Sunday, December 18, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ६...)


‘...आब्ल ततय इम्ल कुलकुल बाप शि शि...’, 

असं काहीतरी बापट, तोंडात गच्च भात-आमटीचं मिश्रण धरून पुन्हा सुरू झाले. त्याच बरोबर मी आणि सिद्धार्थनी ते टेबलंच सोडलं. कॅन्टीन मधली सगळीच टेबलं खर्कट्या हातांनी आणि ताटांनी गच्च भरली होती, तरी सुद्धा आम्ही दोघांनी उभं राहून जेवण प्रेफर केलं.

‘काय द्वाड जेवन दिलेत की, काय की!’, खंडागळे तणतणत हात धुवायला गेले. वास्तविक लंच मधे काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण ते ब्रेकफास्ट सारखं फुकट नव्हतं ना; मग तणतण होणारच की ओ!

Monday, December 5, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ५...)कंटाळून सुस्कारे टाकल्यामुळे माझी फुफुसं भलताच रीझल्ट तर नाही ना देणार, ह्या टेन्शनमधे मी वेळ आणि रांगेतल्या खुर्च्या मागे ढकलत बसलो होतो. शेवटी माझा आणि बापटांचा नंबर लागलाच आणि आम्ही दार ढकलून आत गेलो. तिथे एक वॉर्ड-बॉय कान कोरत बसला होता.

‘बसा बसा, डाक्टर येतेत.’

आम्ही शांतपणे खुर्चीवर बसलो आणि माझी नजर खोलीभर भिरभिरू लागली. समोरच्या भिंतीवर फुफुसाचा आंतरीक डायग्रॅम लावला होता; शाळेतल्या बायोलॉजीची आठवण झाली मला. शेजारी सिगारेट पिल्याने काय आणि कशी हानी होऊ शकते ह्याची माहीती दिली होती. त्या शेजारच्या भिंतीवर दमा आणि ईतर श्वसनांच्या विकारांची माहीती दिली होती. नंतर माझी नजर कडेला असलेल्या एका कंप्यूटरकडे गेली. त्याला एक नळी जोडली होती. कुतूहल म्हणून मी विचारलं,

‘काय ओ, काय म्हणतात ह्या मशीनला? ’

‘काय माहीत की काय म्हनतेत! कॅम्पूटरंच म्हनतेत, आनि काय’, वॉर्डबॉयने कान कोरून कमावलेलं ऐवज त्याच्या करंगळीच्या नखातून साफ करत मला सांगितलं.


Wednesday, November 23, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ४...)

एक्स-रे ची प्रक्रीया सुरू होणार तोच आमच्या हातात एक नवाच फॉर्म देण्यात आला; ‘प्रेग्नंसी डेक्लरेशन’ फॉर्म. म्हणजे आमच्यापैकी कोणी गरोदर असल्यास आधीच कबूल करावं; असल्यास एक्स-रे काढतेवेळी विशेष काळजी घेण्यात येईल, असं त्या फॉर्ममधे लिहीलं होतं. आता तो फॉर्म मला, इनफॅक्ट कोणत्याही पुरूषाला का दिला असावा? मी कनफ्यूज होऊन इकडे-तिकडे पाहू लागलो. तितक्यात शेजारी बसलेल्या एकाने माझ्या खांद्याला हात लावून विचारलं,

‘पेन आहे का ओ?’

आता मात्र हद्द झाली. मी म्हणलो,

‘अरे मित्रा, तो फॉर्म आपल्यासाठी कशाला असेल!’

Monday, November 7, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग ३...)

ब्रेकफास्टची सोय हॉस्पिटलच्याच कॅन्टीनमधे केलेली, आणि ती सुद्धा एकदम झकास. सोलापुरी काका इतक्यावेळ कापसाचा बोळा हातामध्ये घट्ट धरून बसले होते.

‘काय काका, नर्स फारच आवडली दिसतीये?’, गण्यानं हातात चहाचा कप धरून विचारलं.

‘काय फालतू बोलालास बे उगी!’

‘नाही ते कापसाचा हात अजूनपर्यंत छातीला कवटाळून बसलेत, म्हनून विचारलं. ते कापूस टाका तिकडं डसबिन मधे, आनि चला नाषत्याला’, वाकडंच बोलायचं कधीपण, सरळ जमतंच नाही आपल्याला!

एक तर बारा-तेरा तासांचा उपास घडलेला, म्हणून आधीच हापापले होते सगळे. पण सिद्धार्थ नामक माणसाला वेगळ्याच भुका लागलेल्या. एका पोरीच्या पाठीशी हा मित्र गेले दोन तास उभा होता. आल्यापासून सतत,

‘आयला मिनीमम मोबाईल नंबर पाहिजे राव हिचा!’,

Thursday, November 3, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग २...)‘रक्त तपासनीसाठी रांगेत बसा. एका वेळेला दोघंजन आत जायचं... ओ काका ते कार्डं काखेत घालू नका ओ, किती वेळा सांगू आता!’, गण्या पुन्हा आमच्या वर्गाचा मॉनीटर झालेला.

मी सगळ्यात पुढे जाऊन बसलो. माझ्या शेजारचे एक गृहस्थ, माझ्या कार्डाची, स्वत:च्या कार्डसोबत तुलना करत बसले होते.

‘तुझ्या टेश्ट जास्त कशा रेSSS?’, तुलनेचा रीझल्ट मला ऐकवत त्यांनी विचारलं.

‘काका माझा दहा हजारचा प्लॅन आहे, तुमचा पाच हजारचा.’

‘हे सगळे पैशे काढण्याचे धंदे बघ, दुसरं काही नाही.’


Monday, October 24, 2011

फुल्ल बॉडी चेकप (...भाग १...)

बाप! किमान शंभर व्याख्या सहज असतील ह्या शब्दाच्या. लग्न झालेल्या पोरींच्या डोळ्यांच्या कडा सहज ओल्या करणार हा विषय आहे. पण तो क्षण, जेंव्हा एक स्त्री आई होते आणि एक माणूस बाप होतो, तो क्षण मात्र बहुतेक लोकांचा एकसारखाच असावा. स्वत:च्या बाळाला अगदी पहिल्यांदा मांडीवर घेऊन पहात बसण्यात ज्या भावना जाग्या होतात, त्या बाप लोकांच्या डोळ्याच्या कडा सहज ओल्या करुन जातात. माझ्या आयुष्यात सुद्धा तो सुखद क्षण एके दिवशी आला. पहाटेच बायकोला अ‍ॅडमिट केल आणि सुमारे पाच-सहा तासात ‘गुड न्यूज’ हा प्रकार काय असतो, त्याची अनुभूती झाली. डॉक्टर बाहेर आले आणि ‘सगळं नॉर्मल आहे’ अस सांगून निघून गेले. मग दना-दन फोन बाहेर निघाले आणि आमच्या बाळाचा जन्म ही एक ग्लोबल न्यूज झाली. पुण्याच्या एका प्रख्यात मॅटर्निटी हॉस्पिटल मधले सगळे लोक माझ्याचकडे पहात आहेत असा भास मला होऊ लागलेल; किंबहुना तसं एक्सप्रेशनंच मी चेह-यावर ठेऊन वावरत होतो. अर्ध्या तासात एक मध्यमवयीन नर्स, अत्यंत मक्ख चेह-याने बाळाला बाहेर घेऊन आली आणि त्याला माझ्या हातात दिल. ती पाठ फिरवून परतणार तोच मी तिला विचारलं,
‘नर्स! आणि माझी मिसेस...’‘सिस्टर म्हणा सिस्टSSSर!’, तेच मक्ख एक्सप्रेशन चेह-यावर ठेऊन तिने अत्यंत थंडपणे, पण जरा चढत्या स्वरातंच मला हटकलं.

Monday, June 13, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग ३...)

लिफ्ट देणे-घेणे ह्यात खरंतर मी वेगळं असं काही करतोय असं मुळीच नाही; नाही म्हणजे कौतुकास्पद वाटवं असा इव्हेन्ट नाहीच आहे तो. पण आज लिफ्ट देण्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये मला एकदाही नॉर्मल माणसं भेटलेली नहीयेत. ह्याचाच अर्थ ह्या जगात कोणीही नॉर्मल नाही हेच सिद्ध होतं. गंमत अशी की लोकंही काही वेळातच पर्सनल गोष्टी शेयर करू लागतात. अनोळखी माणसासमोर स्वत:ची सुख-दुख: उलगडायला कसलीच शरम नाही कींवा रीस्क नाही. कोणाच्या घरी मृत्यू झालेले असतात म्हणून चक्क थोडी रडारड, तर कोणी आजोबा झालेला असतो तर त्याच्या नातीचं त्याच कौतुक. कोणाचं अप्रेझल बकवास झालेल असतं म्हणून मॅनेजरला शिव्या, तर कुणी नवा धंदा सुरू केलेला असतो ह्याच्या प्लॅनची उमेद. आणि हे ऐकायच्या बदल्यात आपण काय देतो! कान आणि गाडीचं सीट. आपला प्रवास कुठून कुठेही असू शकतो. लोकं निराळी, त्यांचे एक्सपीरीयन्स निराळे आणि स्वभाव तर त्याहून निराळे. असाच एक प्रवास म्हणजे आमची शिर्डी यात्रा. मी आणि माझा मित्र सचिन, असे आम्ही दोघेच शिर्डीला जायच ठरवलं. साईबाबांच्या कृपेनेच, आमच्या बाबांनी कारने जायची परवानगी दिली. पुणे-शिर्डी हा प्रवास तसा तीन ते साडे-तीन तासांचा. पण ध्यानी-मनी नसताना असं एक कुटुंब सोबत आलं की ज्यामुळे मी आज सुद्धा सच्याच्या थोतरीत ठेवून देऊ शकतो.

Monday, April 11, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग २...)

लिफ्ट मागण्यासाठी दरवेळेस अंगठा दाखवलाच पाहीजे असं नाही. एखादाच जगदाळेसारखा अचानक येऊन बसतो, तर काही जण रेल्वेचा झेंडा दाखवल्यासारखं हात बाहेर काढून उभे रहातात. आंगठा सुद्धा आडवा धरलाच पाहिजे असा काही लेखी रूल नाहीये; आडवा, उभा, तिरपा, कसाही चालतो. पण असेही काहीजण सापडलेत मल जे दबा धरून बसलेले असतात. काहीजण डबा धरून बसलेले सुद्धा असतात, पण त्यांचा ह्याचाशी काही संबंध नाही.  कोण, कधी, कुठे, चाललाय हा वास जणू ह्या दबावाल्या पब्लिकला येतो. हेतू एकच, फुकट प्रवास. असाच एक लिफ्टभुकेला ईसम मला नेमका सिनेमा थेटरच्या बाहेर सापडला. सापडाला म्हणजे खरंतर त्यानेच मला शोधलं. झालं असं की आमच्या घराजवळच्या थेटरमधून मी तिकीटं काढली आणि घरी निघालो होतो. संध्याकाळचे चार वाजले होते आणि शो होता साडे-पाचचा. मी थेटरबाहेर आलो आणि माझ्या गाडीपाशी एक आजोबा उभे होते. माझ्या गाडीच्या टाकीवर अगदी हक्कानी एक पिशवी ठेवून ते कोणाचीतरी वाट बघत होते. डोक्यावर एक जुनी, पांढरी, कापडी हॅट; जी पुरातन काळातील केसांचे काही अवशेष लपवत होती. डोळ्यावर सात ते आठ नंबरचा चष्मा. अंगात एक बुश-शर्ट आणि पॅन्ट, तर पायात साध्या चपला. आजोबांचा चष्मा इतका जाड होता की डोळे ताणून बघताना एक स्माईल आपोआप तयार होत होता.

Sunday, March 27, 2011

निशाणी आडवा अंगठा (...भाग १...)

मला मुळातच ड्राईव्ह करायला खूप आवडतं. पण पुण्याचा ट्रॅफिक बघता कार चालवायची इच्छा इतकी मेली आहे की एक वेळ गच्च भरलेल्या बसने प्रवास करणं बरं वाटतं. म्हणून मी बाईक प्रेफर करतो. ऑफिस तसं चौदा-पंधरा कि.मी. दूर आहे, पण रस्ता माझ्याच आजोबानी बांधला आहे, आणि पुढे मेनटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा माझ्याच बापाला मिळालय, अशा मॅच्यूरीटीनी लोकंही गाडी चालवतात आणि मीही. त्यामुळे पुण्यात किंवा मुंबईत वेगळं मेडीटेशन करायची गरज पडतच नाही. ‘गाडी चालवा, एकाग्रता वाढवा’, असा समाजसुधारक विचार इथे मांडण्यात आलेला आहे. ह्या संपूर्ण एक-कल्ली यात्रे मध्ये कधीतरी असा क्षण येतोच जेंव्हा एखादी नवी व्यक्ती, अखाद्या नव्या अनुभवाची बॅग लटकवत, हमखास भेटते. ही गूढ व्यक्ती रसत्याच्या कडेला अत्यंत केवीलवाण्या (किंवा अत्यंत माजलेल्या) स्टाईलमध्ये अंगठा दाखवत उभी असते. ह्याला बोली भाषेत ‘लिफ्ट मागणे’ असे म्हणतात. मी अशी मदत बर्याचदा करतो हे माझ्या बायकोला मुळीच आवडत नाही. तिचा पॉइन्ट सुद्धा बरोबर आहे. कोण, कसा असेल काही सांगता येत नाही. पण मी तसा माणूस बघून थांबतो आणि ह्याच यात्रांमध्ये मला अनेक पर्सनॅलिटीज भटेल्या आहेत, ज्या आता तुम्हाला देखील भेटवतो.

Monday, March 21, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग ४...)

जोहॅनेसबर्ग मध्येच ‘चायना टाऊन’ नावाचा इलाका आहे. जन-गणना फोफावली की हलवलेल्या सोड्यासारखी माणसं बाहेर वाहू लागली; जशी भारतीय, तसेच चायनीज. भारतीय जसे धंद्यात आणि नोकरीत दिसतात, तसे चायनीज जास्त करून धंद्यात दिसतात. त्यांची इंग्लिशची बोंब आहे. त्यांच्या सोबत आपण व्यवहार करणं महा-मुश्किल. व्यवहारात अत्यंत चिकट असतात आणि घासा-घीस तर बिलकुल नाही. ‘चायना टाऊन’ हा होल-सेल चा माल विकायचा बाजार. तिथे चड्डी घ्यायची तर ती सुद्धा डझनावारी. ‘एक सिंगल-पीस दे की रे’ असं म्हणालो की समोरचा ब्रूस ली दुकाना बाहेर कीक मारून उडवून लावतो. आणि त्यात त्यांच इंग्लिश; अगगग! त्यामुळे नाम्यालाच मी पुढे करायचो भाव करायला. नाम्या म्हणजे अस्सल चायनीज स्टाईल मध्येच बोलायाला सुरूवात; म्हणजे इंग्लिश मध्ये बरका. असेच एका शनिवारी आम्ही अनेक जण तिथे गेलो होतो. मला घरात घालायला थ्री-फोर्थ चड्डी घ्यायची होती. तिथे आधी अनेकदा गेलेलो त्यामुळे अनुभवा वरून मी नाम्यालाच डायरेक्ट पुढे केलं. नाम्या दुकानात शिरला जुगलबंदीसाठी.

Saturday, February 19, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग ३...)

बायोडेटा वरती एक्स्पीरीयन्स ३.६ दिसू लागलेला. हे अनुभवाचं वय सांगायची गम्मत अशी की आज-काल माझ्या मुलाचं वय सुद्धा मी १.३ सांगतो. नॉन-आयटी वाल्या लोकांना गम्मत वाटते ऐकताना. तर मूळ मुद्दा असा की ३.६ वर्ष झालेली आणि मी मुंबई सोडून पुण्याला आलो. काही दिवसांनी नाम्यानी कंपनीच सोडली आणि पुण्याला शिफ्ट झाला. दोघांचीही लग्न ठरलेली. माझी होणारी बायको विदर्भातली आहे ह्या एकाच पॉइन्टवरती तो माझा मेव्हणा झाला. 

Monday, January 31, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग २...)

अनेक महिने उलटत गेले. कधी नाम्या आणि मी एकाच प्रोजेक्ट मध्ये असायचो, तर कधी क्लायंटंच वेगळे. नाम्याला त्या कंपनीत येऊन, एक-सव्वा वर्ष झालेलं तसं, आणि एका सकाळी नाम्या आणि मी कॅन्टीन मधे गेलो. तिथे कंपनीतली एक अप्रतीम मुलगी मला भेटली आणि आम्ही थोड्यावेळ बोलत उभे राहिलो. थोड्या वेळाने ती निघून गेली आणि ब्रेक-फास्ट करून आम्ही परत आलो. उरलेला पूर्ण दिवस नाम्या एकदम शांत. लंचच्यावेळी सुद्धा काहीच बोलला नाही. मला वाटलं तब्येत बरी नसेल म्हणून मी एक-दोनदा विचारलं देखील. रात्री जेवणाच्या मेसवर ताट समोर येईस पर्यंत तोंड एकदम बंद त्याचं. मी पहिलाच घास घेतला आणि नाम्या तेंव्हा अचानक बोलला,

Sunday, January 23, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग १...)

आपल्या लाईफ मधल्या घटना आणि त्यात भेटणारी माणसं जर आपल्याला निवडता आली असती तर अ‍ॅट-लीस्ट मला तरी बोर झालं असतं. निसर्गानं असं काही आर्कीटेक्चर बनवलय, की जे कोणी आपल्याला भेटतं, त्याचं काही-ना-काही कारण नक्की असतं. म्हणजे लगेच प्रत्येक नात्यात ‘आपलं काही काम निघतय का!’, हे शोधायला सुरु करा असं मी मुळीच म्हणणार नाही. लोकं भेटत जातात, नाती बनत जातात. इट्स यू, हू हॅज टू डिसाईड अ‍ॅन्ड जस्ट मेनटेन दोज रीलेशन्स. माझ्या आयूष्यात इतरांसारखेच बरेच लोक आले, पण काही लोकं च्यूविंग-गम केसांना चिकटावं तसं चिकटतात.

Tuesday, January 11, 2011

१ रेड-बुल, ४ कार, १६ यार, ६०० कि.मी. आणि डर्बन. (...भाग ३...)

साधारण साढे-चारशे की.मी. नंतर मी एक-दोन वेळेला लेन अशिकाही चेंज केली, की मागून हॉर्न मारंतंच काही गाड्या माझ्या पुढे गेल्या. माझं ड्रायविंग अचानक गंडू लागलय हे इतर प्रवासी सांगून सुद्धा मला मान्य नव्हतं. पण मग एक ब्लॅक इसम मागून आला आणि ‘व्हॉट द...’ असले काहीतरी उद्गार कींचाळून पुढे गेला. तो ‘व्हॉट द...’ नंतर काय बोलला, हे ‘फक्तं’ आणि ‘फक्तं’ त्यालाच माहीती. पण जे अति-शहाणे आहेत त्यांना लगेच समजलं. मग मात्र मी मान्य केलं की मला झोप येतीये. दिनेशनी मग लगाम हातात घेतला आणि मी शेजारच्या सीटवर गाढ झोपलो. मागे राजीब आणि नागेश, कॅमेर्यामधून मिळतील ती द्रुश्य घेत होते. १६० च्या वेगामध्ये साठ टक्के फोटो हे अत्यंत निरूपयोगी, वीस टक्के हे अत्यंत हललेले आणि उरलेल्या मध्ये जे नको होतं ते टिपलं गेलेलं. म्हणजे उदाहरणार्थं टेकडीचा फोटो घेताना मधेच एखादा ट्र्क आलाय, चरणार्या गायीच्या फोटोत वीजेचा खांब मधे आलाय, आणि इंद्रधनुष्याचा फोटोत सात ऐवजी एकाच रंगाचा राजीब मधे आलाय. दर फोटो नंतर ‘शिट यार, शिट यार’ हेच ऐकू येत होतं. शेवटी मी दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटले. मधे-आधे एखादा मॉल सोडला, तर मी पुढचे शंभर की.मी झोपूनच होतो.

Monday, January 3, 2011

१ रेड-बुल, ४ कार, १६ यार, ६०० कि.मी. आणि डर्बन. (...भाग २...)

गाडी गेट मधून बाहेर पडली तसं मी मागे वळून बॅक-सीटकडे पाहिलं. राजीबच्या उघड्या तोंडातून एक ओघळ खाली येताना मला दिसला. ह्याचे अर्थ दोनंच; एक म्हणजे गाढ झोप आणि दुसरं म्हणजे अजूनसुद्धा हँग-ओव्हर टाईट होता. शेजारी दिनेश निवांत होत होतेच. मागे नागेश मोबाईलशी चाळा करत होताच. ह्या माणसाला जन्माला घालतानाच देवानी मोबाईल चार्जर का नाही जोडला! म्हणजे मोबाईल डिसचार्ज व्हायचा प्रश्नंच मिटला असता. कधीही बघावं तर हे बटनं दाबतानाच आढळतील आपल्याला. मी मुकाट्याने मान वळवली, एक जांभई दिली आणि लेन पकडली. आमच्या आधीच तीन कार पुढे गेलेल्या. जॉहॅनेसबर्गला इतकं शांत मी आधी कधीच पाहीलेलं नव्हतं; शांत, निश्चल जॉहॅनेसबर्ग.


डिसेंबर आणि जानेवारी महिने हे उन्हाळ्याचे असतात दक्षीण-आफ्रीकेत. पण एक विचित्र उन्हाळा असतो हा. अतीशय गरम होत असताना तुम्ही पंखा चालू केला रे केला, की अचानक ढग दाटून येतात, वीजा भयानकरीत्य चमकू लागतात आणि गारांचा पाऊस सुरु होतो. नंतर इतकी थंडी होते की रजई शिवाय झोपणं अशक्य. आणि गारा सुद्धा लिंबा येवढ्या मोठ्य़ा ओ! ऑन-द-रॉक्स दारूची बेस्ट सोय असते ही. नुस्ता ग्लास बाहेर काढला खिडकीतून की चिल्ड व्हिस्की तयार. (ही फक्त कल्पना. उगीच असंच घडतं साऊथ-आफ्रीकेत म्हणून फुकट अफवा पसरवू नका. चेष्टा होईल!)

आदल्या रात्रीच्या पावसानी कार, हाय-वे, अत्यंत आलीशान बंगले आणि झाडी, थोडक्यात संपूर्ण जो-बर्ग (जॉहॅनेसबर्ग) चिंब झालेलं होतं. स्ट्रीट-लाईट्स च्या प्रकाशात आमच्या चार ‘निसान’ कार्स सरसावत होत्या; तीन पांढर्या आणि एक सोनेरी ‘निसान टिडा’. सद्ध्या परिस्थिती अशीये की रस्त्यावर एक जरी पांढरी ‘निसान टिडा’ दिसली, तर ते आमच्याच कंपनीच कार्टं असणार ही खात्री असते. क्वचितच एखादा दुसरा रंग कार-एजन्सी आम्हाला देते. भरवसा नाही ना ओ, डेंटिग-पेंटिंग चा! कमवणार किती आणि रंगवणार किती!