर्षापासून मारत आलीये. ऐकून घेत आलोय, काय करता! स्वत: आईच हातात फोटो देतीये म्हटल्यावर मी निर्लज्ज होऊन फोटोतल्या पोरी नीट न्याहाळू लागलो. त्यात एकतर इतकी भारी होती यार, काय सांगू! पण तिची डेट-ऑफ-बर्थ मी इयत्ता पाचवीत असतानाची होती. म्हणजे माझं लग्न उतारवयात झालं असं नाही बरका, तर तिच्या बापाला घाई झालेली तिच्या लग्नाची. आईला-बाबांना सुद्धा ते मान्य नव्हतं, कारण तब्बल आठ-नऊ वर्षाचं अंतर होतं आमच्यात. पण ह्या आई नामक जीवाला लग्नाची इतकी घाई असते, की मी मुकाट्याने फोटो पाहिले, नकार दिला, एक वाद घातला, आणि मुंबईला परत आलो. असे अनेक आठवडे चालत आलेला हा सीन. त्या प्रकाराचे तर इतके आयटम किस्से आहेत, सो त्यासाठी एकदा वेगळं बसू आपण.

वाशीला परत आलो आणि कळालं नाम्याला अजून एक-दोन दिवस उशीर होणार आहे यायला. ‘सगळं ठीक आहे ना?’ हे विचारायला मी त्याला कॉल पण केला. फोनवरसुद्धा मोघम उत्तरं दिली त्याने. तीन दिवस लीव्ह एक्सटेन्ड करून तो परत आला. एरवी गावी गेला की खायला हमखास काही ना काही घेऊन येणार. पण ह्या वेळेस आला तो मोकळ्या हातानी आणि त्याहून अस्वस्थ करणार्या त्याच्या शांतते सोबत. इतकं शांत मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. ‘अरे नाम्या काय झालं गावाकडे, काहीतरी सांग?’, असं मी सतत विचारत होतो, पण तो काहीच बोलेना. दहा एक दिवस उलटून गेले पण तरी काहीच बदल नव्हता. मेसवर सुद्धा आला तर यायचा जेवायला, नाहीतर एकटाच टी.व्ही. चे चॅनल बदलत घरात पडून रहायचा. एके दिवशी माझी नजर सहज त्याच्या व्हिस्कीच्या बाटलीकडे गेली, तर थोडं विचित्रंच वाटलं. ती बाटली अर्ध्याहून अधिक भरलेली होती. नाम्या बेवडा नव्हता, पण एक दिवसाआड, किंव्हा मूड प्रमाणे, एक पेग तरी नक्की मारणार. मग मात्रं माझी काळजी एकदम वाढली, आणि म्हणून त्याला चीयर करायला मी घरातच एक पार्टी ठेवली. वीकएन्डला ग्रूप मधली दहा-बारा पोरं आली, बीयर आणि कोक आणलं, राजीबनी मस्तं चिकन बनवलं, आणि अ‍ॅज-यूज्वल झकास मैफिल जमली. हे सगळं हरवलेल्या नाम्याला परत आमच्या जगात आणायला केलेलं होतं, हे त्याला सोडून सगळ्यांना माहीत होतं. नाम्यासुद्धा जरा मूड मधे येऊ लागला. सो द प्लॅन सीम्ड टू बी वर्कींग. तेवढ्यात नाम्याचा मोबाईल वाजला. कायगोली वरतून फोन होता हे लक्षात आलं, कारण नाम्या पुन्हा सीरीयस झाला आणि फोनवर बोलायला आतल्या रूम मधे गेला. पाच एक मिनीटात बाहेर आला तो डोळे लाल आणि पाणावलेले घेऊन. बाकी कोणाचं लक्ष नाही गेलं त्याच्याकडे, आणि सगळ्यांची नजर चुकवून तो बाहेर निघून गेला. तो टेरेसवर गेलाय हे मला माहीत होतं, म्हणून मी भयनाक टेन्शन मधेच त्याच्या मागे पळालो. बाकी मित्रांना कशाचा अंदाज लागला नव्हता, सो दे कंटीन्यूड द पार्टी.

टेरेसवर गेलो आणि नेहेमीच्याच ठीकाणी, म्हणजे बिल्डींगच्या टाकीवर नाम्या बसला होता. मी वरती त्याच्या जवळ गेलो. नाम्या रंगानी ठीक्कर काळा होता, पण चंद्रप्रकाशात त्याच्या गालांवरचा ओलसरपणा लपला नाही.

‘नाम्या, भ***, आत्ताच्या आत्ता खरं काय झालंय ते बोलणार आहेस तू! डूड, आय कान्ट टेक धिस एनीमोर. प्लीज बोल यार. प्लीज काहीतरी...’

‘बाप मेला माझा आत्ताच सम्या’, माझं वाक्यं आणि मन अर्ध कापून काढलं त्याच्या वाक्यानी. त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं, पण तो ढसा ढसा रडत नव्हता.  तेवढ्यात मला काहीतरी आठवलं. ‘बाप मेला मित्रा, परत चाललो’, हे तो मला इंडक्शन प्रोग्रॅम मधे बोलला होता. मी थोडा अजूनच गार पडलेलो. ‘अरे पण तू तर म्हणालेलास...’

‘मला माहितीये तू काय विचार करून राहिलायस’, नाम्याला सुद्धा ते वाक्य आठवत होतं. मी त्याच्या शेजारी बसलो आणि खांद्यावर हात ठेवला. आय सिरीयसली डिडन्ट नो हाऊ टू रीयॅक्ट! एक मोठा सुसकारा टाकत आणि गाल पुसत नाम्या बोलला,

‘सम्या मला बाप खरं तर कधी नव्हताच. फक्त आईच्या कपळावर, आनि हळदी-कुकवाच्या कार्यक्रमात तिच्या ओटीत त्याचा प्रेझेन्स, बस्स! त्या दोघांचं लग्न झालं अन त्याची नोकरी गेली. मग काय; दोन एकर शेती, जी आमचे आबा सांभाळत होते, तीच तो नांगरू लागला. पन पाऊस कुठंय रे विदर्भात! त्याच वर्षी पूर्न शेत विकायची वेळ आली. बसा तिचायला बोम्बलंत! मग माझा जन्म झाला...’ नाम्या एकुलता एक मुलगा आहे हे मला ठाऊक होतं. ‘...माझा जन्म झाला आनी मग तो एकदम बदलंत गेला. पोटाच्या खड्ड्याचं फ्रस्ट्रेशन त्यानं दारूनं भरून काढलं. आमच्या इथे पान्याची टंचाई असंल पन म*** दारू कधीच संपनार नाही. बाटली आली आनी मग पाठोपाठ बाई पन आली बापाकडे. पन ती आई नसून आमच्या गावातली येक क्यारेक्टर-लेस बाई होती. आईला, मला आनि आबाला सोडून तो तिच्याकडे चालला-ग्येला. मग काय, वाताहत टू बी कंटीन्यूड की रे सम्या! काही दिवसांनी त्या दोघांनी गावंच सोडला. तेंव्हा पासून मल्हारजी इज प्रेजेन्ट ओनली इन माय मिडल नेम.’

बीयरचा एक घोट घेत त्याने पुन्हा डोळे पुसले. माझा श्वास सुद्धा कापत होता हे जाणवू लागलेलं मला. इतकी डिस्टर्बिंग लाईफ-हिस्टरी माझ्या सोबत रोज रहात होती हे कधी समजूनच येऊन नाही दिलेलं ह्या हलकटानं. नेहेमी हसत-हसवत रहाणार.

‘...आपल्या पहिल्या भेटीत मी जेंव्हा म्हणालो की माझा बाप मेला, तेंव्हा त्यानं एका तिसर्याच बाईशी लग्नं क्येलाचा मला फोन आलेला सम्या. आईला सांभाळायला परत जावं लागलं. बापाचा सपोर्ट काय असतो सम्या हे तुमच्या सारख्या मित्रांच्याच घरात पाहतो मी; बरं वाटतं! दिवाळीत कळालं की त्याला आजार झालाय कोनतातरी. मी विचारायला सुद्धा नाही गेलो. कशाला जाऊ! अरे माझा चेहेरा सुद्धा लक्षात नसेल त्याच्या. आता सुद्धा जाईन ते आई खातर, अन आबाचा आग्रह म्हनून त्याला आग द्यायला. नाहीतर, नॉट याट ऑल नीडेड!’

त्यानं बीयर संपवली आणि पुढचा अर्धा तास आम्ही बसून राहीलो तिथेच. मधे मी मेसेज पाठवला खाली ‘शट द पार्टी, नाम्याज फादर एक्सपायर्ड!’ रात्री त्याला झोप येईना म्हणून बाईक्सवर एका लॉन्ग ड्राईव्हला सगळेच गेलो. सकाळी त्याला गाडीत बसवून दिलं आणि मग पुढचे पंधरा दिवस तो गावाकडेच होता.

दोन आठवडे होऊन गेलेले. सकाळी सहा वाजता मी बेड मध्ये गाढ झोपलो होतो. अत्यंत भयानक स्वप्न पडत होतं आणि अचानक माझ्या अंगातला टी-शर्ट कोणीतरी फाडतय असं मला जाणवलं आणि दचकून जाग आली. नाम्यानी माझ्या अंगातल्या टी-शर्टला फाडून त्याचं जॅकेट केलं होतं, ‘अबे येडा झालास का नाम्या!’ मी ओरडतच उठलो.

‘अबे भ*** तुम्ही पुनेकर कशात पैशे वाचवाल समजून नाही राहिलं मला. कीतींन्दा सांगून राहीलो मी हा शर्ट नको घालूस म्हनून. फाटके कपडे घालनं दलिंदराचं लक्षन असतंय. आनि ऊठ लवकर तुझ्यासाठी न्यूज आहे माझ्याकडे. लग्न ठरलं ल्येका.’

चिंध्या झालेला टी-शर्ट फेकत मी ओरडलो ‘अबे काय सांगतोस! कोण, कुठली, कसं काय, काय करते?’

‘अबे मला पन थोडं विचित्रंच वाटून राहिलय सगळं, पन आईनं आधीच पाहून ठेवलेली म्हने. यंगेजमेन्ट आहे दोन महिन्यानी. गावतलीच आहे, वर्गात होती माझ्या, साळेत असतानी. आयला तेंव्हाच पटवली असती तर लऊ-म्यारेज झालं असतं ना गड्या! म्हनलं तुझ्या भरवश्यावर रहान्यात काहीच पॉईन्ट नाही. आमच्या विदर्भातली पानी टंचाई संपेल पन पोरगी पटायची नाही.’

‘नामदेव मल्हारजी म्हात्रे’ वॉज बॅक!

(क्रमश:)


भाग १ च्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद!
It takes a lot of efforts and time, and much more thinking to write. Feels good when there are people behind you and your art. Enjoy!  आणि नक्की कळवा रे!


6 comments:

 1. कीप इट अप समीर
  पुलचा प्रभाव जाणवतो आहे

  पण खूपचा सुंदर
  लिखाण असचा चालू ठेवा

  ल्हानपणी चांगली मराठी पुस्तक वाचण्याचा हा परिणाम

  एका वाक्यात सांगायचा तर

  दर्जा !

  ReplyDelete
 2. Hi Sameer yaar khup changle lihitos! Ata tar next episode chi curiosity lagliy. Lavkar Lavkar lihit ja !

  ReplyDelete
 3. vachtoy! vachtoy!! ..pudhcha bhag ajun nahi?? athavda zalaa ki leka!

  ReplyDelete
 4. samya yedya..
  nusta dhamaal karoon rahila na re ba too.
  sahi re sameer waiting for next.

  ReplyDelete
 5. Ha ha... @Hemant, @ Veerendra... Zara wel lagel pudhcha lihayla... Punyala lavkarach parat jaychay. So waiting for that to happen first. Thanks!

  ReplyDelete
 6. छान लिहलंय राव... वैदर्भी सेंट्रल कॅरॅक्टर बघून माहेवाले डोळे भरून येऊन राह्यले ना राजेहो.. ;)
  माहोल करून राह्यले तुम्ही..

  ReplyDelete