Wednesday, December 29, 2010

१ रेड-बुल, ४ कार, १६ यार, ६०० कि.मी. आणि डर्बन. (...भाग १...)

लहानपणापासूनच आमच्या फॅमिलीला ट्रिपा काढायचा भारी शौक. एकतर, तुम्ही पुणेकर असाल तर आसपास हिंडण्याजोगे स्पॉट्स किती आहेत हे तुम्हाला सांगायलाच नको. अगदी लोकल, सारसबाग, संभाजी पार्क, कात्रज उद्यान, इथपासून ते थेट लोनावळा, माथेरान, ताम्हेणी घाट, अष्टविनायक, इत्यादी ही असली लांबलचक यादी तर पुण्यातलं शेंबडं पोर वयाच्या पाचव्या वर्षा पर्यंत उरकून घेतं. माझ्या आईला तर हिंडण्याचा भारीच उत्साह. तिला हिंडण्याचा, आणि बाबांना तिला हिंडवण्याचा. ‘आपण कुठेच कधी जात नाही की ओ! तुम्हीतर बाई कमालीचे निरुत्साही!’, ह्या ब्लॅकमेल्ड वाक्याच्या जोरावर अक्खा हिंदुस्तान पिंजून काढला आम्ही. खुद्द महाराष्ट्रातच महाराजांची प्रॉपर्टी इतकी आहे की सात जन्म देखील कमीच पडतील ती पालथी घालायला. ३०० हून अधिक गड बांधण्याची अथवा जिंकण्याची ताकद त्यांच्यात, आणि शक्य झालं तर ते पहाण्याची ताकद आमच्या मातोश्रीं मध्ये आहे. गडांसोबतच धरणं, हा प्रकार देखील महाराष्ट्रात मुबलक आहे. नुसत्या पुण्यालाच तर अनेक धरणांनी घेरलय; खडकवासला, पानशेत, कोयना, भुशी, मुळशी, भाटघर ही काही नावं चार-चौघात घेतली जरी, तरी आपण पुणेकर आहोत हे सिद्धं होतं. आईच्या हौशीखातर आम्ही ती देखील अनेकदा बघून आलोय. अहो पण एका लिमिट नंतर कंटाळा येतो ओ! एकतर उन्हाळ्याच्या सुट्टीत, भर दुपारच्या चांदण्यात गड सर करत हिंडायचं मला फार जिवावर यायचं. पण आई-बाबा मात्र एखाद्या सरनोबता सारखं, सरबत पाजंत मला हिंडवायचे. त्यात आईला बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर ह्यांनी ट्यूशन दिल्यामुळे प्रत्येक गडाचा इतिहास तिला थोडाफार लक्षात. रायगडावरचा किस्सा सांगतो बरका! तिथे एक गाईड आम्हाला रायगडावरच्या पुरातन बाजारपेठेबद्दल सांगत होता.

Sunday, December 19, 2010

आपल्याला बॉडी बनवायची

खर सांगू तर हा मराठीतला माझा पहिला ब्लॉग. माझं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झाल्यामुळे मराठी मधून काही लिहायची हिम्मत मी टाळत होतो. ह्याला इंग्रजीच्या टिमक्या वाजवतोय असं समजू नका. आणि काना, मात्रा, उकार गंडले म्हणून कोर्टाची पायरी चढायला लावू नका. पण मराठी ची खरी ओळख झाली ते पु.ल. ह्या दैवतामुळे. त्या मुळे त्यांच स्मरण करतो आणि सुरू करतो, आणि उचलतो ही ‘डम्बेल'.

माझा आणि जिमचा तसा फार जुना संबंध आहे. कारण इतक्या बदलून झाल्या आहेत की आता आमच्या एरीयात अशी एकही जिम नाही उरली जिच्या डंबेलवर माझ्या बोटाचे ठसे नाही मिळणार. "तू नुसता आरंभ-शूर आहेस", असं आमचे तीर्थरूप दर जिमच्या पहिल्या दिवशी प्रोत्साहन द्यायचे. मग ते मोडकाळलेलं अवसान आणि ही मोडकळीस आलेली बॉडी घेऊन मी जिमची पायरी चढायचो. लै चिड-चिड होते राव कोणी इतक खरं बोललं की! महिन्याभरातच आळस नावाच्या एका असाध्य रोगामुळे मी बिछाना धरायचो. ‘मरु देत तिचायला!’ असा विचार दर पहाटे मनात यायचाच आणि मग पुढे काही महिने तरी आईकडे फी मागण्यची हिम्मत नाही व्हायची.