Wednesday, December 29, 2010

१ रेड-बुल, ४ कार, १६ यार, ६०० कि.मी. आणि डर्बन. (...भाग १...)

लहानपणापासूनच आमच्या फॅमिलीला ट्रिपा काढायचा भारी शौक. एकतर, तुम्ही पुणेकर असाल तर आसपास हिंडण्याजोगे स्पॉट्स किती आहेत हे तुम्हाला सांगायलाच नको. अगदी लोकल, सारसबाग, संभाजी पार्क, कात्रज उद्यान, इथपासून ते थेट लोनावळा, माथेरान, ताम्हेणी घाट, अष्टविनायक, इत्यादी ही असली लांबलचक यादी तर पुण्यातलं शेंबडं पोर वयाच्या पाचव्या वर्षा पर्यंत उरकून घेतं. माझ्या आईला तर हिंडण्याचा भारीच उत्साह. तिला हिंडण्याचा, आणि बाबांना तिला हिंडवण्याचा. ‘आपण कुठेच कधी जात नाही की ओ! तुम्हीतर बाई कमालीचे निरुत्साही!’, ह्या ब्लॅकमेल्ड वाक्याच्या जोरावर अक्खा हिंदुस्तान पिंजून काढला आम्ही. खुद्द महाराष्ट्रातच महाराजांची प्रॉपर्टी इतकी आहे की सात जन्म देखील कमीच पडतील ती पालथी घालायला. ३०० हून अधिक गड बांधण्याची अथवा जिंकण्याची ताकद त्यांच्यात, आणि शक्य झालं तर ते पहाण्याची ताकद आमच्या मातोश्रीं मध्ये आहे. गडांसोबतच धरणं, हा प्रकार देखील महाराष्ट्रात मुबलक आहे. नुसत्या पुण्यालाच तर अनेक धरणांनी घेरलय; खडकवासला, पानशेत, कोयना, भुशी, मुळशी, भाटघर ही काही नावं चार-चौघात घेतली जरी, तरी आपण पुणेकर आहोत हे सिद्धं होतं. आईच्या हौशीखातर आम्ही ती देखील अनेकदा बघून आलोय. अहो पण एका लिमिट नंतर कंटाळा येतो ओ! एकतर उन्हाळ्याच्या सुट्टीत, भर दुपारच्या चांदण्यात गड सर करत हिंडायचं मला फार जिवावर यायचं. पण आई-बाबा मात्र एखाद्या सरनोबता सारखं, सरबत पाजंत मला हिंडवायचे. त्यात आईला बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर ह्यांनी ट्यूशन दिल्यामुळे प्रत्येक गडाचा इतिहास तिला थोडाफार लक्षात. रायगडावरचा किस्सा सांगतो बरका! तिथे एक गाईड आम्हाला रायगडावरच्या पुरातन बाजारपेठेबद्दल सांगत होता.

‘...आणि आता इथे बघा, ही आहे रायगडावरची बाजारपेठ. इथे तुम्हाला दिसतच असेल की सर्व दुकानं थोड्या उंचीवर आहेत. कारण असं, की समजा पूर आला तर दुकानातला माल वाहून जाऊ नये म्हणून.’

गाईड पेटला होता ओ! इतकी थाप बिंदास मारली त्यानं की आईचं डोकं झालं गरम.

Image: रायगड बाजारपेठ
त्या पोराला असला हासडला तिने ‘ए गप रे! वाट्टेल ते सांगतोयस की. रायगडावर कुठला पूर आणलास रे! पुर्वी लोकं घोड्यांवरून स्वारी करायचे. त्यांना खरेदी करताना घोड्यावरून खाली उतरायला लागू नये म्हणून ही उंची आहे दुकानांना. एक रुपया मिळणार नाही तुला, असल्या थापा मारल्या आहेस तू.’ 

एखाद्या काळ्या-कुट्टं माणसाला शरमेनं लाल झालेलं कधी पाहीलय का? त्या गाईड्ला चॉकलेटी होताना मी पाहिलय. तेवढ्यात एकही रुपया द्यायला लागू नये म्हणून अर्धे पुणेकर पसार. उरलेलं नॉन-पुणेकर मराठी पब्लिक कनफ्यूज होऊन तिथेच आईच्या तोंडाकडे बघत उभ राहिलं. शेवटी गाईडच निघून गेला.

आईला जशी बघायची, तशी बाबांना तिथली छापील महिती वाचायची आवड. बाय-फोकल चशम्याच्या खालच्या भिंगातून ते, मान आणि पाठ वाकवून गडांवरचे, मंदिरांमधले अर्धे धुरकट झालेले बोर्ड वाचत उभे रहातात.

पुढे जसा मोठा होत गेलो, तसं आईचा-बाबांचा हात सोडला आणि हातात स्टीयरींग आलं. मागे फॅमिली ऐवजी मित्र रीप्लेस झाले. महाराष्ट्राबाहेर पाऊल पडलं आणि ट्रिपा कंटीन्यू झाल्या. लग्नं झालं आणि आम्ही शिमला-कुलू-मनालीला  हनीमून साठी गेलो. काही महिन्यांनी दापोलीला सुद्धा बायको सोबत गेलो. थोडक्यात काय तर भ्रमंती चालू आहे.

सॉफ्ट्वेयर इंजिनीयरला नुसतं ‘ऑन-साईट’ म्हणा. प्रोजेक्ट-मॅनेजर पुढे बारक्या पोरासारखं ‘मला पण जायचं! मला पण जायचं!’ असं म्हणत, जमिनीवर पाय घासत बसू शकतो तो. ही मोठी ट्रिप आपल्याला पण मिळाली ना यार! आलो साऊथ-आफ्रीकेला. जोहॅनेसबर्गमधे गेले तीन महिने तळ ठोकलाय आपण.
‘क्लायंट जंगलातला आहे. त्याचा ड्रेस-कोड हा अशोक किंवा अंब्याच्या पानांचा, अथवा चित्त्याच्या कातड्याची चड्डी घातलेला आहे. हातात बांबूच्या बारक्या कांड्या घेऊन ते ऑफीसला येतात. आपला प्रॉग्रॅम चुकू नये म्हणून भाले आपल्या डोक्यावर ताणून धरलेले असतात. एखादा टेस्टर फार आडमुठेपणा करायला लागला की त्याला जिराफचं दूध काढायला लावतात. टीम-लीडनं डेड्लाईन मिस केली की त्याला त्या बांबूच्या कांडीमधून छोटे बाण मारले जातात. तो बेशुद्ध झाला की त्याला ऑस्ट्रिच मागे बांधून गावभर लोळंवलं जातं. लंच टाईम सिंहान बरोबर शेयर करावा लागतो.’ हे असलेच विचार, मी इथे आलोय म्हणल्यावर पब्लिकच्या मनात येत असावेत.
‘एस.ए. मध्ये काय आहे यार! यू.एस.ए ला जायचं सोडून तिकडे जंगलात काय करणार तू!’
ह्या असल्या भलत्या भित्या मनात आधीच घातल्या होत्या. पण इथे आलो आणि सगळ्यांना मीच सांगतो; ‘साऊथ-अ‍ॅफ्रीका रॉक्स बेबी!’ जोहॅनेसबर्ग मधेच आम्ही रहातो पण त्याबद्दल नंतर वेगळं सांगेन. मुख्य टॉपिक आहे डर्बनची टूर.

क्रिसमस म्हणलं की बहुतेक पाश्चात्य देश नटायला, सजायला लागतात. नोकरी, धंदा अत्यंत मंदावतो. साधारणपणे डिसेंबर मध्यं ते जानेवारी पंधरापर्यंत सगळीकडे शुक-शुकाट पसरतो. भर दुपारी दिवाळीच्या आधी जसा लक्ष्मीरोड गजबजतो, तसे इथले मॉल्स भरून जातात. क्रीसमस ट्रीज, कपडे, गिफ़्ट्स, वाईन, शॅम्पेन, यांची खरेदी होत असते. माझ्या इथल्या ऑफिस मधे सुद्धा असाच रंग दिसू लागलेला. एक-एक करत लोक, ‘बाय बाय, मेरी क्रिसमस, सी यू इन द न्यू ईयर’ अश्या घोषणा करंत नाहिसे व्हायला लागले. ऑफिस मधल्या आयटम पोरी ‘सी यू सॅम, टेक केअर डूड, सी यू इन द न्यू ईयर’ असं म्हणेस तोवर मी भानावर नवतो आलो. पंचवीस डिसेंबरला नाताळ होता. फक्त तीन दिवस आधी ऑपशन्स पाहिले.

सेंट ल्यूशिया; तिथले हॉटेल्स बुक्ड.
सन सिटि; तिथे एका दिवसात परत येऊ आपण. नंतर कधीही जाता येईल, असं सगळ्यांचं मत पडलं.
क्रूगर नॅशनल पार्क; तिथे सुद्धा बुकिंग्स झालेले की ओ!
टुगेला फॉल्स; तिथे ६ तासांचा ट्रेक आहे. कॅन्सल.

काही जणांचं मत पडलं ‘कुठेच नको जायला, इथेच बसू.’ मी मात्र तयार नव्हतो. चायला इथेच बसून काय एकमेकाची थोबाडं बघायची आहेत! तितक्यात कोणीतरी सांगितलं ‘डर्बनला एक ग्रूप चालला आहे. दहा-बारा जणं असतील.’ त्या ग्रूप मधल्या एकानं डर्बनच्या हॉटेलवाल्याचा नंबर दिला; ‘तन्वीर’ त्याचं नाव. आधी तो आम्हाला एजंट वाटला, पण तो निघाला ‘चेरीवुड कंट्री रीसॉर्टचा’ मालक. पैसे ट्रान्सफर झाले अ‍ॅन्ड वी वैर रेडी टू गो. टाकी फुल आणि कार तयार. एकूण सोळा जणं जाणार हे फायनल झालं आणि निघण्याच्या आधीचा दिवस उजाडला.

‘रात्रीच निघा, एक-दोन वाजता, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही.’, असं इथले लोकं म्हणाले.

‘दोन वाजता! येडा झाला का तू! अबे झोप नाही झाली तर काशी व्हायची. पाचला निघू’, असं ग्रूप मधला प्रज्वल म्हणाला (नाव बदल आहे, कारण उज्वलला लाज वाटेल.) खरं कारण वेगळच होतं. त्या रात्री एकाचं बर्थडे-सेलिब्रेशन होतं. ‘दारू’ इतकी आणली होती की अक्खि रात्र त्याच्यानं अभ्यंगस्नान होणार होतं. मी पीत नाही, पण पार्टीत नशा कसा आणायचा हे आपल्याला जमतं. पण जर पहाटे निघायचं तर लवकर उरकावं लागणार होतं. इथे तर कोणीच माघार घ्यायचा मूड मधे दिसेना. एकतर परदेश, त्यावर हायवे, त्या ऊपर ६०० की.मी.. मला खात्री होती हे भ*** सकाळचे दहा-अकरा वाजवणार. पण काय करता! शेवटी चारचा टाईम पक्का झाला. मी अडीचचा गजर लावला, आणि हाईट म्हणजे उठलोकी ओ वेळेवर! त्या ऊपरची हद्द म्हणजे सोळाच्या सोळा जणं वेळेवर तयार. एकाच्या रूमवर पहाटे चहा झाला, आणि च्या-मारी बरोबर चारला ‘जय जय रघूवीर समर्थ!’ म्हणून चक्क निघालो!

‘४ कार्स, १६ यार, ६०० की.मी. अ‍ॅन्ड लेट्स रॉक डर्बन बेबी...’(क्रमश:)


कॄपया आपल्या कमेंट ब्लॉगच्या खाली सोडाव्यात. एका गरीब, गरजू लेखकाला तेच प्रोत्साहन आणि तीच शिकवण. इथे तुमचं ‘जी-मेल’ अकाऊंट सुद्धा चालतं बरका!

माझे इतर ब्लॉग:


Vital Image Sources:
रायगड बाजारपेठ: http://www.fotothing.com/magiceye/photo/2e428e5f341c38ba6858e68ca842ccb7/

10 comments:

 1. Again a good one!Awaiting Part 2...the best one was Raigad- pur aala tar mhane ... rofl

  ReplyDelete
 2. ४ कार्स, १६ यार, ६०० की.मी. अ‍ॅन्ड लेट्स रॉक डर्बन बेबी
  Title kharach chan ahe. Ani vishesh mhanje...title nusar content sudha khup chan ahe.
  Keep writing.
  -Prasad J.

  ReplyDelete
 3. Tu parat tar ye . Mala ajun ek Gadh, ek dharan ani ek mandir sapadalay. Tula gheun jayala. Aai

  ReplyDelete
 4. mi tuza fan zaloy. 2011 mast vachaniy janar. waiting 4 nxt prt, dude.

  ReplyDelete
 5. धन्यवाद मित्रांनो! डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या इतका सेंटी झालोय मी तुमचा प्रतीसाद पाहून! प्रयत्न करेन तुम्हाला सतत हसत ठेवण्याचा. २०११ च्या हार्दिक शुभेच्छा.

  @हेमंत: मनापासून धन्यवाद. एनजोय!

  ReplyDelete
 6. Great effort! Just finished, will move onto part II after the work. I must admit, u have the power of expression -- choosing the right word at the right place. But I would take partial credit for this blog: afterall, it was me who gave u the idea to write such a thing :P

  ReplyDelete
 7. Mast re sameer....
  pan saglyat mast mhanje toozya aai chi comment....
  ajoon ek gad,dharan, aani mandira karata tayar raha india la gelya var. :):)

  ReplyDelete
 8. @Anoop: Agreed. Thanks for the motivation bro. :)

  ReplyDelete
 9. The name "Prajval" mentioned in the story is actually "Ujjaval" and its me... :)
  Nice writing Sameer.

  ReplyDelete
 10. कुल्कासा अरे किती सही...लई भारी राव...
  मजा आली आहे, पार्ट-१ वाचुन..आता थांबन कठीन.. दुसरा भाग वाचल्यावर, पुढची प्रतीक्रीया..

  ReplyDelete